सोलापूर : कर्नाटकातील होस्पेट जवळील दोट्टीहाळ या गावाजवळ ट्रकने कारला दिलेल्या धडकेत सहा जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. यात पती-पत्नी आणि २ लहान मुलांचा समावेश आहे. याबाबतची माहिती सोमवारी सकाळी ग्रामस्थांकडून समजली.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील राघवेंद्र कांबळे हे १५ दिवसांपूर्वी लवंगी या आपल्या गावी यल्लमा देवीच्या यात्रेसाठी आले होते. ते बंगळुरू येथे एका खासगी कंपनीत काम करायचे. रविवारी रात्री ते पत्नी, दोन मुलांसह कारमधून बंगळुरूला निघाले होते. वाटेत नंद्राळ इंडी येथील बहिणीच्या नातेवाइकांना घेऊन ते पुढे निघाले. हॉस्पेटच्या पुढे गेल्यानंतर भरधाव ट्रकने त्यांच्या कारला समोरून जोराची धडक दिली. यामध्ये ट्रकच्या खाली कार अडकली. अपघात इतका भीषण होता की कारमधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.
राघवेंद्र कांबळे हे वडील सुभाष व आई इंदुमती यांचे एकुलते पुत्र होते. त्यांना तीन विवाहित बहिणी आहेत.