मुंबई : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात रोज नवा पक्ष स्थापन केला जात असून मागिल ५ महिन्यात १५ नवीन पक्षांच्या मान्यतेवर राज्य निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदीत असलेल्या पक्षांची संख्या ३७१ वर पोहचली आहे.
राज्यात येत्या ऑक्टोबरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याची चिन्हे आहेत. पाठोपाठ विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका लागणार आहेत. त्यादृष्टीने राजकीय हालचाली वाढत असतानाच प्रस्थापित राजकीय पक्षांना आव्हान देण्यासाठी जानेवारीपासून अवघ्या पाच महिन्यांच्या कालावधीत राज्य निवडणूक आयोगाकडे तब्बल १५ नवीन राजकीय पक्षांची नोंदणी झाली आहे.
विशेष म्हणजे रिपाइं आठवले गट, दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या नावाचा पक्ष, भारत राष्ट्र समिती व फॉरवर्ड ब्लॉक या पक्षांनीही राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी करून घेतली आहे.
राज्यात सध्या विधानसभा, लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. या निवडणुका एकत्रच होतील असे संकेत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या तयारीवरुन दिसत आहे.
तर दुसरीकडे येत्या ऑक्टोबरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे.
यामुळे निवडणुका होतील असे गृहीत धरून स्थानिक आघाड्या, छोटे राजकीय पक्ष आदींनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी करून घेण्याचा जणू सपाटाच लावला आहे. राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या वेगवेगळ्या आदेशानुसार जानेवारी २०२३ ते मे २०२३ या कालावधीत जन बदलाव पार्टी (नागपूर), भडगाव तालुका स्वाभिमान आघाडी (भडगाव, जि. जळगाव), लोकनेते विनायकराव मेटे विकास आघाडी (बीड), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर ग्रुप, अमरावती), हिंदुस्थान युनायटेड मंच (जयसिंगपुरा, छत्रपती संभाजीनगर), जनसामान्य पार्टी (तळजाई पुणे), प्रजासत्ताक समाजवादी भारत पार्टी (नांदेड), अखिल भारतीय बंजारा सेना (जळगाव), महाजन विकास आघाडी (धरणगाव, जळगाव), भारत राष्ट्र समिती (चर्चगेट, मुंबई), राष्ट्रीय महास्वराज्य पार्टी (डिकसळ, मोहोळ), जनविकास फाउंडेशन (तुमसर, भंडारा), ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक (नांदगाव, अमरावती), जनकल्याण संघर्ष आघाडी (जळगाव), प्रजा क्रिया पार्टी (उल्हासनगर)या १५ नवीन राज्यस्तरीय राजकीय पक्षांची नोंद झाली आहे.
दरम्यान, रिपाइ (आठवले) पक्षाची नोंदणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे होती. राज्यात आम्ही पहिल्यांदाच राज्य पक्ष म्हणून नोंदणी करून घेतली आहे. येत्या मनपा, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायत या निवडणुकांसाठी ती केल्याने आम्हाला राज्यात स्वतंत्र चिन्ह मिळेल, असे रिपाइं प्रदेशाध्यक्ष राजा सरवदे यांनी सांगितले.
तसेच मराठा समाजाचे नेतृत्व केलेले दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या नावानेही नवीन पक्षाची नोदणी झाली आहे. शिवसंग्राम भारतीय संग्राम परिषद हा पक्ष त्यांनी स्थापन केला होता. पण मेटे यांच्या बीड जिल्ह्यातील घरच्या पत्त्यावरच या पक्षाची नोंदणी झाली आहे.
केंद्रात भाजपबरोबर सत्तेत असलेल्या रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षानेही नोंद केली आहे. निवडणूक आयागाने त्यांना ९ मार्च रोजी मान्यता पत्र दिले आहे. तेलंगणातून महाराष्ट्रात पाय रोवू पाहणाऱ्या भारत राष्ट्र समिती या नावानेही पक्षाची नोंदणी झाली आहे. एम. बी. पाटील (चर्चगेट मुंबई) यांनी २८ मार्च रोजीच या नावाने पक्षाला मान्यता घेतली आहे.