‘नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न’...!

माझे कोकण : संतोष वायंगणकर


मुंबई आणि गोवा राज्याला जोडणारा महामार्ग गेली अनेक वर्षे बांधला जातोय. आजही या मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण झालेले नाही. या महामार्गाचे काम डिसेंबरअखेर पूर्ण होईल, असे महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केले आहे. ‘नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न’ अशीच काहीशी अवस्था कोकणातील या महामार्गाची झाली आहे. कोकणात कोणताही प्रकल्प राबवायचा झाला की, त्याला विरोध हा ठरलेलाच असतो. प्रकल्प मंजूर झाला की पहिली दहा-पंधरा वर्षे ही विरोधाचीच जाणार. नंतर मग प्रकल्प धिम्या गतीने सुरू होणार, असं हे ठरलेलंच असतं. मग तो प्रकल्प पर्यावरणपूरक असो किंवा पर्यावरणाला हाणी पोहोचवणारा असो... त्याला विरोध हा होणारच! हे ठरलेलंच असते, हे सांगण्यासाठी कोणत्याही भविष्यवेत्याची बिलकूल आवश्यकता नाही. फुटाच्या जागेवरून दोन ते पाच वर्षे वाद करायचे. हे वाद गावातील परस्परांमध्ये असलेल्या दाव्याप्रतिदाव्यावरून असतात; परंतु गावातील आपसातील हे वाद प्रकल्प विकासाच्या मुळावर येतात. या बाजूचा विचार कधीच कोणी करताना दिसत नाही. मुंबई-गोवा महामार्गाचा प्रारंभ वीस वर्षांपूर्वी झाला. मुंबईहून निघालेल्या महामार्गाचे काम रायगड जिल्ह्यात येऊन थांबले. पर्यावरण विभागाची परवानगी, पर्यावरणावरून न्यायालयात आणि मग ठेकेदार कंपनी न्यायालयात, अशा विचित्र स्थितीत मुंबई-गोवा महामार्गही न्यायालयात दीर्घकाळ प्रलंबित राहिला. खरं तर न्यायालयात एखादा विषय नेणे आणि वर्षानुवर्षे फूट जागेसाठी न्यायालयाच्या पायऱ्या झिजवणे हे कोकणवासीयांसाठी काही नवीन नाही. न्यायालयात खेटे घालणे हा आपला स्वभावगुणच आहे. गावो-गावी चार-पाच पिढ्यांचे जमीन जुमल्यांचे वाद न्यायालयात प्रलंबित आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गाचा हा वाद न्यायालयात गेला तर कोकणातील कुणालाच नवल वा आश्चर्य वाटणार नाही. कोकणातील सिंधुदुर्ग मुख्यालयाचा वाद असाच पंधरा-वीस वर्षे न्यायालयात होता. लातूर आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांची निर्मिती एकाच वेळची; परंतु सिंधुदुर्ग मुख्यालयावरून वाद घालत बसले. याच कालावधीत माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांनी लातूर जिल्ह्याचे मुख्यालय बांधून पूर्ण केले. कोकणातील विकासाचा हा इतिहास असा आहे. सकारात्मकतेपेक्षा नकारात्मकता अधिक दिसून येते. मुंबई-कोकण गोव्याला जोडणाऱ्या महामार्ग क्र. ६६ चे काम असेच रखडले आहे. याच महामार्गाचे काम झाराप ते पत्रादेवीपर्यंत बारा वर्षांपूर्वीच पूर्ण करण्यात आले. या महामार्गातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हद्दीतील झाराप ते खारेपाटणपर्यंतचा महामार्ग बांधला आहे. अर्थात या महामार्गाच्या बांधकामाविषयी, दर्जाविषयी शंभर प्रश्न उपस्थित होऊ शकतात; परंतु बाजूच्या रत्नागिरीत काहीच काम झालेलं नाही. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात काम झालयं ते दर्जेदार झालयं असं म्हणता येणार नसलं तरी ते झालयं एवढचं यातलं समाधान आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील अजूनही बरच काम शिल्लक आहे. रायगडमध्ये तीच स्थिती आहे. यामुळेच मुंबईतून येणारे कोकणवासीय किंवा पर्यटक कोकणात यायचे झाल्यास मुंबई-पुणे व पुणे-कोल्हापूरमार्गे कोकण असा प्रवास करतात. हा त्रासाचा प्रवास येणारा कोकणवासीय केवळ पुण्याचा मार्ग परवडला; परंतु मुंबई-गोवा महामार्गावरचा प्रवास नको, असं वाटते. म्हणूनच त्या मार्गावरून प्रवास करतात. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी झाराप ते रायगडपर्यंतचा पाहणी दौरा आखला आहे. याच दौऱ्यात त्यांनी डिसेंबरअखेरपर्यंत या महामार्गाचे काम पूर्ण होईल, असे जाहीर केले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांनी बांधकाम मंत्रीपद स्वीकारल्यानंतर दुसऱ्यांदा मुंबई-कोकण महामार्गाचा पाहणी दौरा केला आहे. वर्षभरापूर्वी बांधकाम झालेल्या या महामार्गाचे बांधकाम सदोष आहे. यातील बांधकामातील दोष ठेकेदार कंपनीने दूर केले पाहिजेत. या महामार्गाचे बांधकाम करणारी ठेकेदार कंपनी काही नागरिकांवर मेहरबानी करीत नाही. यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या महामार्गाच्या बांधकाम दर्जाविषयीही लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. गणेशोत्सव काळात मोठ्या संख्येने पुणे, मुंबई, नाशिक आदी शहरातून राहणारा कोकणवासीय कोकणात येतो. त्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. कोकणातून जाणाऱ्या या महामार्गाच्या बाबतीत अगोदरच असंख्य विघ्न आहेत. ती दूर करून या महामार्ग प्रकल्पाचे काम पूर्ण व्हावे, एवढीच कोकणवासीयांची अपेक्षा आहे.

Comments
Add Comment

महागाई आटोक्यात, पण दिलासा हवा!

अलीकडेच किरकोळ महागाईचे आकडे जाहीर झाले. जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये किरकोळ महागाई पुन्हा एकदा दोन

अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत २०४७ चे स्वप्न साकार करण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व

प्राप्तिकर परताव्यातून सायबर गुन्ह्याचे तंत्र

आजच्या काळात सायबर सुरक्षा अधिक महत्त्वाची बनली आहे. प्रत्येक वापरकर्त्याने आपली वैयक्तिक माहिती जपून ठेवली

वाढती गुन्हेगारी कमी करण्यासाठी समुपदेशन

गुन्हेगारांना समुपदेशन करण्याची आवश्यकता, पद्धती आणि उपाययोजना लक्षात घेणार आहोत. गुन्हेगार सुधारून समाजात

मुलांवर अभ्यासाचं ओझं नको

विद्यार्थीदशेमध्ये यश-अपयश हे प्रत्येकांच्या जीवनात येत असते. मात्र त्यावर मात करता आली पाहिजे. त्यासाठी

अलविदा १९४२

निरोप नव्हे... हा तर नवीन लढा स्वमालकीचा, अस्तित्वाचा. बेस्टच्या स्वमालकीचा बसगाड्यांचा ताफा पुढील काही दिवसांतच