श्रीहरीकोटा : चांद्रयान कार्यक्रमाचा भाग असलेले व भारतातील सर्वात वजनदार प्रक्षेपण वाहन असलेले तिसरे अंतराळ यान म्हणजेच चांद्रयान-३ श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित केले जाईल. याच्या प्रक्षेपणासंबंधी नेमकी तारीख ठरवण्यात आलेली नव्हती. मात्र आता इस्रोने यासंबंधी अधिकृत घोषणा केली आहे. यानुसार १२ जुलैला ‘चांद्रयान -३’चं प्रक्षेपण होणार आहे. हे चांद्रयान २३ ऑगस्टला चंद्रावर उतरण्याची शक्यता इस्रोने वर्तवली आहे.
२०१९ मध्ये चांद्रयान-२ चं प्रक्षेपण झालं होतं. परंतु हार्ड लॅंडिंग झाल्याने ते प्रत्यक्षात चंद्रावर उतरु शकले नाही. तेव्हाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजून एक प्रयत्न करण्यास प्रोत्साहन दिले होते व चांद्रयान-३ ची घोषणाही त्याच वेळेस करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात चांद्रयान-२ मधील त्रुटी सुधारुन नवीन यान तयार करण्यात आलं.
चांद्रयान-३ हे चांद्रयान-२ चे फॉलो-ऑन मिशन आहे. यात लँडर आणि रोव्हर म्हणजे एका छोट्या गाडीचा समावेश आहे. यामध्ये ऑर्बिटर नाही, जे चांद्रयान-२ चं ऑर्बिटर होतं तेच याच्याशी संपर्क साधेल. या यानाला पृथ्वीपासून चंद्रापर्यंत घेऊन जाण्यासाठी इंधनाची यंत्रणा जोडण्यात आली आहे, ही इंधनाची यंत्रणा यानाला १०० किमी चंद्राच्या कक्षेपर्यंत घेऊन जाईल, अशी माहिती खगोल अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी दिली.
विशेष बाब म्हणजे चांद्रयान-३ मध्ये नासाच्या एका प्रयोगाचादेखील समावेश करण्यात आला आहे. चंद्र आणि पृथ्वीमधील कमी-जास्त होणारं अंतर अगदी अचूकपणे मोजण्यासाठी यानावर काही आरसे लावले जातात. लेझरने त्याचा अभ्यास केला जातो. नासाच्या या उपकरणाचा चांद्रयान-३ मध्ये समावेश करण्यात आलेला आहे. चांद्रयान-१ ने चंद्रावर दक्षिण ध्रुवाकडे पाण्याचे साठे असल्याचे दाखवून दिले होते. त्याचा अभ्यास करणे हे चांद्रयान-३ चे मूळ उद्दिष्ट असेल.