Tuesday, December 3, 2024
Homeमहामुंबईभांडुपच्या जापनीस गार्डनची दुर्दशा

भांडुपच्या जापनीस गार्डनची दुर्दशा

पाणी नाही, लाईटही बंद

भांडुप : भांडुप पश्चिमेच्या गावदेवी मार्गावरील जापनीस उद्यानात गेले दोन महिने पाणी नाही. सर्व लाईट बंद आहेत. साफसफाई करण्यासाठी माळी नसल्यामुळे संपूर्ण उद्यानाची दैनावस्था झालेली आहे. या समस्यांबाबत नागरिकांकडून पालिकेकडे तक्रार करण्यात आली आहे. मात्र असे असूनही त्याकडे पालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली.

उद्यानातील झाडे-पाने सुकू नये म्हणून मुंबई महानगरपालिकेने स्प्रिंकलर बसविले. हे स्प्रिंकलर उद्यानाच्या उद्घाटन दिवशी बसविण्यात आले. त्यासाठी मुंबई महापालिकेने लाखो रुपये खर्च केले. यानंतर दोन- तीन महिने झाडांना पाणी मिळाले. सद्यस्थितीत हे स्प्रिंकलर बंद आहेत.

माजी आमदार व ईशान्य मुंबई विभाग प्रमुख अशोक पाटील व ईशान्य मुंबई विभाग प्रमुख राजश्री मांदविलकर यांच्या मार्गदर्शनाखाली भांडुप विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे सर्व पुरुष आणि महिला पदाधिकारी यांनी मुंबई महानगरपालिका एस विभागाच्या उद्यान विभागाला पत्रव्यवहार करूनही अद्यापही दखल घेण्यात आलेली नाही.

काही स्प्रिंकलर उद्यानातील जमिनीवर आलेले दिसत आहेत. त्यामुळे लहान मुले खेळताना पडतात. त्यांना दुखापत होते. महानगरपालिकेने मोठा गाजावाजा करत या उद्यानाचा लोकार्पण सोहळा पार पाडला. मात्र लगेचच त्याची दुरवस्था झाली. उद्यानात बसविण्यात आलेली पिण्याच्या पाण्याची टाकी स्वच्छ केली जात नाही. एकीकडे अशुद्ध पाणी आढळल्यास महानगरपालिका दंड आकारत आहे व दुसरीकडे अशा प्रकारांकडे दुर्लक्ष करत असल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली.

त्याचप्रकारे उद्यानात सुरक्षारक्षक नाही. या परिस्थितीची लवकरात लवकर दखल घेण्यात यावी, अशी मागणी भांडुप विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त महादेव शिंदे व उद्यान विभागाचे मोहिते व वाजे यांच्याकडे केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -