चीनला शह देण्याची पूर्ण तयारी
दोन महत्वाच्या निर्णयांवर शिक्कामोर्तब
वृत्तसंस्था: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला ९ वर्ष पूर्ण होत असतानाच आतंराष्ट्रीय पातळीवर मोदींची महत्वाची कामगिरी सुरु आहे. आज नेपाळचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येण्याच्या काही तास आधी, नेपाळचे राष्ट्रपती राम चंद्र पौडेल यांनी नेपाळी लोकांशी विवाह करणार्या परदेशी लोकांना राजकीय अधिकार तसेच त्वरित नागरिकत्व देणार्या नागरिकत्व कायद्यातील वादग्रस्त दुरुस्तीला संमती दिली आहे. चीनच्या दबावामुळे ही दुरुस्ती प्रलंबित असल्याचे म्हटले जात होते. तसेच येत्या काही दिवसांत पंतप्रधान मोदी अमेरिकेसोबत मोठा संरक्षण करार करणार आहेत. भारत आणि अमेरिका फायटर जेट इंजिनबाबत हा करार असेल. हा करार झाल्यास, जेट फायटर इंजिन तयार करणारा भारत जगातील पाचवा देश बनेल.
आज नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. गुरुवारी प्रचंड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांची उर्जा, व्यापार आणि कनेक्टिव्हीटी यावर चर्चा झाली. तसेच यावेळी त्यांच्या भेटी दरम्यान रामायण सर्किटचे काम वेगाने पूर्ण करण्याचा निर्णय झाला.
दरम्यान, नेपाळने केलेल्या या कायद्यातील दूरुस्तीबाबत चीन नेहमीच विरोध करत आला असून नेपाळच्या या पावलावर चीन नाराज असल्याचे मानले जात आहे. अशा परिस्थितीत नेपाळी पंतप्रधानांचा भारत दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. डिसेंबर २०२२ मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रचंड यांचा हा पहिलाच विदेश दौरा आहे. नेपाळच्या माजी राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांनी या नागरिकत्व दुरुस्तीला दोनदा संमती देण्यास नकार दिला होता.
नेपाळचे पीएम प्रचंड पत्रकार परिषदेत म्हणाले की, सीमावादावर माझी मोदींशी चर्चा झाली. मी त्यांना आवाहन करतो की हे प्रकरण द्विपक्षीय चर्चेद्वारे सोडवावे. त्याचवेळी पीएम प्रचंड यांनी पंतप्रधान मोदींना नेपाळ भेटीचे निमंत्रण दिले. हैदराबाद हाऊसमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली.
जेट इंजिन तयार करणारा भारत आशियातील एकमेव देश ठरणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्याच्या २१ ते २४ तारखेपर्यंत अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पंतप्रधान मोदींना दौऱ्याचे निमंत्रण दिले होते. यंदाचा मोदींचा हा दौरा संरक्षण क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या दौऱ्यात भारत आणि अमेरिका फायटर जेट इंजिनबाबत मोठा करार करणार आहेत. तंत्रज्ञानासाठी महाकाय मानला जाणारा चीनदेखील जेट इंजिन स्वतः बनवत नाही. हा करार झाल्यास, जेट इंजिन तयार करणारा भारत हा आशियातील एकमेव देश ठरेल. या कराराबाबत भारताची अमेरिकेशी दीर्घकाळापासून चर्चा सुरू आहे. आता यावर पीएम मोदींच्या दौऱ्यात शिक्कामोर्तब होऊ शकते, असे मानले जात आहे.