Tuesday, April 22, 2025
Homeसंपादकीयविशेष लेखसंवेदना, लातूर...

संवेदना, लातूर…

सेवाव्रती : शिबानी जोशी

संपूर्ण समाजासाठी म्हणजेच समाजातल्या विभिन्न वर्गांसाठी संघ कार्यकर्ते आपापल्या भागात निरलसपणे कार्य करत असतात. संघाच्या देशभरात चालणाऱ्या विविध संस्था पाहिल्या तर आपल्या हे लक्षात येत. दिव्यांग किंवा शारीरिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींसाठी अनेक ठिकाणी संघाची किंवा शासनाची केंद्र आज उपलब्ध आहेत; परंतु २० एक वर्षांपूर्वी बुद्धी बाधित म्हणजेच सेरेब्रल पाल्सी, डाऊन सिंड्रोम, बहुविकलांग, बौद्धिक अपंगत्व, ऑटीझम अशा विकलांगतेने ग्रस्त मुलं तसेच व्यक्तींसाठी फारच कमी केंद्र उपलब्ध होती. मुंबई, पुणेसारख्या शहरात सरकारी रुग्णालयांमध्ये त्यांच्यासाठी सोयी आहेत; परंतु अर्ध शहरी किंवा ग्रामीण भागात बुद्धिबाधितांच्या सोयी-सुविधा, उपचारांची (फिजीओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी) वानवाच होती. सुरेश आणि दीपा पाटील हे दांपत्य लातूर भागात सामाजिक कार्यात नेहमीच भाग घेत असत. त्यांचा मुलगा बहुविकलांग असल्यामुळे अशा मुलांच संगोपन करणं किती कठीण आणि क्लेशदायक आहे, हे त्यांना माहिती होतं. आपल्या भागात अशा तऱ्हेची एकाच छताखाली बुद्धिबाधित मुलांना सर्व सुविधा, औषध उपचार मिळावे अशी व्यवस्था नव्हती. ती व्हावी यासाठी पाटील दांपत्याने प्रयत्न सुरू केले. त्यासाठी सुरुवातीला दीपा पाटील यांनी स्वतः मुंबईमध्ये येऊन स्पास्टिक सोसायटी ऑफ इंडियामध्ये अशा मुलांसाठी असलेला एक वर्षाचा प्रशिक्षण कोर्स पूर्ण केला. सुरुवातीला डॉक्टर कुकडे यांच्या विवेकानंद रुग्णालयाच्या छोट्याशा जागेत २००६ साली केंद्र सुरू केलं. लातूर आणि आसपासच्या ग्रामीण भागातील मुलांना याचा लाभ द्यायला सुरुवात केली.संवेदना केंद्र हे सर्व प्रकारच्या दिव्यागांसाठी विशेषतः बुद्धी बाधित मुलांसाठी खासकरून सुरू केलेलं केंद्र आहे. आपल्या भागात अशा प्रकारचे केंद्र सुरू झाल्यानंतर लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पालक आपल्या बालकांना घेऊन येऊ लागले. सुरुवातीला आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे भौतिक सुविधा कमी होत्या; परंतु जनकल्याण समिती आणि दानशूर व्यक्तींच्या सहकार्यामुळे एक एक थेरपी केंद्र वाढत गेलं. स्पेशालिस्ट डॉक्टर, फिजिओथेरपी, स्पीच थेरपिस्ट बोलवायला सुरुवात झाली. ग्रामीण भागातील मुलांचा मुख्य प्रश्न त्यांची ने-आण करणं हा असतो. कारण जिल्ह्याचा ग्रामीण भाग शहरापासून खूप दूर असतो. त्यात आर्थिक स्थिती नसते. त्यामुळे या मुलांकडे पालकांची हेळसांड होते. त्यांना अगदी चौकात घेऊन या सांगितलं तरी ते शक्य होत नाही. त्यांच्या घरापर्यंत पोहोचावं लागतं यासाठी विमल प्रभू देसाई ट्रस्ट, पुणे आणि GIC यांनी मदत केली आणि छोट्या गाड्यांची व्यवस्था झाली. या गाड्यांमधून त्या मुलांची घरपोच ने- आण संवेदना प्रकल्पातर्फे करण्यात येऊ लागली. काम करत असताना हळूहळू त्यांना असं लक्षात येऊ लागलं की, बालकांबरोबर पालकांनाही प्रशिक्षण देण्याची तितकीच गरज आहे. सामाजिक, मानसिक मनोबल उंचावण्यासाठी तसेच मुलांची योग्य काळजी घेण्यासाठी पालकांचे प्रशिक्षण आणि समुपदेशन याची गरज आहे. त्यामुळे पालकांसाठी निवासी प्रशिक्षण शिबिरे घ्यायला सुरुवात झाली. दरवर्षी अशा प्रकारची प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जातात, असं पाटील यांनी सांगितलं. रा. स्व. संघ जनकल्याण समितीचे काम असल्यामुळे यापैकी जवळजवळ ९० टक्के कार्य ही नि:शुल्क चालतात.

आजही आपल्या देशामध्ये अशा मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन फारच वेगळा असतो. अशा मुलांना बाहेर घेऊन जाण्यासाठी पालक कचरतात, या मुलांकडे आणि पालकांकडे एक तर कीव, सहानुभूती किंवा टाळण्याचे कटाक्ष टाकले जातात. ही मुलं केवळ त्या कुटुंबाची नसून समाजाची जबाबदारी आहे, अशी जाणीव निर्माण करण्याचं काम संवेदना करते. संवेदना या नावाप्रमाणेच संवेदनशील कुटुंब आणि समाज घडावा यासाठीच संवेदना विविध उपक्रम आणि प्रकल्प राबवत असते.

संवेदनामध्ये आज जवळपास २२ जणांचा स्टाफ आहे. यात न्युरोफिजिशिअन, फिजिओथेरपिस्ट, स्पीचथेरापिस्ट, ऑक्युपेशनल थेरापिस्ट, क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, ७ विशेष शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. संवेदना प्रकल्पाचे विविध उपक्रम आहेत. पहिला म्हणजे संवेदना डे केअर केंद्र. ही शाळा केवळ बुद्धिबाधित मुलांसाठी चालवली जाते. या केंद्रात सध्या ऐंशी मुलं जाऊन येऊन प्रशिक्षण, आरोग्य सुविधांचा लाभ घेत आहेत. ज्या मुलांचा बुद्ध्यांक चांगला आहे अशा मुलांसाठी शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांचा स्वतंत्र अभ्यासक्रम आहे, याचा उपयोग या ठिकाणी केला जातो. दिव्यांग कल्याण विभागाने अपंगांसाठी तयार करण्यात आलेल्या विशेष शिक्षणाचा उपयोग करून पहिली ते दहावीपर्यंतच्या वर्गांची रचना करण्यात आली आहे. त्यामुळे संवेदना शाळेतील सेरेब्रल पाल्सी असलेले काही विद्यार्थी १० वी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. या मुलांपैकी आतापर्यंत नऊ मुलं दहावी उत्तीर्ण होऊन काही कामही करू लागले आहेत. त्यानंतर यापैकीच काही मुलं अठरा वर्षांच्या वयाच्या पलीकडे झाली की, त्यांच्यासाठी वसतिगृह उपलब्ध करण्यात आले आहे, यामध्ये वीस मुलांची सोय केलेली आहे. लातूरपासून ४० किलोमीटर अंतरावर नदिहत्तारगा ता. निलंगा येथे दोन एकर जमिनीवर हे कायमस्वरूपी निवारा केंद्र आणि राष्ट्रीय न्यासच्या सहकार्याने घरोंदा सेंटर चालवलं जात. सध्या तिथे २० मुलं राहत आहेत. या निवासी संकुलामध्ये मुलांच्या कुवतीनुसार द्रोण बनवणे तसेच कागदी कप बनवणे, झाडे लावणे अशा प्रकारची कामं दिली जातात आणि त्यांच्या कुवतीनुसार काम दिलं जातं. त्याशिवाय आपल्या संस्कृतीत ज्याला पवित्र स्थान आहे, अशा गाईसुद्धा इथे पाळल्या आहेत आणि गोमूत्रापासून वस्तू, धूप, अगरबत्ती बनवणं असे उद्योग संकुलामध्ये केले जातात. तिसरा उपक्रम म्हणजे सर्व प्रकारच्या दिव्यांगांसाठी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र चालवलं जातं. या केंद्रामध्ये सर्व प्रकारच्या दिव्यांगांसाठी सेवा पुरवल्या जातात. यात अंध, कर्णबधिर, शारीरिक अपंग अशा सर्वच २१ प्रकारच्या दिव्यांगांचा समावेश आहे, केंद्र शासनाच्या दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाचा हा उपक्रम आहे. संवेदना केंद्राला लातूर जिल्ह्यातील काम देण्यात आलं आहे. आणखी एक उपक्रम म्हणजे राष्ट्रीय स्तरावर जसा राष्ट्रीय न्यास बुद्धिबाधितांसाठी काम करतो तसे राज्यस्तरावर स्नॅक ही एजन्सी दिव्यांगांसाठी काम करत असते, त्यांची नोडल एजन्सी म्हणून संवेदना केंद्र काम करते. खरंतर केंद्र सरकार किंवा राज्य सरकार अपंगांसाठी विविध योजना राबवत असतं; परंतु या योजना दिव्यांगांपर्यंत पोहोचत नाहीत किंवा त्यासाठी आपण त्याचा लाभ कसा घ्यावा? हे त्यांना माहीत नसतं. या योजनांचा लाभ त्यांना द्यावा यासाठी संवेदना केंद्र अपंग आणि त्यांच्या पालकांना मदत करण्याचं काम करते. उदाहरणार्थ, संजय गांधी निराधार योजना, निरामय आरोग्य योजना, स्वतंत्र रेशन कार्ड, कायदेशीर पालकत्व इत्यादी योजना सरकार दिव्यांगांसाठी राबवत असतं. या सर्व योजनांची संपूर्ण राज्यातील नोडल एजन्सी म्हणून संवेदना केंद्र काम पाहतं. पाचवा उपक्रम सुद्धा दिव्यांगांसाठी अतिशय उपयोगी आहे. बऱ्याच वेळा ज्या घरात दिव्यांग असतात, त्या घरात संपूर्ण घरपण बाधित झालेलं असत. अशा पालकांना मुलांमुळे कुठल्याही सामाजिक, सांस्कृतिक कार्यामध्ये सहभागी होता येत नाही, हे लक्षात आल्यावर या पालकांना थोड्या काळासाठी बाहेरगावी जायचं असेल तर ते संवेदना केंद्रामध्ये थोड्या काळासाठी आपली मुलं सुखरूप, सुरक्षित ठेवून जाऊ शकतात. ही खरोखरच एक आगळीवेगळी सोय संवेदना केंद्राच्या वास्तूमध्ये करण्यात आली आहे, त्याला अंशकालीन निवासव्यवस्था म्हटलं जातं.

बऱ्याच दिव्यांग आणि त्यांच्या पालकांना थेरपीसारख्या सेवा घेण्यासाठी शहरात यावं लागतं. अशा मुलांना आणि त्यांच्या पालकांना तात्पुरत राहण्याची व्यवस्था संवेदना केंद्रामध्ये करण्यात येते. अशा तऱ्हेने सर्व प्रकारच्या बाधित मुलांसाठी वेगवेगळे उपक्रम संवेदनशील वृत्तीने संवेदनामध्ये राबवले जात आहेत आणि त्याचा उपयोग लातूर आणि आसपासच्या अशा कुटुंबांना होत आहे. या सर्व योजना राबवण्यासाठी प्रशस्त जागा आणि अडथळाविरहीत वर्ग खोल्यांची गरज असते. चांगलं आणि प्रामाणिक काम करणाऱ्या संस्थांना समाजाकडून नेहमीच मदतीचा हात उत्स्फूर्तपणे मिळतो, त्याप्रमाणेच सेवा यूके या इंग्लंडमध्ये राहणाऱ्या भारतीय लोकांच्या संस्थेन संवेदना प्रकल्पाची इमारत बांधण्यासाठी भरीव मदत केलेली आहे. अशी इमारत बांधल्यामुळे लातूरसारख्या शहरांमध्ये बुद्धिबाधीत आणि सर्व प्रकारच्या दिव्यांगांना उपचार प्रशिक्षण देणारी संवेदनक्षम असा एक प्रकल्प उभा राहिला. संस्थेला या कामासाठी राष्ट्रीय पुरस्कार आणि राज्यातील अन्य नामांकित ही पुरस्कार मिळाले आहेत. या दिव्यांग तसेच बुद्धिबाधिताना केवळ औषधोपचार देऊन पुरणार नाही, तर त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं यासाठी त्यांच्या कुवतीनुसार त्यांना औद्योगिक प्रशिक्षण देणारी ‘संवेदना औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ सुरू करण्याची योजना आहे आणि त्या दृष्टीने संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -