डॉ. अमोल कोल्हेंनी दिला मोलाचा सल्ला
मुंबई : मला राजकारणातलं काही कळत नाही आणि त्यात पडायचं देखील नाही, अशा शब्दांत प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिने राजकीय पक्ष प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम दिला असला तरीही आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातले बडे नेते मात्र मतदारांना भुलवण्यासाठी गौतमीला आपल्या पक्षात येण्यासाठी गळ घालत आहेत.
आपल्या अदाकारीने महाराष्ट्रातल्या तरूणाईला आणि राजकारण्यांनाही घायाळ करणारी सबसे कातील, गौतमी पाटील ही आता राजकीय आखाड्यात उतरणार आहे. गौतमी पाटील सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. जिथे तिचा कार्यक्रम होतो तिथे प्रचंड जनसमुदाय जमतो. हजारोंच्या संख्येने लोक गौतमीच्या नृत्याचा कार्यक्रम पाहायला जातात. त्यामुळे एवढी प्रसिद्धी मिळालेल्या गौतमीचा आता पक्षासाठी योग्य वापर करुन घेण्यात येणार आहे.
याआधीही कोणताही अनुभव नसलेल्या बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्रींनी विविध पक्षांमध्ये प्रवेश करत निवडणुका सुद्धा लढवल्या आहेत. या क्षेत्रातल्या व्यक्तींना राजकारणाचा रस फारच कमी असतो. परंतु पक्षाची प्रतिमा उंचावण्यासाठी, मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकारणी त्यांना राजकारणात ओढतात. काही कमी व्यक्ती या क्षेत्रातल्या अशा आहेत की त्यांना स्वतःहून राजकारणाचे आकर्षण असते. अनेक अभिनेते, अभिनेत्री लोकसभा, राज्यसभेवर निवडून गेले. त्यापैकी किती समाजसेवा किंवा राजकारणात टिकून आहेत. असे असले तरी आफल्या पक्षाचे एक वेगळे वलय निर्माण होण्यासाठी बहुतेक सर्वच पक्षात अशी मंडळी दिसून येते.
काही दिवसांपूर्वी, सातारा येथील जलमंदिर निवासस्थानी गौतमीने खासदार उदयनराजे यांची सदिच्छा भेट घेतली. बैठकीनंतर गौतमी पाटील म्हणाली की, खासदार उदयनराजे यांच्याशी विविध विषयांवर चर्चा झाली. महाराजांना मी प्रथमच भेटले. उदयनराजे भोसले यांचे आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहावेत, यासाठी मी आले होते.
दरम्यान, अनेक राजकीय नेत्यांनी गौतमीबाबत आणि तिच्या कार्यक्रमांबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. त्यामुळे गौतमी राजकारणात येणार का, अशा चर्चांना उधाण आले आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि प्रसिद्ध अभिनेते अमोल कोल्हे यांनी देखील गौतमीच्या राजकारणात प्रवेशाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
गौतमीच्या राजकारणात प्रवेशाबाबत बोलताना डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, कलाकाराने राजकारणात का आणि कशासाठी यावे याचा प्रथम खुलासा करायला हवा. गौतमी पाटील कमी वयात प्रसिद्धीच्या झोतात आल्या आहेत. कला क्षेत्रातली प्रसिद्धी आळवावरचे पाणी असते, त्यामुळे कमी वयात प्रसिद्धी मिळाली तरी कलाकाराने एका शाश्वत करिअरकडे आखाणी करायला हवी, असेही ते म्हणाले.
पुढे बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, कलाकाराचे राजकारणात स्वागत आहे. परंतु कलाकाराने राजकारणात येत असताना आपल्या लोकप्रियतेचा फायदा समाजाला फायदा होणार आहे का? की केवळ आवड आहे म्हणून येत आहोत याचं उत्तर शोधायला हवं. कोणतही करियर निवडताना आपण ते का निवडतोय याचं उत्तर आपल्या मनात स्पष्ट असायला हवं असं भाष्य डॉ. अमोल कोल्हे यांनी गौतमीच्या राजकारणातल्या एंट्रीवर केले आहे.