Thursday, November 14, 2024
Homeमहामुंबईमिठी नदीतील पाण्याची गुणवत्ता सुधारतेय

मिठी नदीतील पाण्याची गुणवत्ता सुधारतेय

दररोज ८० लाख लि. क्षमतेचा प्रकल्प; पाणी पुन्हा नदीमध्ये सोडले जातेय

मुंबई (प्रतिनिधी) : ज्या मिठी नदीमध्ये अगदी काही महिन्यांपूर्वीपर्यंत मासे दिसणे ही एक दुर्मीळ बाब मानली जात होती. त्याच मिठी नदीत काही ठिकाणी आज थोड्याफार प्रमाणात का होईना, मासे दिसू लागले आहेत. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने सकारात्मक बदल प्रत्यक्षात आणणाऱ्या ‘मिठी नदी जल गुणवत्ता सुधार’ या प्रकल्पाद्वारे मिठी नदीतील काही लाख लिटर पाण्याची गुणवत्ता वृद्धिंगत करून ते पाणी पुन्हा मिठी नदीमध्ये सोडण्यात येत आहे. पालिकेतर्फे राबविण्यात येत असलेल्या या प्रकल्पामुळे प्रकल्प परिसरातील नदीतील पाण्याची गुणवत्ता सुधारत आहे. मुंबईतच उगम पावणाऱ्या आणि मुंबईतच समुद्राला जाऊन मिळणाऱ्या या मिठी नदीची एकूण लांबी १७.८४ किलोमीटर एवढी आहे. या नदीचे पाणलोट क्षेत हे साधारणपणे ७ हजार २९५ हेक्टर एवढे आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात असणाऱ्या विहार आणि पवई तलावांमधून होणारा विसर्ग हा या नदीचा प्रमुख जलस्रोत आहे. ही नदी माहिमच्या खाडीतून समुद्राला जाऊन मिळते.

मुंबईमध्ये २६ जुलै २००५ रोजीच्या प्रलयकारी पावसानंतर पूर परिस्थिती हाताळण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मिठी नदी विकास आणि संरक्षण प्राधिकरणाची (एम.आर.डी.पी.ए.) १९ ऑगस्ट २००५ रोजी स्थापना करण्यात आली. त्यानंतर केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्र (सी.डब्ल्यू.पी.आर.एस.) आणि सत्यशोधन समितीच्या शिफारसींनुसार, दोन टप्प्यांमध्ये मिठी नदीचे रुंदीकरण, खोलीकरण, संरक्षण भिंत व सेवा रस्ता बांधण्याचे काम हाती घेण्यात आले होते. यातील बहुतांश कामे आता पूर्ण झाली आहेत.

कधी एकेकाळी वाहती आणि समृद्ध नदी म्हणून ओळख असणारी ही मिठी कालांतराने घनकचरा, सांडपाणी, अतिक्रमण आदी समस्यांनी ग्रासली गेली आणि या नदीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. सफेद पूल नाला, मरोळ बापट नाला आणि वाकोला नाला असे नाले या मिठी नदीलाच येऊन मिळतात. त्यामुळे ही नदी एका मोठ्या नाल्याप्रमाणेच भासत होती. परंतु, या मिठीला गतवैभव प्राप्त व्हावे, यासाठी महापालिकेद्वारे सातत्याने विविध स्तरीय कार्यवाही करण्यात येत आहे.

‘मिठी नदी विकास आणि प्रदूषण नियंत्रण प्रकल्प’अंतर्गत सध्या मिठी नदीतील पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी पवई भागात दररोज ८० लाख लिटर क्षमतेचा जल गुणवत्ता सुधारणा प्रकल्प जानेवारी २०२३ पासून अव्याहतपणे कार्यरत आहे. या प्रकल्पाद्वारे गुणवत्ता सुधारणा करण्यात आलेले अर्थात शुद्धीकरण केलेले पाणी पुन्हा मिठी नदीमध्ये सोडण्यात येत आहे. यामुळे मिठी नदीतील पाण्याच्या गुणवत्तेत सुधारणा होण्यासह नदीतील जैवविविधता अबाधित राखण्यास व जैवविविधतेची वृद्धी होण्यास मदत होत आहे.

विविध भागातील घाण, कचरा तसेच सांडपाणी मिठी नदीमध्ये येत असल्याने या नदीचे पाणी खूप दूषित होत होते. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात आल्याने नदीपात्राची खोलीही कमी झाली होती. शिवाय, नदीच्या तटवर्ती भागात उद्भवलेल्या अतिक्रमणांमुळे नदीपात्राची रुंदीही कमी झाली होती. या सर्व बाबींचा प्रतिकूल परिणाम मिठी नदीमध्ये असलेल्या जैवविविधतेवर झाला होता. त्यामुळे या गंभीर समस्येवर तोडगा काढण्याच्या उद्देशाने महपालिकेद्वारे जानेवारी २०२३ मध्ये पवई येथे ‘मिठी नदी जल गुणवत्ता सुधारणा प्रकल्प’ सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत बिनपावसाळी पाणी अडवणे, सांडपाणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवणे, सांडपाण्यावर प्रक्रिया करणे आणि पाण्यास वापरायोग्य बनवणे या प्रक्रिया केल्या जातात. या प्रक्रियेतून शुद्ध केलेले पाणी पुन्हा मिठी नदीत सोडले जाते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -