नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला ९ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने देशभरात पक्षाकडून या ९ वर्षांचा लेखाजोखा जनतेसमोर ठेवला जात आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी मोदी सरकारच्या ९ वर्षातील कामगिरीची माहिती दिली. मोदी सरकारची ९ वर्षे सुरक्षा आणि राष्ट्रीय अभिमानाची वर्षे असल्याचे वर्णन करताना शाह म्हणाले की, मोदींच्या नेतृत्वाखाली आज देश सुरक्षित आहे.
अमित शाह यांनी ट्विट करून लिहिले की, मोदी सरकारची ९ वर्षे सुरक्षा, राष्ट्रीय अभिमान, विकास आणि गरीब कल्याण यांच्या अभूतपूर्व संयोजनाची ९ वर्षे आहेत. आज एकीकडे मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश सुरक्षित आहे आणि जगात अभिमानाचे नवे आयाम निर्माण करत आहे, तर दुसरीकडे सरकारने विकासाचे आणि गरिबांच्या कल्याणाचे नवे मापदंड प्रस्थापित केले आहेत.
सुशासन और गरीब कल्याण का सुनहरा काल, जन सेवा के 9 साल!#9YearsOfSeva pic.twitter.com/dAgGWKzPes
— Amit Shah (@AmitShah) May 30, 2023
शाह यांनी पुढे म्हटले आहे की, नरेंद्र मोदींनी घर, वीज, गॅस आणि आरोग्य विमा यासारख्या अनेक मूलभूत सुविधा देऊन गरीबांचे जीवनमान उंचावले आहे. हा वर्ग प्रथमच देशाच्या विकासाच्या प्रवासाशी स्वत:ला जोडलेला वाटत आहे. देशाने पहिल्यांदाच ग्रामीण आणि शहरी भारताचा समांतर विकास पाहिला आहे.
कोरोना महामारीच्या प्रभावातून अनेक विकसित देश अद्याप बाहेर आलेले नसताना नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झपाट्याने वाढणारी भारतीय अर्थव्यवस्था जगासमोर आदर्श ठरली आहे. आधुनिकता आणि सांस्कृतिक वारसा एकत्र घेऊन नरेंद्र मोदी आत्मनिर्भर भारतासाठी दृढनिश्चयी भावनेने काम करत आहेत.