-
गुलदस्ता: मृणालिनी कुलकर्णी
३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती. ३१ मे १७२५ ते १३ ऑगस्ट १७३३ या अठराव्या शतकांत इंदूर संस्थानाचा कारभार पाहणाऱ्या, मराठा राज्यांच्या, माळवा प्रांताच्या, कुलीन महाराणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर होत्या. मध्य प्रदेशातील महेश्वर हे होळकर राजवटीचे स्थान. एकामागून एक अनेक संकटे आली असतानाही देवी अहिल्याबाईने अत्यंत धीराने, प्रजेसाठी धर्मनिरपेक्ष न्यायाने २८ वर्षे राज्य केले. तत्त्वज्ञानी, प्रशासकीय आणि सैन्यावरील कामांत पारंगत, हिंदू मंदिराच्या त्या महान प्रवर्तक आणि निर्मात्या. त्यांनी अनेक लोककल्याणकारी योजना राबविल्या.
आपल्या पराक्रमाने आणि समाजकार्याने संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेल्या अहिल्याबाई होळकरांच्या सन्मानार्थ भारत सरकारने इंदूर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला, विद्यापीठाला देवी अहिल्याबाई होळकर हे नाव दिले. लोकसभा संसदेच्या ग्रंथालयांत अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा आहे. त्यांच्या कारकिर्दीवर चित्रपट, मालिका व पुस्तके आहेत. वारसा म्हणून जतन केलेल्या अहिल्याबाई होळकरांच्या चौंडी जन्मगावी, त्यांचा भव्य पुतळा, वाडा, चावडी, मंदिर, नक्षत्र उद्यान, त्याहीपेक्षा अहिल्याबाईंच्या जीवनातील प्रमुख घटना सांगणारी शिल्पासह माहिती दिल्यामुळे त्यांचे कार्य नव्याने समजले. इतरांना समजावे यासाठी हा लेख!
अठराव्या शतकाच्या सुरुवातीला बाजीराव पेशव्यानी इंदूर जिंकून, शासक म्हणून मल्हारराव होळकरांवर जबाबदारी सोपवली. काही वर्षांनी पुत्रवधू अहिल्यादेवीने तेथे होळकरशाहीचे भूषण असा वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेला राजवाडा बांधला. अहमदनगर, जामखेड तालुक्यात ५०/६० कुटुंबांचे सीना नदीच्या किनारी वसलेले चौडी हे खेडे. बाजीराव पेशवे, त्यांचे सेनापती मल्हारराव होळकर यांनी तिन्ही सांजेला मारुतीच्या देवळात आठ वर्षांच्या मुलीला तेल-वात लावताना पहिले. तात्या, ‘कोणासमोर वाकायचे नाही, झुकायचे नाही असे तुम्ही सांगता मग तुम्ही यांना साष्टांग नमस्कार का घातलात? तिचा हजरजबाबीपणा, हुशारी व संस्कार पाहून बाजीरावाने सुचविल्याने मल्हाररावांनी तिला सून करून घेतली.
पुरुषप्रधान संस्कृतीतही मल्हाररावांनी सुनेची हुशारी ओळखून लिहिण्या-वाचण्यापासून राज्यकारभार, युद्धशास्त्र, शस्त्राची निर्मिती, न्यायदान, प्रशासकीय/दरबारी कामे, पत्रव्यवहार शिकविला. कुशाग्र बुद्धीच्या अहिल्या साऱ्यांत निपुण झाल्या. त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी सासू गौतमाबाईने केली. पती खंडेरावसोबत त्याही मोहिमेवर जात. खंडेरावांच्या वीरमरणानंतर सती जाणाऱ्या अहिल्येला सासऱ्यांनी समजावून सांगितले, ‘तू सती गेलीस, तर प्रजेला कोणाचा आधार? मी तुला माझा खंडू मानीन.’ प्रजेच्या हितासाठी, धर्मरूढीपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानत, संन्यस्तपणे अहिल्यादेवीने प्रजेची सेवा केली. मुलाच्या आणि १२ वर्षांनी मल्हाररावांच्या मृत्यूनंतर पुतण्या तुकोजीरावांना लष्करप्रमुख करून अहिल्याबाईने होळकरांचा राज्यकारभार हाती घेतला.
राणी अहिल्याबाईंचा प्रशासक, समाजसुधारक, न्यायदानाच्या कामाचा अल्पसा आढावा –
१. नागरी व लष्कर कारभार चालविण्यास सक्षम असलेल्या अहिल्यादेवीने प्रथमतः घुसेखोरांपासून माळवा राज्याचे रक्षण केले.
२. शोकात असतानाच मल्हाररावाच्या दिवाणांनी आपला मुलगा दत्तक घ्यावा, ही विनंती अहिल्याने फेटाळून लावली.
३. होळकर राज्याच्या व दौलतीच्या लोभामुळे राघोबा फौज घेऊन इंदोरवर येतांढ़च अहिल्यादेवींची महिला सैन्याची फौज पाहताच मागे फिरले. त्याआधी समाचार घेताना खलित्यांत अहिल्याबाई लिहितात, ‘मला दुबळी समजलात का खुळी? दुःखात बुडालेल्यास अधिक बुडवावे हा तुमचा दुष्ट हेतू. आपली भेट रणांगणात! मला अबला समजू नका.’ अहिल्या म्हणजे तळपती समशेर, लखलखती वीज होत्या.
४. स्वतःच्या मुलीच्या लग्नात अहिल्यादेवीने जातीयतेला तडा दिला. माझ्या राज्यांत चोर, दरोडेखोरांचा जो बंदोबस्त करेल, त्याला मी जावई करून घेईन. त्या काळांतही जात-धर्म न पाहता मुलाचे कर्तृत्व पाहिले. बोलल्याप्रमाणे वागल्या.
५. देवी अहिल्या न्यायदानासाठी प्रसिद्ध. भिल्ल आणि डाकू प्रजेला का लुटतात? हे समजताच आपल्या राज्यांत यात्रेकरूंवर दरडोई एक कवडी कर बसविला. त्यातील काही पैसे त्यांना देत. शिवाय यात्रेकरूंच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. जे शेती करू इच्छित होते, त्यांना सरकारी जमिनीचे पट्टे दिले.
६. त्याकाळी भारत देश सुमारे ४८० सत्तांमध्ये विभागलेला होता. एक दुसऱ्यास मानत नव्हते. आपण सारे भारतीय आहोत, सारा भारत माझा ही भावना लोप पावलेली होती. कोणत्याही भागांत कोणाचीही सत्ता असली तरी साऱ्या भारतीयांना तीर्थक्षेत्रांना, तसेच चार दिशेला असलेले चार धामांना जाण्यासाठी रस्ते/महारस्ते बांधले. यात्रेकरूंसाठी अन्नछत्र चालवली. पाण्यासाठी विहिरी खोदल्या, पाणपोईच्या सोयी केल्या. धर्मशाळा, उद्याने बांधली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला विशिष्ट झाडे लावून पर्यावरण जोपासले. केलेल्या सुखसोयींमुळे पर्यटनाला प्रोत्साहन मिळाले. पशुपक्ष्यासाठी कुराणे राखली. उद्ध्वस्त मंदिराचा जीर्णोद्धार केला. सर्वधर्मसमभाव या नात्याने नव्या मंदिरांसोबत मशिदी, दर्गेही बांधले. सर्व जातीच्या मजुरांना काम मिळाले त्यांच्यात एकोपा, एकात्मता वाढली.
७. संवाद साधत प्रजेला वेळ देत होत्या. गंगा/नर्मदा नदीकिनारी घाट बांधताना महिलांच्या निकडीनुसार घाट, घाटाच्या पायऱ्या बांधल्या.
८. राज्यांतील कलाकारांना, कारागिरांना बोलावून योग्य सन्मान करीत. होळकर कुटुंबाने सार्वजनिक पैसा कधीच वापरला नाही. उलट सामाजिक कामासाठी अहिल्यादेवी स्वतःच्या स्त्रीधनाचा उपयोग करून नवा पायंडा पाडला.
९. अहिल्यादेवींने होळकरांची स्वतंत्र टांकसाळ निर्माण करून होळकरशाहीची नाणी, शिक्के चलनांत आणले.
१०. आजच्या प्रसिद्ध महेश्वरी साड्या, धोतर हे त्या काळात इंदोरवरून महेश्वर येथे वस्त्र उद्योगाला उत्तेजन देण्यासाठी अहिल्यादेवीने जमीन, विणकर, मजूर, कारागीर उपलब्ध करून दिले.
११. अस्पृश्यता, हुंडा पद्धतीचे उच्चाटन करून, निपुत्रिक विधवांची मालमत्ता जप्त होण्याचा कायदाही रद्द केला.
अहिल्यादेवी धार्मिक होत्या. त्या शंकरभक्त असल्याने आपल्या हातात हृदयापाशी शिवलिंग ठेवत. आपण शंकराच्या साक्षीने हे सारे करीत आहोत. जे काही करीन, त्याचा जाब मला परमेश्वराजवळ द्यावा लागणार आहे. अशी त्यांची धारणा होती. अहिल्यादेवीने भारतभर जे कार्य केले, ते आज भारत शासन व्यवस्थेत विविध विभागातर्फे केले जाते. इथेच त्यांचे कर्तृत्व सिद्ध होते. साधी राहणी, उच्च चारित्र्य व मातीवर/देशावर निष्ठा असलेल्या अहिल्यादेवींचे ७०व्या वर्षी इंदूर येथे निधन झाले. खऱ्या अर्थाने त्या लोकमाता, राजमाता झाल्या. अहिल्याबाई होळकरांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!