Tuesday, March 18, 2025
Homeमहत्वाची बातमीनितेश राणेंनी सांगितली तारीख, 'या' दिवशी उबाठा पक्ष राष्ट्रवादीत विलीन होणार

नितेश राणेंनी सांगितली तारीख, ‘या’ दिवशी उबाठा पक्ष राष्ट्रवादीत विलीन होणार

कणकवली : उद्धव ठाकरे यांचा पक्ष लवकरच राष्ट्रवादीत विलीन होणार असल्याच्या गौप्यस्फोटानंतर आता भाजप आमदार नितेश राणे यांनी थेट तारीखच सांगितली आहे. ही तारीख आहे येणारी १९ जून. नितेश राणे यांनी सडेतोड अंदाजात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचे वाभाडे काढत अनेक गौप्यस्फोट केले. ते म्हणाले, येत्या १९ जूनला उद्धव ठाकरे आपला पक्ष राष्ट्रवादीत विलीन करण्याची घोषणा करणार आहे. महाविकास आघाडी स्थापन होत असताना संजय राऊतांनी दलाली करण्यासाठी तेव्हा २०० कोटी घेतले होते अशी माझी माहिती आहे. तसेच उद्धव ठाकरे गट राष्ट्रवादीत विलीन करण्यासाठी राऊतांना १०० कोटींची ऑफर आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

ते म्हणाले, उद्धव ठाकरेंचा गट अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे. याची घोषणा उद्धव ठाकरे १९ जून रोजी करणार आहेत. हे खरं आहे की खोटं? संजय राऊतांनी सांगावं. १९ जूनला उद्धव ठाकरेंना शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार नाही. शिवसेना ही एकनाथ शिंदेंकडे आहे. उद्धव ठाकरे शिवसेना गट या स्थापनेची तारीख १० ऑक्टोबर २०२२ आहे. कारण त्यादिवशी त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि पक्षचिन्ह मशाल मिळालं आहे. १९ जूनला षण्मुखानंद हॉलमध्ये होणारा उद्धव ठाकरेंचा मेळावा हा अनधिकृत आणि नियमबाह्य आहे. असा मेळावा घेण्याचा अधिकारच उद्धव ठाकरेंना नाही. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार एकनाथ शिंदे जो मेळावा घेणार तो शिवसेनेचा वर्धापन दिवस आहे. दुसऱ्यांचा झेंडा, दुसऱ्यांचा पक्ष यावर बोलण्यापेक्षा काय चाललंय ते बघा. असंही नितेश राणेंनी संजय राऊतांना सुनावलं आहे.

तसंच, पंतप्रधान मोदींवर बोलण्याआधी, भाजपावर बोलण्याआधी, देवेंद्र फडणवीसांवर बोलण्याआधी तुझी आणि तुझ्या मालकांची किती लायकी राहिली आहे त्यावरही एक अग्रलेख येऊ दे, असा खोचक टोलाही नितेश राणेंनी लगावला आहे. राजकीय लावारिस असलेल्यांनी दुसऱ्यांचे आई वडील मोजू नये, असेही नितेश राणे म्हणाले.

संजय राऊत टिनपाट कामगार

यावेळी नितेश राणे यांनी संजय राऊतांवर पुन्हा एकदा निशाणा साधत त्यांचा उल्लेख टिनपाट कामगार असा केला. उद्धव ठाकरेंचा टिनपाट कामगार आज सकाळी येऊन मोदी सरकारमुळे नाकी नऊ आलेले आहे, अराजकता आली आहे असं बरळला. पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे दहशतवादांच्या नाकीनऊ आले आहेत. भ्रष्टाचारी लोकांच्या नाकीनऊ आले आहे. मोदींच्या नेतृत्वात ९ वर्षात देशाने प्रगती केली आहे. कोणीही आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने पाहत नाही. हे राऊत यांच्या सारख्या दलालांना कळणार नाही, अशी टीका नितेश राणे यांनी केली. म्हणे मोदी साहेब लोकांची मन की बात ऐकत नाही, पत्रकार परिषदा घेत नाही. मग तुझ्या मालकाने अडीच वर्षात फक्त फेसबुक लाईव्ह केलं. अडीच वर्षात किती लोकांची मन की बात ऐकली? की फक्त पाटणकरचीच बात ऐकली, असा सवाल नितेश यांनी केला.

लंडनच्या शेठजीचं नाव जाहीर करू का?

तुमच्या मालकाने पाटणकरच्या दावणीला महाराष्ट्र बांधला होता त्यावर बोला. तुमच्या मालकाचा मुलगा रोज संध्याकाळी ७.३० नंतर डिनो मोरियाच्या घरी कोणा कोणाला नाचवायचा? तुमच्या मालकाकडे स्वतःचा झेंडा राहिला नाही. झेंड्याची काठी पण राहिली नाही आणि तुम्ही भाजपच्या झेंड्याबद्दल बोलता? मुंबईत मराठी माणूस राहिला नाही हे तुमच्या मालकामुळे घडलंय. आणि आता शेठजींबद्दल बोलताय? कपडे घ्यायला, परफ्युम विकत घ्यायला, शॉपिंग करायला शेठजी चालतात. लंडनचा खर्च करणाऱ्या शेठजीचे नाव जाहीर करू का?, असा इशारा त्यांनी दिला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -