नवी दिल्ली: संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. नरेंद्र मोदी सकाळी ७.३० वाजता संसदेत पोहोचले आणि त्यांनी सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधींना नमन केले. यावेळी चेन्नईहून आलेल्या धर्मपुरम अधनम मठाच्या २१ संतांनी पंतप्रधान मोदींना सेंगोल (राजदंड) सुपूर्द केले. पंतप्रधानांनी सेंगोलला दंडवत नमस्कार करून संतांचे आशीर्वाद घेतले. यानंतर पंतप्रधान मोदींनी मंत्रोच्चारात स्पीकरच्या खुर्चीजवळ सेंगोल स्थापित केले.
आता नवीन संसद भवनाच्या उद्घाटनासाठी हवन-पूजन सुरू झाले आहे. पूजेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सभापती ओम बिर्ला उपस्थित आहेत. जवळपास ९७१ कोटी रुपये खर्चून बांधलेले, नवीन संसद भवन भारताच्या प्रगतीचे प्रतीक आहे आणि सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पाचा एक भाग आहे.
उद्घाटनापूर्वी पंतप्रधानांनी संसद भवनाच्या व्हिडिओसाठी व्हॉईस ओव्हर देण्याचे आवाहन सर्वांना केले. यानंतर शाहरुख खान, अक्षय कुमार आणि अनुपम खेर या सेलिब्रिटींनी या व्हिडिओमध्ये आपला आवाज दिला.