Thursday, March 20, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखयुवा खेळाडूंचे गवसणे, हे आयपीएलचे फलित

युवा खेळाडूंचे गवसणे, हे आयपीएलचे फलित

गेले ५५ दिवस सुरू असलेला क्रिकेटच्या मैदानातला आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा थरार अखेर सोमवारी अतिरिक्त दिवशी खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्याने थांबला. चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सला त्यांच्याच घरात नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रोमहर्षक सामन्यात निसटत्या पराभवाची धूळ चारत विजेतेपदाचा चषक आपल्या नावे केला. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या चेन्नईच्या संघाने पाचव्यांदा आयपीएलच्या जेतेपदाचा मुकुट परिधान करत मुंबईच्या कामगिरीशी बरोबरी केली. त्यामुळे या संघाचे कौतुक करावे तितके कमी. खरे तर क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असे आवर्जून म्हटले जाते. त्यामुळे हा खेळ कधी कोणते धक्के देऊन जाईल, चमत्कार घडवेल, बाजी पलटवेल ते सांगता येत नाही. २० षटकांचा खेळ म्हणजे तेथे फलंदाजांचीच चलती असते हा स्वाभाविक समज. चौकार, षटकारांचा पाऊस पडतो. उत्तुंग फटक्यांची माळ लागते. त्यामुळे आयपीएल म्हणजे गोलंदाजांचा कर्दनकाळ मानला जातो. यंदाचा हंगाम त्याला अपवाद ठरला. साखळीतील काही सामन्यांत लो स्कोअरिंग धावसंख्या उभारूनही प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांना विजय मिळवता आला आहे.

अप्रतिम गोलंदाजीच्या बळावर लिंबू-टिंबू मानल्या जाणाऱ्या संघांनी तगड्या फलंदाजांचा भरणा असलेल्या संघांना चकीत केले. २२ एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात गुजरातने अवघ्या १३५ धावा केल्या. प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या लखनऊ सुपर जायंट्सची मजल २० षटके खेळूनही केवळ १२८ धावांपर्यंतच पोहोचली. दिल्ली कॅपिटल्सने दिलेल्या १४४ धावांचा पाठलाग करताना सनरायजर्स हैदराबादच्या गाडीला १३७ धावांवर ब्रेक लागला. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने दिलेले १२६ धावांचे आव्हान लखनऊला पेलवले नाही. त्यांचा डाव १०८ धावांवर आटोपला. संपूर्ण स्पर्धेत सुसाट राहिलेली गुजरात मेल दिल्ली टायटन्सविरुद्धच्या सामन्यात १३१ धावा करू शकली नाही. विशेष म्हणजे यापैकी काही सामन्यांत पाठलाग करणाऱ्या संघाने निर्धारित २० षटके खेळली आहेत. म्हणजे फलंदाज पूर्णवेळ मैदानात असूनही त्यांना विजयी लक्ष्य गाठता आलेले नाही. गोलंदाजांनी गाजवलेल्या या सामन्यांमुळे आयपीएलकडे निव्वळ फलंदाजांचा खेळ अशा एकांगी दृष्टीने पाहणे आता रास्त ठरणार नाही. अशा सामन्यांचे प्रमाण कमी असले, तरी ते आहे आणि येथे गोलंदाजांनाही वाव आहे. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली, तर मोठ्या फटक्यांसाठी आसुसलेले फलंदाज पटकन जाळ्यात अडकतात किंवा मग ते दबावाखाली येतात आणि त्यांच्या आक्रमकतेची धार अधिक बोथट होते, हे या सामन्यांच्या निमित्ताने समोर येते. अलीकडच्या एक दोन-वर्षांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे बाळसे धरलेले शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल हे युवा खेळाडू यंदाच्या हंगामात दमदार कामगिरी करून गेले. यंदाच्या हंगामाने त्यांच्यावरचा विश्वास अधिक दृढ झाला. दोघांमध्ये जणू काही धावांची स्पर्धाच सुरू होती. दोघेही सलामीवीर आणि दोघांमध्येही एकहाती सामना जिंकवण्याची क्षमता आहे. तेच त्यांनी दाखवून दिले. प्रतिस्पर्धी संघांना आपल्या खेळीचा अभ्यास करण्यास या दोघांनी प्रवृत्त केले. या मोहऱ्यांच्या पैलूंतील दर्शन यंदाचा हंगाम अधिक ठळकपणे दाखवून गेला. अर्थात त्यात आता सातत्य हवे. आंतरराष्ट्रीय सामन्यांत हाच फॉर्म या दोघांनी कायम ठेवायला हवा. स्पर्धेदरम्यान एक मस्त योगायोग जुळून आला. दाक्षिणात्य फलंदाज साई सुदर्शनने त्याचा घरचा संघ चेन्नईला धुतले, तर दुसरीकडे गुजराती जडेजाने गुजरात टायटन्सला जेतेपदापासून दूर ठेवले. यंदाचा हंगाम फलंदाजीपेक्षा आपल्या अचूक निर्णयांच्या टायमिंगने गाजवला तो चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने. धोनीची विस्फोटक फलंदाजी दिसली नसली तरी त्याने काही लिटल कॅमिओ खेळी खेळल्या. त्यापेक्षा त्याच्यातले नेतृत्व किती प्रौढ, परिपक्व आणि अभ्यासू आहे हेच कळते. त्याच्यात एवढ्या चाहत्यांचा जीव का अडकलाय? याचेही उत्तर यंदाचा हंगाम देऊन गेला.

अजिंक्य रहाणे तसा कसोटी स्पेशालिस्ट म्हणून परिचित. त्याला संधी देण्याचे स्वप्नही कुणाला पडणार नाही. प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्सचा संघ, मैदानही त्यांचे घरचे या साऱ्याचा विचार करत धोनीने मुंबईकर रहाणेवर विश्वास ठेवला. या सामन्यात धोनीने अनपेक्षितपणे रहाणेला फलंदाजीला पुढे पाठविले. रहाणेने आपल्यावरचा विश्वास सार्थ ठरवत स्पर्धेच्या शेवटच्या सामन्यापर्यंत संघातील आपली जागा कायम ठेवली. याला म्हणतात धोनीच्या रणनितीतून मुंबईकराकडूनच मुंबईचा काटा काढला. तो तेवढ्यावरच थांबला नाही, तर धोनीने चेन्नईला पाचव्यांदा जेतेपदाचा चषक उंचावून दिला. यंदाच्या हंगामात काही युवा खेळाडूंनी चाहत्यांच्या मनात जागा केली. त्यात सर्वात पुढे होता तो कोलकाताचा रिंकू सिंह. रिंकूने एका सामन्यात शेवटच्या पाच चेंडूंवर पाच षटकार ठोकत केकेआरला विजय मिळवून देत सर्वांनाच अचंबित केले. गुजरातचा साई सुदर्शन, चेन्नईचा शिवम दुबे, मुंबईचा तिलक वर्मा असे काही चेहरे यंदाच्या हंगामातून प्रकाशझोतात आले. यंदा या खेळाडूंना बोलीमध्ये कदाचित तितकी मागणी नसेल. बेस प्राइसला किंवा त्यापेक्षा थोडे अधिक पैसे मोजून त्यांना विकत घेतले असेल कदाचित. पण पुढच्या वर्षी त्यांचा भाव नक्कीच वधारलेला असेल. यंदाची स्पर्धा त्यांच्या भविष्यातील गुंतवणुकीची बेगमी ठरते. त्याहीपेक्षा आगामी भारतीय संघातील दरवाजा या खेळाडूंनी खटखटवला आहे, हे सर्वाधिक महत्त्वाचे. आयपीएल म्हणजे पैशांचा बाजार आणि युवा खेळाडूंचा शोध घेणारी स्पर्धा असे चित्र लोकांच्या नजरेसमोर आहे म्हणण्यापेक्षा तसे बिंबवले जाते. या युवा खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडलेला नसला तरी त्यांच्यातला खेळाडू म्हणून व्यावसायिकपणाचे यंदा चांगलेच मार्केटिंग झाले आहे. युवा खेळाडू म्हणून त्यांची इमेज अधिक उजळून निघाली. यंदाच्या हंगामाचे सर्वात मोठे फलित तेच आहे. युवा खेळाडूंना समोर आणण्यात यंदाचा हंगाम फळलाय. तेच सर्वात महत्त्वाचे आहे. कारण हे युवा खेळाडू भारतीय क्रिकेटचे भविष्य आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -