Friday, July 19, 2024
Homeताज्या घडामोडीवीज कोसळण्यासारखे धोके वाढण्याची भीती

वीज कोसळण्यासारखे धोके वाढण्याची भीती

हवामान बदलामुळे यंदा पावसाळ्यात नवे संकट

मुंबई (प्रतिनिधी) : हवामान बदल होत आहे, त्याचे परिणाम रोज आपल्यावर होत आहेत. यातील काही परिणाम दृश्य, तर काही अदृश्य आहेत. येत्या काळात मोठ्या प्रमाणात विजा चमकण्याचे प्रकार वातावरण बदलामुळे अधिक वाढू शकतात. हे परिणाम सर्वात जास्त धोकादायक आहेत. हवामान विभागाच्या पुण्यातील हवामान संशोधन आणि सेवा विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी विजांपासून निर्माण होणाऱ्या धोक्याबद्दल माहिती दिली.

ग्रामीण भागांमध्ये वीज कोसळून शेळ्या, मेंढ्या यांचे कळपच्या कळप मृत्युमुखी पडतात. विजा पडून माणसांचे मृत्यू होतात. यासाठी ही वातावरणीय घटना अधिक हानिकारक आहे. त्यामुळे जीवितहानीसोबत वित्तहानी या दोन्ही परिणामांना सामोरे जावे लागते. पूर्वी पाऊस येण्याआधी आणि पाऊस जाताना विजा चमकायच्या. मात्र, आता पावसाळ्याच्या मध्येही विजा चमकतात. एखाद्या ढगाची त्या ढगाच्या तळापासून वरपर्यंत उंची अधिक असते, तेव्हा त्यामध्ये विजा चमकण्याची शक्यता अधिक असते, असे त्यांनी सांगितले. ढगाची उंची जेव्हा १० ते १२ किलोमीटर असते तेव्हा विजांचे प्रमाण अधिक असते. या विजांचे चार प्रकार असतात. ढगांमध्ये विजा निर्माण होतात, त्या एका ढगातून दुसऱ्या ढगात प्रवाहित होतात, ढगांमधून जमिनीकडे आणि जमिनीकडून ढगांकडे विजा प्रवाहित होतात. यात ढगांमधून जमिनीकडे प्रवाहित होणाऱ्या विजा या अधिक घातक असतात, असे होसाळीकर यांनी स्पष्ट केले. एखाद्या भागात पडणारा पाऊस, स्थानिक भागात काही तास प्रचंड प्रमाणात कोसळणारा पाऊस, यासाठी कारणीभूत असलेले क्युमुलोनिंबस ढग यासंदर्भातही त्यांनी माहिती दिली.

पावसाच्या वेळाही बदलल्या…

गेल्या काही काळात पाऊस पडण्याच्या प्रमाणात काही बदल झाले आहेत. पावसाच्या आगमनाच्या आणि परतीच्या वेळेतही बदल झाले आहेत. चेरापुंजी, मौसिनराम यांसारख्या सर्वाधिक पावसाच्या ठिकाणी पडणारा पाऊस कमी होत जात असल्याचे दिसत आहे. राजस्थानसारख्या रेताड भागात पूर येत आहेत. किनारपट्टी भागांमध्ये उष्णतेच्या लाटा यापूर्वी कधीही अनुभवल्या नव्हत्या. त्या उष्णतेच्या लाटांचा अनुभव मुंबईसारख्या शहरातही येत आहे. हे वातावरण बदलाचे परिणाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वातावरण बदलाचा वेग कमी करण्यासाठी कर्ब उत्सर्जन कमी करण्याचा प्रयत्न सध्या सगळे देश करत आहेत. हा वेग थोडा कमी झाला की, अधिक संशोधनासाठी वेळ मिळेल, या काळात तंत्रज्ञानाच्या मदतीने वातावरण बदलावर उपाय शोधण्यासाठीही प्रयत्न होतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -