२ जून रोजी कार्यक्रमाचे आयोजन
मुंबई (वार्ताहर) : क्रिकेट विश्वामध्ये आपले विशिष्ट स्थान निर्माण करणारा गोलंदाजांचा कर्दनकाळ सचिन तेंडुलकर आणि त्याच्यासारख्या कैक यशस्वी खेळाडूंच्या पराक्रमाचा ‘आँखो देखा हाल’ क्रिकेट शौकिनांपर्यंत आपल्या खास शैलीत पोहोचविणारे द्वारकानाथ तथा पप्पू संझगिरी हे २ जून २०२३ रोजी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहाच्या मंचावर पाहावयास मिळणार आहेत. सचिनने नुकताच म्हणजे २४ एप्रिल रोजी आपला ५०वा वाढदिवस साजरा केला. त्याची साधारण अडीच दशकांची कारकिर्द संझगिरींनी अगदी जवळून पाहिली आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून सचिनची ‘गोल्डन ज्युबिली’ साजरी करण्याचे संझगिरी यांनी योजिले आहे.
संझगिरी यांनी ‘शतकात एक सचिन’ हे क्रिकेट महानायकावर एक पुस्तक लिहिले असून त्याचे ‘सिन्टिलेटिंग सचिन – स्टोरी बियाँड स्टँटस’ असे इंग्रजीत रुपांतर केले आहे. ही दोन्ही पुस्तके ग्रंथालीने प्रकाशित केली आहेत. भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, धडाडीचे सलामीवीर अंशुमन गायकवाड, यष्टीरक्षक किरण मोरे, वेगवान गोलंदाज झहीर खान, कसोटीपटू तसेच प्रशिक्षक प्रवीण अमरे, जाहिरात जगातील अग्रेसर प्रल्हाद कक्कर, नामवंत पार्श्वगायक शान, अभिनेते प्रशांत दामले, अभिनेता सुमीत राघवन, विनोदवीर विक्रम साठे, हृषिकेश जोशी, शल्यविशारद डॉ. अनंत जोशी, क्रीडा समालोचक हर्षा भोगले असे अनेक अग्रगण्य या समारंभाचे आकर्षण असणार आहेत. हे सारे आपापले अनुभव आणि खास करून या दोन व्यक्तिमत्त्वांशी निगडीत कथा-किस्से ऐकविणार आहेत.चार वेगवेगळ्या भागांमध्ये हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे.