Thursday, May 8, 2025

कोकणमहाराष्ट्ररत्नागिरी

दापोलीचा हेराफेरी करणारा पोस्टमन सीबीआयच्या जाळ्यात!

सरकारी कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांच्या खात्यांमधून केली ६० लाखांची हेराफेरी


रत्नागिरी : राज्यात सायबर गुन्ह्यांच्या घटना वाढत असताना रत्नागिरीमध्ये एका पोस्ट अधिका-यानेच सरकारी कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांच्या २६० बचत खात्यांमधून ६० लाख रुपयांची उधळपट्टी केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.


संजय गांधी योजना, श्रवण बाळ योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना यांसारख्या सरकारी कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांच्या २६० बचत खात्यांमधून ६० लाख रुपयांची उधळपट्टी केल्याप्रकरणी या कर्मचाऱ्यावर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन परसराम गुट्टे याने २०१८-२० पासून दापोली तालुक्यातील आंजर्ला उप पोस्ट ऑफिसमध्ये पैसे काढण्यासाठी बनावट व्हाऊचर तयार केले होते. त्यामध्ये एकतर मयत किंवा नियमित लाभार्थी नसलेल्या लाभार्थ्यांच्या सह्या आणि अंगठ्याचे बनावट ठसे त्याने घेतले.


खराब इंटरनेट कनेक्टिव्हिटीमुळे सेंट्रल बँकिंग सॉफ्टवेअर 'फिनॅकल' वापरता येत नव्हता. त्याचाच गैरफायदा घेत खात्यातून पैसे गायब करणे त्याला सहज शक्य झाले. नेटवर्कच्या समस्येमुळे प्रलंबित असलेले काम पूर्ण करण्यासाठी तो कामाच्या वेळेनंतर दुसऱ्या कार्यालयात जायचा. तिथे त्याने सीबीआय फिनॅकलमधील बचत बँक खात्यांशी संबंधित काम पूर्ण करण्यासाठी पोस्टल असिस्टंट आणि सब-पोस्टमास्टरचा वापरकर्ता आयडी वापरला आणि सर्व काम स्वतःच केले, असाही आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.


अनेक दिवस खातेदारांकडून ही खाती चालवली जात नसल्याने आरोपी गजानन गुट्टे याने ही खाती टार्गेट केली. टपाल खात्याने गुट्टे यांच्या कारवायांची माहिती घेत त्यांना निलंबित केले आहे. त्यानंतर विभागाने त्याच्याविरुद्ध सीबीआयकडे तक्रार दाखल केली.

Comments
Add Comment