मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पावसाळयासाठी आपत्कालीन नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. या नियंत्रण कक्षात २४ तास तक्रारींवर पाठपुरावा करुन मुंबई महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, रेल्वे यांसारख्या विविध संस्थाच्या आपत्ती नियंत्रण कक्षांसोबत संवाद साधला जाणार आहे. हे नियंत्रण कक्ष दिनांक १ जून २०२३ पासून ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत कार्यरत राहणार आहे.
प्राधिकरणामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांच्या ठिकाणी वाहनांची व पादचाऱ्यांची गैरसोय कमी व्हावी या उद्देशाने एमएमआरडीएने या नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. पावसाळ्यादरम्यान झाडांची पडझड, पाणी साचणे, अपघात, वाहतूक कोंडी अशा विविध कारणांसाठी नियंत्रण कक्षांकडून नागरीकांना मदत मिळू शकते. नियंत्रण कक्षातील अधिकरी, कर्मचारी तीन पाळ्यांमध्ये कार्यरत असतील.
२०२२ च्या अखेरीस मुंबई उपनगरातील पूर्व द्रुतगती महामार्ग व पश्चिम द्रुतगती महामार्ग हे प्राधिकरणामार्फत बृहन्मुंबई महानगर पालिकेस हस्तांतरीत करण्यात आले असून मुं. म. प्र. वि. प्राधिकरणामार्फत मेट्रो रेल प्रकल्पांची कामे, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प, सांताक्रुझ – चेंबुर लिंक रोड विस्तार प्रकल्प, ऐरोली-कटाई नाका जोडरस्ता व भुयारी मार्ग, शिवडी-वरळी उन्नत मार्ग, पूर्व द्रुतगती महामार्गावरील छेड़ा नगर जंक्शन सुधारणा प्रकल्प तसेच मुंबई महानगर प्रदेशातील विस्तारित एम.यु.आय.पी / ओ.ए.आर.डी.एस. अंतर्गत विविध रस्ते/पूल, उड्डाणपूल अशा विविध प्रकल्पांची कामे सुरु आहेत.
सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना सर्व संबंधित कंत्राटदारांना देण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रकल्पाच्या ठिकाणी सुयोग्य बेरिकेडींग करणे, खराब झालेल्या रस्त्यांची डागडुजी करणे, रस्त्यावर वेळोवेळी जमा होणान्या चिखलाची ताबडतोब विल्हेवाट लावणे इत्यादी सूचनांचा समावेश आहे. ज्या परिसरात सांडपाणी वाहून नेण्याची सोय नाही आणि तसेच ज्या ठिकाणी पाणी जास्त प्रमाणात साचण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणी अतिरिक्त क्षमता असणारे पाण्याचे पंप उपलब्ध करुन देण्याचे निर्देश कंत्राटदारांना देण्यात आले आहेत, अशी माहिती महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी दिली.