- गुंतवणुकीचे साम्राज्य : डॉ. सर्वेश सुहास सोमण
शेअर बाजारात या आठवड्यात पुन्हा एकदा वाढ पाहावयास मिळाली. या आठवड्यात झालेल्या तेजीनंतर निर्देशांकातील तेजीचा कल कायम राहिलेला आहे. पुढील काळाचा विचार करता निर्देशांक नवीन उच्चांक नोंदविणे अपेक्षित आहे. मागील आठवड्यात निफ्टी आणि बँक निफ्टीने आपापल्या अत्यंत महत्त्वाच्या पातळ्या तोडत मोठ्या तेजीचे संकेत दिलेले आहेत. पुढील आठवड्यासाठी निर्देशांक निफ्टीची १८१०० ही अत्यंत महत्त्वाची खरेदीची पातळी आहे. निर्देशांक जोपर्यंत या पातळीच्यावर आहेत तोपर्यंत निर्देशांकातील तेजी कायम राहील. टेक्निकल अॅनालिसीसनुसार न्युक्लीयस सोफ्टवेअर, अपटेक लिमिटेड, करिअर पॉइंट यासह अनेक शेअर्सची दिशा ही तेजीची आहे. अल्पमुदतीचा विचार करीता “जस्ट डायल” या शेअरने ६८५ ही अत्यंत महत्त्वाची पातळी तोडत टेक्निकल अॅनालिसीसनुसार तेजीची दिशा दाखविलेली आहे. त्यामुळे आज ७०५ रुपये किमतीला असणाऱ्या या शेअरमध्ये अल्पमुदतीसाठी खरेदी केल्यास चांगला फायदा होऊ शकेल. शेअर खरेदी करीत असताना योग्य स्टॉपलॉसचा वापर अत्यंत आवश्यक आहे.
मी माझ्या मागील ८ एप्रिल २०२३ च्या लेखात मध्यम मुदतीचा विचार करिता ‘अपटेक लिमिटेड’ या शेअरने ३८८ ही अत्यंत महत्त्वाची पातळी तोडत टेक्निकल अॅनालिसीसनुसार तेजीची दिशा दाखविलेली आहे. त्यामुळे आज ४११ रुपये किमतीला असणाऱ्या या शेअरमध्ये मध्यम मुदतीसाठी खरेदी केल्यास चांगला फायदा होऊ शकेल हे सांगितलेले होते.
मागील आठवड्यात देखील या शेअरमध्ये घसघसशीत वाढ पहावयास मिळाली ‘अपटेक लिमिटेड’ या शेअरने ५८३ हा उच्चांक नोंदविलेला आहे. टक्केवारीत पहावयाचे झाल्यास आपण सांगितल्यानंतर
जवळपास ४१ टक्क्यांची महावाढ या शेअरमध्ये झालेली आहे. कमोडीटी मार्केटमध्ये टेक्निकल अॅनालिसिसनुसार अल्प मुदतीसाठी सोने या मौल्यवान धातूची दिशा मंदीची झालेली आहे. सोने जोपर्यंत सोने ६०५०० या पातळीच्या खाली आहे तोपर्यंत सोन्यात मोठी तेजी येणार नाही. अल्प मुदतीच्या चार्टनुसार चांदीची दिशा आणि गती मंदीची आहे. टेक्निकल अॅनालिसीसनुसार जोपर्यंत चांदी ७३००० या पातळीच्या खाली आहे तोपर्यंत चांदीमधील मंदी कायम राहील. मागील काही आठवड्यात सोने आणि चांदीत झालेली घसरण पाहता पुढील आठवड्यात बाउन्स बॅक अपेक्षित आहे.
आपण मागील लेखात सांगितल्याप्रमाणे फंडामेंटल अॅनालिसीस केल्यावर तुम्हाला निर्देशांक महाग आहे की स्वस्त आहे याचा अंदाज येत असतो. साधारणपणे ज्यावेळी निर्देशांक हा महाग असतो त्यावेळी त्याला आपण निर्देशांक ‘ओवर वॅल्यू’ झाला असे म्हणत असतो. निर्देशांक ‘ओवर वॅल्यू’ असताना कमीत कमी जोखीम पत्करून अल्पकाळासाठी गुंतवणूक करणे आवश्यक असते व दीर्घमुदतीसाठी गुंतवणूक करावयाची असेल तर मात्र टप्प्याटप्प्याने सातत्याने शेअर खरेदी करत राहणे आवश्यक असते. निर्देशांकाचे मूल्य हे जर स्वस्त असेल तर आपण निर्देशांक हा ‘अंडर व्हॅल्यू’ आहे असे म्हणतो. निर्देशांक ‘अंडर व्हॅल्यू’ असताना मध्यम तसेच दीर्घमुदतीसाठी गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होत असतो.
शेअर बाजारामध्ये दीर्घमुदतीसाठी शेअर खरेदी करावयाची असेल तर योग्य शेअर निवडून पैशाचे योग्य नियोजन करून सातत्याने शेअर खरेदी करणे आवश्यक असते. निर्देशांक टेक्निकल बाबतीत देत असलेले तेजीचे संकेत बघता टप्याटप्याने शेअर्स खरेदीचे धोरण ठेवणे योग्य ठरेल. सर्व पैसा एकाच वेळी गुंतवू नये. त्याचप्रमाणे एकाच शेअरमध्ये सर्व पैसा गुंतवू नये. शेअर्सची निवड करीत असताना शेअर्सची चालू किंमत न बघता कंपनीचे फंडामेंटल्स तपासूनच शेअर्सची निवड करावी.
(सूचना: लेखकाची तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाइकांची लेखात सुचवित असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणतीही गुंतवणूक नाही किंवा सुचविलेल्या कंपन्यांशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून कंपनीकडून कोणतेही मानधन किंवाभेटवस्तू घेतलेली नाही)