हवामान खात्यानेही दिला इशारा
मुंबई : मान्सून दाखल होण्यास काही दिवस शिल्लक असले तरी राज्यावर असलेले अवकाळी पावसाचे संकट अद्यापही दूर होण्याची कोणतीच चिन्हे नाहीत. राज्यात अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा हवामान विभागानेही अंदाज वर्तवला आहे.
हवामान विभागाने म्हटले आहे की, राज्यातील बहुतांश भागांमध्ये आज पावसाची शक्यता आहे. राज्यातील वातावरण आज काहीसे संमिश्र राहील. काही ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळेल तर काही ठिकाणी कडक उन पडू शकते. मात्र काही ठिकाणी हवामान ढगाळ राहील.
राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी अगदीच कडक उन्हाचे चटके अनुभवावे लागत आहेत. दरम्यान, मुंबई, कोकण किनारपट्टीलगतच्या भागात हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी झालेले नाही. परिणामी नागरिकांना उन्हाच्या तीव्र झळांना सामोरे जावे लागत आहे.
पुढचे २४ तास विदर्भ आणि मराठवाड्यासाठी महत्त्वाचे ठरतील. या विभागांमध्ये पावसाचा जोर पाहायला मिळू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूर आदी ठिकाणी उकाडा कायम आहे. शिवाय ठाणे, मुंबई शहरातील दमट वातावरणातही उकाडा कायम आहे. हिंगोली, भंडारा, गोंदिया, नागपूरसह नजिकच्या भागांमध्ये मात्र, अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पाऊस पडलेल्या जिल्ह्यांमध्ये आणि भागांमध्ये काहीसा थंडावा अनुभवता येतो आहे.
दरम्यान, भारतीय हवामान खात्याने पुढचे तीन ते चार तासांमध्ये काही राज्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. यामध्ये राजस्थान, पंजाब, मध्य प्रदेश, जम्मू आणि काश्मीर आणि अंदमान निकोबार बेटांचा समावेश आहे. या राज्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असल्याचेही आयएमडीने म्हटले आहे.