चिपळूण : आजपर्यंत आपण विविध विषयात आंदोलने आणि निदर्शने होताना पाहत आलो. मात्र खेर्डी कातळवाडीत आंदोलनाचा अभिनव प्रकार समोर आला आहे. १५ वर्षापूर्वी जिल्हा नियोजनमधून ४० लाख खर्च करून खेर्डी ग्रामपंचायतीने गांडूळ खत निर्मितीचा प्रकल्प उभा केला. मात्र त्यात खत निर्मिती किती झाली आणि त्याचा उपयोग किती झाला, हा संशोधनाचा विषय असला तरी या प्रकल्पाची जागा वेगळ्याच कारणाने आता चर्चेत आली आहे.
या जागेत प्लास्टिक व इतर कचरा आणून टाकला जातोय. तेच प्लास्टिक गुरे खातात आणि प्लास्टिक जाळले जाते त्याचा आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंध येतोय. त्यामुळे येथील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत येथील सुजाण लोकांनी कोणत्याही प्रकारचा चुकीचा मार्ग न अवलंबता ‘आम्ही येथे गांडूळ खत निर्मितीसाठी परवानगी दिली आहे, प्लास्टिक कचरा जाळण्यासाठी नाही’ असा बॅनर त्या ठिकाणी लावला असून साऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
आता खेर्डी ग्रामपंचायत नेमकी काय भूमिका घेत आहे, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. खेर्डी कातळवाडीत १५ वर्षापूर्वी जिल्हा नियोजनमधून ४० लाख खर्च करून खेर्डी ग्रामपंचायतीने गांडूळ खत निर्मितीचा प्रकल्प उभा केला होता. तो आज बिकट स्थितीत दिसून येत आहे.