लाहोर (वृत्तसंस्था): टेरर फंडिग प्रकरणात पंजाबच्या शेखपुरा तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या आणि २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या कटात सहभागी असलेल्या अब्दुल सलाम भुट्टावी याचा पाकिस्तानच्या तुरुंगात मृत्यू झाला. त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असून भारताच्या गुप्तचर यंत्रणांनीही भुट्टावीच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे.
भुट्टावी याला २०२०मध्ये लष्कर-ए-तोएबाचा प्रमुख हाफिज सईदचा मेहुणा अब्दुल रहमान मक्कीसह साडे १६ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात तसेच २०११ मध्ये, यूएस ट्रेझरी डिपार्टमेंटने देखील त्याच्यावर निर्बंध लादले होते. त्याच्यावर दहशतवादी हल्ल्यांसाठी निधी उभारण्याचा आणि दहशतवाद्यांची भरती केल्याचा आरोप होता. भुट्टावीने आपली भाषणे आणि फतवे जारी करून दहशतवाद्यांना मुंबईवर हल्ला करण्यासाठी तयार केले होते. २०११ मध्ये भुट्टावीने दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोएबासाठी २० वर्षे काम केल्याची कबुली दिली होती.
२०१२ मध्ये, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने भुट्टावीला दहशतवादी घोषित केले. २००२-२००८च्या दरम्यान, जेव्हा लष्कर-ए-तोएबाचा प्रमुख हाफिज सईदला पाकिस्तानमध्ये ताब्यात घेण्यात आले, तेव्हा भुट्टावी दहशतवादी संघटनेचा प्रमुख बनला. त्याचवेळी २००८ मध्ये मुंबईत दहशतवादी हल्ला झाला होता. १० दहशतवाद्यांनी मिळून हा हल्ला केला होती. या हल्ल्यात १६६ जणांचा मृत्यू झाला होता.