‘इस्त्रो’ची मोठी घोषणा
श्रीहरिकोटा : ‘चांद्रयान-२’ च्या अपयशानंतर आता भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे प्रमुख ए. सोमनाथ यांनी चांद्रयान-३ यावर्षी १२ जुलै रोजी प्रक्षेपण होणार आहे, अशी माहिती दिली. तसेच अंतराळ क्षेत्रात भारताचे हे आणखी एक मोठे यश असेल असे देखील ते म्हणाले. चांद्रयान-२ हे २०१९ मध्ये अयशस्वी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासाठी आणखी एक प्रयत्न करण्यास सांगितले. त्यानंतर चांद्रयान-२ मध्ये ज्या त्रुटी होत्या त्यावर काम करण्यास सुरुवात झाली. त्या त्रुटी काढून नवीन यान तयार करण्यात आले आहे. तसेच आता हे यान प्रक्षेपण करण्याच्या दृष्टीने तयार देखील झाले आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने एक विशेष नेव्हिगेशन उपग्रह प्रक्षेपित केल्यानंतर आता याच वर्षी चंद्रयान-३ देखील प्रक्षेपित केले जाणार आहे. ‘इस्रो’चे प्रमुख सोमनाथ यांनी सोमवारी सांगितले की, चांद्रयान-३ हे वर्षी १२ जुलैमध्ये प्रक्षेपित केले जाईल. चांद्रयान- ३ हे चांद्रयान-२ चे फॉलोऑन मिशन आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, १२ जुलै रोजी चांद्रयान-३ चे प्रक्षेपण होणार असून हे चांद्रयान २३ ऑगस्टपर्यंत चंद्रावर उतरणार आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून एलव्हीएम ३ द्वारे चांद्रयान-३ प्रक्षेपित केले जाईल.
विशेष म्हणजे प्रादेशिक नेव्हिगेशन उपग्रह प्रक्षेपित करणारा भारत हा पहिला देश आहे. अंतराळातील जागतिक नेव्हिगेशन उपग्रहांची संख्या चार आहे. हे उपग्रह तामिळनाडूतील सतीश धवन स्पेस सेंटरच्या दुसऱ्या लॉन्च पॅडवरून प्रक्षेपित करण्यात आले आहे.
चांद्रयान-२ हे चंद्राच्या भोवती फिरणारं यान म्हणून तयार करण्यात आले होते. यामध्ये एका लँडरचा समावेश होता, जे चंद्राच्या भूमीवर उतरेल आणि एक रोवर म्हणजे त्यातून एक छोटी गाडी बाहेर येणार होती. चांद्रयान-३ मध्ये फक्त नवीन लँडर आणि रोवरचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये ऑर्बिटर हे चांद्रयान-२ मधीलच वापरण्यात आले आहे. यामध्ये नासाच्या देखील एका प्रयोगाचा समावेश करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.