Tuesday, January 21, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यजादू सूर संजीवनची...

जादू सूर संजीवनची…

महेश धर्माधिकारी

‘तानसेन’ आणि ‘बैजू बावरा’ यांच्या काळात विशिष्ट राग गाऊन दिवे पेटवल्याबद्दल तसेच पाऊस पाडल्याबद्दल आपण ऐकलं आहे. संगीताने अनेक व्याधींवरही उपचार करता येतात, हेही ऐकलं आहे. अनेकदा कानावर पडलेली ही माहिती विश्वासार्ह वाटत नाही. पण हे खरे आहे. संगीतोपचार ही उपचारांची एक लक्षवेधी शाखा आहे. ठरावीक राग ऐकून व्याधी बऱ्या होतात. फक्त त्या त्या रागांची, संगीतप्रकारांची चोख माहिती हवी.

मानव आणि प्राण्यांमधलं वेगळेपण सिद्ध करणाऱ्या अनेक बाबी असल्या तरी संगीत ही त्यातली महत्त्वाची बाब म्हणायला हवी. संगीतामुळे जगण्याला एक अर्थ मिळतो. एखादी व्यक्ती दुःखी किंवा निराश असेल, तर तिचा मूड बदलण्यासाठी संगीताला पर्याय नाही. संगीतामुळे मनावरचा ताण कमी होतो, सकारात्मकता वाढते, असं आपण नेहमी ऐकतो. पण संधिवातासारख्या गंभीर व्याधींवरही संगीतोपचार अर्थात ‘म्युझिक थेरपी’ प्रभावी ठरू शकते. यावर बोलताना प्रसिद्ध सतारवादक आणि संगीतोपचारतज्ज्ञ डॉ. शशांक कट्टी म्हणतात, ‘भारतीय शास्त्रीय संगीत हे आरोग्य संगीत आहे.’ भारतीय शास्त्रीय संगीतात प्रत्येक रागाचे स्वर, आरोह, अवरोह आणि गाण्याची – ऐकण्याची वेळठरलेली असते. याबाबतचे नियम अत्यंत कडक असतात. त्यात थोडाही बदल केलेला किंवा झालेला चालत नाही. ते संगीतज्ज्ञांच्या लगेच लक्षातयेतात आणि ते गाणज्च्याऱ्या किंवा वादकाच्या लगेच लक्षात आणून दिले जातात. संगीताने केवळ मनोरंजन होणे किंवा फार तर मन:शांती मिळणे, असे परिणाम होत असतील तर एवढे कडक नियम कशासाठी? प्रत्येक रागात काही ठरावीक स्वर वर्ज्य का? या प्रश्नांची उत्तरे देताना पंडित शशांक कट्टी म्हणतात, ‘हे कडक नियम आरोग्यासाठीच असतात. मानसशास्त्राच्या नियमानुसार डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा या पंचेंद्रियांद्वारे आपल्या शरीरात जाणारी किंवा शरीराला जाणवणारी प्रत्येक गोष्ट आपल्या शरीरावर इष्ट किंवा अनिष्ट परिणाम करत असते. अर्थातच संगीताचाही आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. एखाद्या रुग्णाने योग्य वेळी योग्य राग ऐकल्यास सकारात्मक परिणाम नक्कीच दिसून येतो. हे शास्त्रीयदृष्ट्याही सिद्ध झालं आहे.

कोणता राग कोणत्या व्याधीवर प्रभावी ठरतो हे माहीत असेल, तर कोणीही संगीतोपचारतज्ज्ञ होऊ शकतो आणि व्याधीग्रस्तांवर उपचार करू शकतो. पण हे वाटतं तेवढं सोपं नाही. आपण रोज जेवणामधून खात असलेल्या पदार्थांमधून आपल्या शरीराला आवश्यक असलेले जीवनसत्त्वादी घटक मिळत असतात. पण आजारी पडल्यावर रोजच्या जेवणाने बरं वाटत नाही. त्यासाठी औषधच घ्यावं लागतं. त्याचप्रमाणे निरोगी शरीर आणि मनासाठी ठरावीक वेळी ठरावीक राग ऐकणं फायदेशीर ठरतं. पण आजारी पडल्यावर तेच राग व्याधी दूर करण्यासाठी वापरता येत नाहीत. अशा वेळी काही बदल करून ते राग ठरावीक वेळी आणि कदाचित त्यांच्या ठरलेल्या वेळेपेक्षा वेगळ्याच वेळी ऐकावे लागतात. तरच त्यांचा औषध म्हणून उपयोग होतो. मुळात शरीराला कोणतीही व्याधी जडते म्हणजे शरीरातील काही घटकांमध्ये असमतोल तयार होतो. हा असमतोल दूर करून योग्य समतोल साधल्यास ती व्याधी दूर होते. प्रत्येक उपचारपद्धतीचा व्याधीकडे किंवा शरीराकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. आयुर्वेदानुसार आपल्या शरीरात कफ, पित्त आणि वात हे तीन दोष कार्यरत असतात. त्या दोषांचं संतुलन योग्य असल्यास शरीर निरोगी असतं पण ते बिघडल्यास व्याधीग्रस्त असतं. औषधोपचारांनी या तीन दोषांचं संतुलन साधण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजेच दोषातील समतोल बिघडला, तर आपण आजारी पडतो आणि औषधांच्या साह्याने तो समतोल पुन्हा साधला गेल्यास आपण बरे होतो.

संगीतोपचार शास्त्रानुसार आपल्या शरीरात विविध प्रकारच्या ऊर्जा कार्यरत असतात. या ऊर्जांचा समतोल बिघडला की, आपण आजारी पडतो आणि योग्य राग ऐकल्यावर त्या ऊर्जांचा समतोल पुन्हा साधला जातो आणि व्याधी बरी होते. पंडितजींच्या मते नेहमीच्या जेवणाप्रमाणेच राग जसाच्या तसा ऐकून फारसा फायदा होत नाही. त्यात व्यक्ती आणि व्याधीच्या तीव्रतेनुसार काही बदल करावे लागतात. यातूनच ‘सुरावली’ तयार होतात. संगीतोपचारासाठी ठरावीक वाद्य लागतं, असा काही नियम नाही. त्या त्या सुरावली कोणत्याही वाद्यावर वाजवून किंवा प्रत्यक्षात गाऊनही तोच परिणाम साधता येतो. संगीतोपचाराची परिणामकारकता शास्त्रीयदृष्ट्या योग्य ठरवण्याचं एक मोठं आव्हान होतं. त्यासाठी पंडितजींनी विविध व्याधींच्या रुग्णांवर अनेक प्रयोग केले. त्या प्रयोगांचा ‘डेटा’ जमा करून शास्त्रीय विश्लेषण केलं. त्यातून त्यांचे उपचार योग्य असल्याचे सिद्ध झाले. शास्त्रीय सतारवादक आणि संगीतकार असलेले डॉ. शशांक कट्टी संगीतोपचाराकडे कसे वळले याचीही रंजक कहाणी आहे. पंडितजींनी सतारवादनाचे अनेक कार्यक्रम केले आहेत. त्यांनी आपले बंधू सुनील यांच्याबरोबर शांक-नील या नावाने संगीत दिग्दर्शनही केलं आहे. आशा भोसले, सुमन कल्याणपूर, अनुप जलोटा, जगजित सिंग, पं. जीतेंद्र अभिषेकी, यांच्यासारखे अनेक ख्यातनाम गायक त्यांच्याकडे गायले आहेत. लक्ष्मीकांत-प्यारेलाल, सुधीर फडके, यशवंत देव अशा मातब्बर संगीतकारांबरोबरही त्यांनी काम केलं आहे. पुढे आध्यात्मिक गुरू नानामहाराज तराणेकर यांनी संगीतोपचारांकडे वळण्याचा सल्ला दिला. संगीतोपचाराद्वारे मानवतेची सेवा कर, असा आदेशच त्यांनी दिला.

गुरूंचा आदेश शिरसावंद्य मानून त्यांनी संगीतोपचाराचे प्रयोग सुरू केले. परिचयातील लोकांना बोलावून त्यांना त्यांच्या व्याधींवर विविध राग ऐकवण्याचा शिरस्ता सुरू झाला; पण सुरुवातीला त्यात काही यश मिळेना. मग त्यांनी आणखी संशोधन करून रागांमध्ये काही बदल करून पाहिले. वेगवेगळ्या सुरावली तयार केल्या. या सुरावलींचा योग्य परिणाम दिसू लागला. आरोग्याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी त्यांनी आयुर्वेदाचा सखोल अभ्यास सुरू केला. त्यातून त्यांना आयुर्वेद आणि शास्त्रीय संगीतातील अनेक साम्यस्थळं दिसू लागली. हळूहळू त्यांच्या सुरावली अधिकाधिक अचूक आणि प्रभावी होत गेल्या. त्यातूनच ‘सूर संजीवन उपचारपद्धती’ विकसित झाली. अर्थात यात गुरूंच्या आशीर्वादाचा वाटा मोठा असल्याचे ते मान्य करतात. हे कार्य गेली २६ वर्षं अव्याहतपणे सुरू आहे. पंडितजींच्या या कार्याची दखल घेऊन भारत आणि अमेरिकेच्या शासनांची मान्यता असलेल्या ‘वर्ल्ड पीस इन्स्टिट्यूट ऑफ युनायटेड नेशन्स’ या संस्थेने त्यांना पीएच. डी. देऊन सन्मानित केलं आहे. सुरुवातीला डॉ. कट्टी रुग्णांसमोर बसून स्वतः लाईव्ह सतार वादन करत असत. पण नंतर त्यांनी विविध सुरावली ध्वनिमुद्रित करून ठेवल्या आणि त्या रुग्णांना ऐकण्यासाठी दिल्या. पुढे प्रगत तंत्रज्ञानाची मदत घेऊन त्यांनी एक ‘वेब पोर्टल’ तयार केलं. आता ते रुग्णांवर दूरस्थ पद्धतीनेही (ऑनलाइन) उपचार करतात. वेब पोर्टलवर लॉगिन नेम आणि पासवर्ड टाकल्यावर रुग्णाला त्याच्या व्याधीसाठीची सुरावली ऐकता येते.कोविडच्या काळात रुग्णांच्या फुप्फुसाची कार्यक्षमता वाढावी म्हणून त्यांनी सुरावली तयार केली. डॉक्टर शेखर आंबर्डेकर या मुंबईच्या प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार त्यांनी एक प्रयोग केला. यात डॉ. संगीता सांगवीकर यांनीही मदत केली. या प्रयोगासाठी एक शास्त्रोक्त प्रोटोकॉल तयार करण्यात आला. त्यानुसार ४० रुग्णांची निवड करण्यात आली. या सर्व रुग्णांना नियमित औषधोपचारांबरोबरच ठरावीक सुरावली ऐकवण्यात आल्या. यासाठी दोन प्रकारच्या सुरावली तयार करण्यात आल्या होत्या. एक संगीतोपचारानुसार नेहमीच्या रागात आवश्यक बदल करू॒न तयार करण्यात आली, तर दुसरी ऐकायला सारखी असली तरी त्यातून उपचार होणार नव्हते. रोज ठरावीक वेळी सर्व रुग्णांना या सुरावली ऐकवून सहा मिनिटांची चालण्याची चाचणी घेण्यात आली. पंधरा दिवसांमध्ये संगीतोपचाराची सुरावली ऐकणाऱ्या रुग्णांच्या चालण्यात सरासरी २८५ मीटरची सुधारणा दिसून आली, तर दुसरी सुरावली ऐकणाऱ्या रुग्णांच्या चालण्यात सरासरी ८५ मीटरचीच सुधारणा दिसून आली. हे एक मोठं यश होतं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -