- मुंबई डॉट कॉम : अल्पेश म्हात्रे
लवकरच पावसाळा जवळ येऊन ठेपला आहे. त्यातून मुंबईची तुंबई दरवर्षी होते. ती नद्या-नाल्यांमधून गाळ काढला तरी तुंबई होणे काही थांबत नाही. त्यात विरोधक विरोध करण्यासाठी टपून बसलेले असतातच. अशातच सध्या मुंबई महापालिकेत कोणीही सत्ताधारी नाही, प्रशासकीय राजवट आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आहे. इतकी वर्षे पालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेला आज विरोधकांचे काम करावे लागत आहे. म्हणूनच त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर न देता चक्क मुंबईतील नालेसफाईच्या कामांचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जातीने लक्ष घालून स्वतः नदी-नाल्यात उतरून घेतला, हे एकप्रकारे बरेच झाले.
मागील आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमांतून वेळ काढत मुंबईतील म्हणजे नदीनाल्यांची पावसाळापूर्व तयारी बघण्यासाठी दिवस खर्च केले. वास्तविक मुख्यमंत्री हा संपूर्ण राज्याचा असतो. एका शहरात नदी-नाले ही त्यांच्यासाठी दुय्यम बाब असते, मात्र मुख्यमंत्री हे नालेसफाईची कामे बघण्यासाठी जेव्हा उतरतात तेव्हा ते मुख्यमंत्र्यांचे वेगळेपण दर्शवले जाते. पण मुख्यमंत्र्यांचे एक वेगळे रूप दाखवतात, या एका घटनेतून. त्यांची राजकीय खोली किती आहे, याचा अंदाज आपण बांधू शकतो. मुंबई महापालिकेवर सध्या प्रशासकीय राजवट आहे. नालेसफाई घोटाळा, नाल्याचे पैसे फुगून सांगितलेले आकडे, नालेसफाईवर मुंबईकरांच्या पैशांची उधळण असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून केला गेला, तर नालेसफाईचे आकडे म्हणजे रतन खत्रीचे आकडे, असा आरोप मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांनी केला. शिवसेना (उबाठा)तर्फे आदित्य ठाकरे व भाजपतर्फे आशीष शेलार यांनी आरोप करत पालिका प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल यांच्यावर टीका केली, तर आदित्य ठाकरे असो किंवा आशीष शेलार यांच्या आरोपात काहीच सत्य नसल्याचे सांगत नाल्याचे काम ठरल्याप्रमाणे पारदर्शक पद्धतीने होत असल्याचे सांगत आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी आदित्य ठाकरे व आशीष शेलार यांच्या आरोपातील हवाच काढून टाकली.
राज्यात शिंदे व फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेतील कामकाजात शिंदे व फडणवीस सरकारचा हस्तक्षेप वाढला असल्याची तक्रार नेहमी विरोधक करतात. त्यात मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सत्ता काबीज करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून मुंबई महापालिकेची जगात ओळख आहे. ५२ हजार कोटींचा अर्थसंकल्प, ८८ हजार कोटींच्या ठेवी अशा महापालिकेतील आपण सत्ताधारी असावे किंवा वाटेकर तरी असावे, असे सर्वच राजकीय पक्षांसाठी फायदेशीर त्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून आरोप-प्रत्यारोप करत आपणच जनतेचे कैवारी आहोत, असा प्रचार-प्रसार सर्वच राजकीय पक्षांकडून सध्या तरी होत आहे. गेली पंचवीस वर्षे शिवसेना उद्धव ठाकरे गट पालिकेवर सत्तेत होती. मागील काही वर्षे सत्तेत सहभागी न होता भाजप पहारेकरांच्या भूमिकेत होता. मात्र पालिकेतील सत्तेचा कालावधी समाप्त होताच व राज्यातील राजकीय परिस्थिती बदलताच शिवसेना गटाने नालेसफाई असो की मुंबई सौंदर्यकरण प्रकल्प त्यांना सर्व गोष्टीत भ्रष्टाचार दिसू लागला. मुंबईतील नागरिकांच्या पैशाची उधळण वाटू लागली, मुंबई महापालिकेत गैरव्यवहार सुरू असल्याची तक्रार आदित्य ठाकरे यांनी तर थेट राज्यपालांकडे केली. आदित्य ठाकरे यांच्या आरोपानंतर पालिका प्रशासक म्हणून जबाबदारी पार पाडणारे इक्बाल सिंह चहल यांनी हा आरोप धुडकावून तर लावलाच व त्यांच्या आरोपांची सफाईही करून टाकली. भाजपने तर नालेसफाईच्या कामाचे ऑडिट करण्यासच सुरुवात केली. पण नालेसफाईच्या कामाची आकडेवारी ही रतन खत्रीची आकडेवारी असल्याचे सांगून आशीष शेलार यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनाच लक्ष केले. राजकीय पक्ष राजकीय कुरघोडीतून एकमेकांना लक्ष करतात हे ठीक आहे मात्र दोन्ही विरोधी पक्षांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनाच लक्ष केल्याने आयुक्त चांगलेच कोंडीत सापडले. अखेर त्यांनाही या आरोपांना उत्तर देणे अवघड बनू लागले तेव्हा मात्र सरकारी यंत्रणा जागृत झाली आणि त्यांना वरिष्ठ पातळीवर अशी काय खेळी केली की मुंबईच्या नालेसफाईची सूत्रे मंत्रालयातून हलली व खुद्द मुख्यमंत्र्यांनाच नाले व नद्यांमध्ये उतरून केलेल्या कामांचे कौतुक करावे लागले. मुंबई महापालिकेच्या प्रत्येक कामकाजावर बोट ठेवत नुसते आरोप करणे आता प्रशासक म्हणून मी खपवून घेणार नाही, असा इशाराच पालिका आयुक्तांनी आदित्य ठाकरे, आशीष शेलार यांच्यासह सर्वच राजकारणांना यानिमित्त दिला आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नद्यांची स्वच्छता व त्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी राज्यांकडे पाठपुरावा केला आहे. मिठी ही सुद्धा मुंबई शहरातील महत्त्वाची नदी आहे. मुंबईतच उगम पावणाऱ्या व मुंबईतच समुद्राला जाऊन मिळणाऱ्या या नदीची लांबी १७.८४ कि. मी. एवढी आहे. मुंबईमध्ये २६ जुलै २००५ रोजीच्या प्रलयकारी पावसानंतर मुंबईत एक नदी सुद्धा आहे याची प्रचिती आली होती, म्हणून पावसाचे नियोजन करताना मिठी मदीबाबत कोणताही निष्काळजीपणा करता येत नाही. मुंबईची तुंबई झाली तर संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होणार असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नालेसफाईच्या दौऱ्याचा वेळी दिला, तर मुंबई ठप्प झाली नाही तर संबंधित अधिकाऱ्यांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः बीकेसी, वाकोला, दादर, वरळी, सांताक्रूज, अंधेरी, दहिसर येथील नालेसफाई व पाणी जमा होण्याच्या ठिकाणांना भेटी दिल्या. नालेसफाईबाबत स्वतः रस्त्यावर उतरून समाधान व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी सरकारी अधिकारी विरोधक व स्वपक्षीय नेते व सामान्य नागरिक या सर्वांचेच एकाच वेळी समाधान करून समतोल निर्माण करण्याचा प्रयत्न केला हे विशेष. बाकी पावसाळा जवळ येतच आहे, आता राजकीय धुरळ्यात सर्व काही शांत होईल ते जोरदार पाऊस पडेपर्यंत!