Saturday, July 5, 2025

पैलवानांच्या शोषणाचे प्रकरण केंद्र सरकार संवेदनशीलपणे हाताळतेय

पैलवानांच्या शोषणाचे प्रकरण केंद्र सरकार संवेदनशीलपणे हाताळतेय

केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकुर यांनी व्यक्त केला विश्वास


नवी दिल्ली (प्रतिनिधी) : ‘महिला कुस्तीपटूंनी केलेल्या शोषणाच्या आरोपाचेप्रकरण केंद्र सरकार संवेदनशीलपणे हाताळत आहे’, असे केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले.महिला कुस्तीपटूंनी केलेल्या मागणीनुसार या प्रकरणी एक समिती स्थापन करण्यात आली असून तपास सुरु असल्याचे ते म्हणाले. साक्षी मलिक, विनेश फोगाट, बजरंग पुनिया आणि संगीता फोगाट यांच्यासह अनेक पदक विजेत्या खेळाडूंनी राष्ट्रीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष खासदार बृजभषण सिंह यांना अटक करावी अशी मागणी करत दिल्लीत आंदोलन सुरू केली आहे.


केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकुर हे गुरूवारी मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांना कुस्तीपटुंच्या आंदोलनावर प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, केंद्र सरकार आंदोलन करणाऱ्या पैलवानांच्या मुद्द्यावर संवेदनशील आहे. खेळाडूंनी मागणी केल्यानुसार दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांच्या मागणीनुसार, भारतीय कुस्ती महासंघाने एक समिती नियुक्त केली आहे. ही समिती या प्रकरणाची चौकशी करणार आहे.


कुस्तीपटूंनी असे कोणतेही पाऊल उचलू नये जे खेळ किंवा खेळाडुंना नुकसान पोहोचवेल, असे आवाहन आधी अनुराग ठाकुर यांनी केले होते. दरम्यान, जागतिक कुस्ती महासंघाने या आंदोलनाची दखल घेतली आहे. कुस्तीपटूंना पोलिसांनी ताब्यात घेऊन हीन वागणूक देणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. या संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक पद्धतीने चौकशी केली जावी. त्याचबरोबर ४५ दिवसांत कुस्तीगीर महासंघाची नव्याने निवडणूक घ्यावी, नाहीतर भारतीय कुस्तीगीर महासंघ बरखास्त केला जाईल, असा इशारा जागतिक कुस्ती महासंघाने दिला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा