Friday, July 19, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेमुरबाडचा मिमिक्री मॅन गणेश देसले ‘आवाजाचा जादूगार’

मुरबाडचा मिमिक्री मॅन गणेश देसले ‘आवाजाचा जादूगार’

शिखर गाठण्यासाठी अनेक कलावंताचे आवाज काढत जोपासली कला

मुरबाड (प्रतिनिधी) : मुरबाड तालुक्यातील एकलहरे गावचा सुपुत्र गणेश देसले हा आपल्या जादुई आवाजाने मिमिक्री मॅन म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.

कानाला चिरपरिचित आवाजांची ओळख असली तरी काही पडद्याआड गेलेल्या विभूतींचा जीवनपट गणेशच्या मिमिक्रीतून डोळ्यासमोर साकार होत आहे. स्व. दादा कोंडके, निळू फुले आणि नाना पाटेकर यांचे भारदस्त आवाज त्याच्या कंठातून लिलया निघतात. गणेश हा मुरबाडच्या एका खेडेगावातील शेतकऱ्याचा मुलगा आहे. कुठेही कलेचे धडे न घेतलेल्या गणेश देसलेच्या या कलेमुळे तो आज मुरबाडच्या मुकुटातील हिऱ्यासारखा चमकू लागला आहे.

मागील १० वर्षांपासून ग्रामीण भागातील कलाकार वेगवेगळ्या कला क्षेत्रात पुढे येऊन स्टेज शो करताना निदर्शनास येतात. याचप्रकारे आवर्जून दखल घेण्यासारखा तरुण कलावंत म्हणजे गणेश देसले याचा उल्लेख करता येईल.

गणेश देसले याने यशाचे शिखर गाठण्यासाठी मराठी, हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, नाना पाटेकर, अक्षय कुमार, निळू फुले, सयाजी शिंदे, कॉमेडी किंग जॉनी लिव्हर, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका, गान कोकिळा लता मंगेशकर यांचा आवाज अगदी हुबेहूब काढतो. तसेच मकरंद अनासपुरे, हृतिक रोशन, दक्षिणेकडचा सुपरस्टार रजनीकांत, अल्लू अर्जुन, अंकुश चौधरी आदींच्या आवाजाची मिमिक्री करत त्याने आपली कला जोपासली असल्याचे दिसून येत आहे.

गणेश देसले यांचे कार्यक्रम मुंबई, ठाणे, पालघर, वाडा, कर्जत, नवी मुंबई, अहमदनगर, पुणे, गुजरात, कल्याण, मुरबाड आदी ठिकाणी सादर झाले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -