चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील आणि काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचे आज सकाळी उपचारादरम्यान निधन झाले. वयाच्या अवघ्या ४७ व्या वर्षी किडनी स्टोनसारख्या आजारावर उपचार घेत असताना त्यांची प्राणज्योत मालवल्याने राज्य व काँग्रेस पक्षावर शोककळा पसरली आहे. बाळू धानोरकर यांच्या पश्चात पत्नी आमदार प्रतिभा, दोन मुले असा परिवार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर किडनीसंबंधी आजारासाठी नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथे त्यांच्यावर किडनी स्टोन शस्त्रक्रियाही झाली. परंतु शस्त्रक्रियेदरम्यान प्रकृती खालावत गेल्याने २८ मे ला एअर अॅम्ब्युलन्सद्वारे त्यांना नागपूरहून दिल्लीत उपचारांसाठी हलवण्यात आले. दिल्लीतील मेदांता रुग्णालयात त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. अखेर, आज मध्यरात्री सव्वादोनच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.
खासदार बाळू धानोरकर यांचे वडिल नारायण धानोरकर यांचं चार दिवसांपूर्वीच निधन झालं. त्यांच्या पार्थिवाचं दर्शन बाळू धानोरकरांनी घेतलं. परंतु, प्रकृती अस्वास्थतेमुळे ते अंतिम संस्काराला जाऊ शकले नाहीत. अखेर, आज पहाटे बाळू धानोरकर यांचंही निधन झालं. पिता-पुत्राच्या निधनामुळे धानोरकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
बाळू धानोरकर हे मूळचे शिवसैनिक होते. स्थानिक पातळीवर जम बसवल्यानंतर त्यांनी शिवसेनेकडूनच आमदारकी मिळवली. २०१९ च्या निवडणुकीत बाळू धानोरकर यांना काँग्रेसमधून खासदारकीचं तिकिट मिळालं. त्यामुळे त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. वयाच्या अवघ्या ३९ व्या वर्षी आमदार झालेले बाळू धानोरकर २०१९ मध्ये खासदार झाले. त्यांनी पत्नी प्रतिभा धानोरकर यांनाही विधानसभेत निवडून आणले.
धानोरकर यांचे पार्थिव दिल्ली येथून नागपूरमार्गे वरोरा येथील निवासस्थानी दुपारी १.३० वाजता आणण्यात येणार आहे. हे पार्थिव आज ३० मे रोजी दुपारी २ वाजल्यापासून ३१ मे रोजी सकाळी १० वाजेपर्यंत वरोरा येथील निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर ३१ मे रोजी वणी – वरोरा बायपास मार्ग येथील मोक्षधाम येथे सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.