Wednesday, April 30, 2025

पालघर

पूंजीसाठी बाहेरगावी गेलेला मजूर आता गावाच्या दिशेने

पूंजीसाठी बाहेरगावी गेलेला मजूर आता गावाच्या दिशेने
  • वामन दिघा

मोखाडा : मोखाडा तालुक्यातील गाव-पाड्यांत मूबलक पाणी, रोजगार निर्मितीची साधने पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने तालुक्यातील नागरिकांना आजही रोजगारासाठी शहरांची वाट धरावी लागत आहे. अनेक निवडणुका आल्या आणि गेल्या; परंतु रोजगारनिर्मितीची कामे वाढण्याऐवजी कमी होत चालली आहेत. त्यामुळे पावसाळ्यात शेतीच्या कामासाठी पुरतील, एवढे तरी पैसे आपल्याकडे असावेत, यासाठी बाहेरगावी गेलेला मजूर आता गावाकडे परतू लागला आहे.

महागाईवर नियंत्रण नसल्याने भल्याभल्यांचे कंबरडे मोडले असून, आदिवासी कुटुंबांना आपले घर व गाव-पाडे, नातेवाइकांना सोडून भिवंडी, ठाणे, कुडूस, कल्याण, अंबाडी इत्यादी शेकडो मैल दूरवर रोजगाराच्या शोधात भटकंती करावी लागते. ज्या शहरांच्या ठिकाणी हाताला काम मिळेल, तेथे काम संपेपर्यंत आपल्या कुटुंबातील सदस्यांसह पडाव करावा लागतो, कारण उन्हाळ्यात जर कामधंदा केला नाही, दोन पैसे कमाविले नाही, तर पावसाळ्यातील शेती करायची कशी?, असा प्रश्न या कुटुंबातील सदस्यासमोर असतो. त्यामुळे आपल्या मुलांबाळांच्या शिक्षणांची तमा न बाळगता पोटाची खळगी भरण्यासाठी व पावसाळ्यातील शेतीच्या कामासाठी पैसे शिल्लक पडावेत यासाठी वीटभट्टी, इमारत बांधकाम, रस्त्याची साईडपट्टी आदी कामांत दिवसभर कडक उन्हा-तान्हात हाताला मिळालेले काम त्यांना पूर्ण करावे लागत आहे. महागाईच्या काळात २५६ रुपये प्रतिदिन शासकीय मजुरीतून आपला व आपल्या कुटुंबाचा रहाटगाडा चालवायचा की दोन पैसे शेतीच्या कामासाठी शिल्लक ठेवायचे? असा प्रश्न आहेच.

निवडणुका येतात आणि जातात, पण मायबाप सरकार व लोकप्रतिनिधी स्थानिक पातळीवर पुरेशा प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देत नसल्याने पावसाळा काळातील शेतीच्या कामासाठी व कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी स्थलांतरित व्हावे लागते, अशी खंत ग्रामीण भागांतील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment