मुंबई : मुंबई महापालिकेने शाळांचे वर्ग चालविण्यासाठी भाडेतत्वावर घेतलेल्या खोल्या पालिका अधिकाऱ्यांनी संगनमत करुन परस्पर विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर ज्या अधिकाऱ्यांनी हा प्रताप केला त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरुन खोल्या विकणारे तिघे अधिकारी आणि या खोल्या विकत घेणारे सहा जण अशा नऊ जणांवर वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
या अधिकाऱ्यांनी पालिकेचे हे वर्ग हस्तांतरित करण्यासाठी खोटी प्रतिज्ञापत्रे, खोटे रेशनकार्ड, खोट्या सह्यांचा वापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
बीडीडी चाळ क्रमांक १०० आणि ८४ मध्ये हा प्रकार घडला आहे. धक्कादायक म्हणजे शाळांसाठी असलेल्या तब्बल सहा खोल्यांची परस्पर विक्री करुन त्याचे खासगी व्यक्तींकडे हस्तांतरणही करण्यात आले आहे. हा सर्व प्रताप करण्यासाठी अधिकाऱ्यांनी खोटी प्रतिज्ञापत्रे, खोटे रेशनकार्ड, खोट्या सह्यांचा वापर केल्याचेही पुढे येत आहे. प्रसारमाध्यमांतून याबाबत वृत्त प्रसारीत होताच पालिका आणि शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.
शाळांच्या खोल्या विक्री प्रकरणी नऊ जणांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे तीन अधिकारी आणि ज्यांच्या नावावर वर्गखोल्या हस्तांतरण करण्यात आल्या त्या सर्वांचा समावेश असल्याचे समजते. पोलीस तपास करत असून आणखीही काही महत्त्वाची नावे आणि प्रकरणे पुढे येण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने या परिसरातील (बीडीडी चाळ) जवळपास १५ इमारतींमध्ये साधारण ६६ खोल्या वर्ग चालविण्यासाठी भाड्याने घेतल्या आहेत. त्यापैकी खोल्या विक्री केल्याची माहिती पुढे आलेल्या चाळ क्रमांक १०० आणि ८४ मधील खोल्यांमध्ये मराठी आणि तेलुगू माध्यमांचे वर्ग भरत असत. इमारत जिर्ण होत आल्याने देखभाल, दुरुस्तीच्या कारणामुळे या दोन्ही खोल्या खाली करण्यात आल्या होत्या. या खोल्यांतील विद्यार्थी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापालिका शाळेत पाठविण्यात आले होते. त्याचाच फायदा घेत, या खोल्यांची विक्री करण्याचा धक्कादायक प्रकार घडला.