Saturday, August 23, 2025

मेट्रो मार्ग ‘२ ब’च्या मंडाळे कारडेपोचे काम ७० टक्के पूर्ण

मेट्रो मार्ग ‘२ ब’च्या मंडाळे कारडेपोचे काम ७० टक्के पूर्ण

पहिल्या टप्प्यातील ९६ टक्के कामे पूर्णत्वास

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) डी. एन.नगर-मंडाळे या मेट्रो मार्ग-२ब मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. या मार्गावर धावणाऱ्या मेट्रो गाड्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी मंडाळे येथे कारशेड उभारण्यात येत आहे. या डेपोचे सुमारे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्यातील कामे ९६ टक्के पूर्ण झाली असून या टप्प्यातील १८ लाईनचे काम पूर्ण झाले आहे. तर टप्पा २ मधील कामे ३६ टक्के पूर्ण झाली आहेत.

एमएमआरडीए ३०.४५ हेक्टरपेक्षा जास्त जागेवर मानखुर्द मंडाळे येथे कारडेपो विकसित करत आहे. मंडाळे डेपो हा डी.एन. नगर ते मंडाळे या २३.६४ किमी लांबीच्या मुंबई मेट्रो लाईन २ ब मार्गाचा अविभाज्य भाग आहे. या डेपोमध्ये स्टेबलिंग यार्डच्या दोन स्तरांवर ८ डब्यांची ७२ रेक बसविण्याची क्षमता असेल. मंडाळे डेपोमध्ये सर्व गाड्यांचे मोठे फेरबदल, सर्व किरकोळ वेळापत्रक आणि दुरुस्ती, अवजड उपकरणे बदलण्यासाठी लिफ्टिंग आणि चाचणी, अवजड उपकरणांची दुरुस्ती यासह विविध सुविधा असतील.

हा मार्ग २३ किलो मीटर असून यामध्ये एकूण २० उन्नत स्थानकांचा समावेश आहे. हा मार्ग पश्चिम द्रुतगती मार्ग, पूर्व द्रुतगती मार्ग, पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे, मोनोरेल, दहिसर ते डी एन नगर मेट्रो २ अ, कुलाबा ते सिप्झ मेट्रो मार्ग ३ आणि वडाळा ते कासारवडवली मेट्रो मार्ग ४ या महत्त्वाच्या मार्गांना जोडणारा आहे. तसेच हा मार्ग पूर्व उपनगर व पश्चिम उपनगर यांना जोडणारा आहे. तसेच व्यावसायिक, सरकारी संस्था आणि भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाच्या क्षेत्रांनाही जोडणार आहे.

Comments
Add Comment