मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईच्या रस्त्यांवरील उघड्या मॅनहोलचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबई शहर व दोन्ही उपनगरात मलनिस्सारण व पर्जन्य जल वाहिनी विभागाचे मिळून एक लाखांहून अधिक मॅनहोल आहेत. मात्र त्यापैकी ७४ हजार मलनिस्सारण वाहिन्या असलेल्या १,९०० मॅनहोलच्या फ्लडिंग पाईट्सवर, तर शहरातील २५ हजार पर्जन्य वाहिनी असलेल्या तीन हजार मॅनहोलवर संरक्षक जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात उघड्या मॅनहोलचा धोका निर्माण झाला आहे.
डॉ. दीपक अमरापूरकर यांचा ऑगस्ट २०१७ मध्ये परळ येथील उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर मुंबईतील मॅनहोलचा प्रश्न ऐरणीवर आला होता. मुंबईत एक लाखांहून अधिक मॅनहोल असून यात पर्जन्य वाहिनी विभागाच्या अखत्यारीत २५ हजार ६००, तर मलनिस्सारण विभागाच्या अखत्यारीत ७४, ६८२ मॅनहोल आहेत. मलनिस्सारण विभागाच्या अखत्यारीत असलेल्या ७४ हजार मॅनहोलपैकी फ्लडिंग पाईट्सजवळ असलेल्या १९०० मॅनहोलवर संरक्षक जाळ्या बसवण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे अमरापूरकर यांचा २०१७ मध्ये मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला त्याला सहा वर्षे उलटून गेल्यानंतरही एक लाख मॅनहोलपैकी फक्त पाच हजार मॅनहोलवर संरक्षक जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात उघडी मॅनहोल मुंबईकरांसाठी मृत्यूचे दार ठरू शकते.
यंदाच्या पावसाळ्याला काहीच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे इतक्या मोठ्या संख्येने असलेल्या मॅनहोलना संरक्षण जाळ्या बसवण्याचे आव्हान पालिकेसमोर आहे. या उघड्या मॅनहोलमुळे पावसाळ्यात रस्त्यावरून चालताना नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून तातडीने हे काम पूर्ण करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
- एकूण एक लाख मॅनहोल
पर्जन्य जलवाहिन्या विभाग
एकूण मॅनहोल – २५ हजार ६००, संरक्षक जाळ्या बसवल्या – ३ हजार - मलनिस्सारण विभाग
शहर – २७,०७८
पूर्व उपनगर – १५,९८३
पश्चिम उपनगर – ३१,६२१
एकूण मॅनहोल – ७४ हजार ६८२, संरक्षक जाळ्या बसवल्या – १,९००