Wednesday, July 9, 2025

मासिक पाळी समज-गैरसमज

मासिक पाळी समज-गैरसमज


  • विशेष : शैला खाडे



मासिक पाळी हा स्त्रियांच्या दृष्टीने अतिसंवेदनशील विषय. चारचौघात आजही त्यावर बोलण्याचे स्त्रिया टाळतात. पण विषय तर जिव्हाळ्याचा आणि आजही अनेक स्त्रिया शास्त्रीयरीत्या बनवलेले सॅनिटरी पॅड वापरत नाहीत. मुळात त्यांना सॅनिटरी पॅडचे महत्त्व समजलेले नसते. यातून मग स्त्रियांच्या आजाराची सुरुवात होते. पण या विषयावर जनजागृती करण्याचे काम डॉ. दीपक खाडे आणि शैला खाडे हे दाम्पत्य करत आहे. त्यांनी याविषयी दोन हजारांहून अधिक कार्यक्रम पूर्ण करून स्त्रियांना आरोग्यसंपन्न आयुष्य बहाल केले आहे.


नॅचरल हेल्थ अँड एज्युकेशन फाऊंडेशन ट्रस्टच्या माध्यमातून, महिलांची मासिक पाळी शाप की वरदान? विषयांतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात २००० पेक्षा जास्त कार्यक्रम पूर्ण केले आहेत. महिलांच्या मासिक पाळीसारखा संवेदनशील विषय गांभीर्याने घेऊन समाजामध्ये असणाऱ्या रूढी, परंपरेच्या नावाखाली चालत आलेले मासिक पाळीबद्दल बरेच समज-गैरसमज, अंधश्रद्धा समाजात पसरलेल्या आहेत. याच विषयावर डॉ. दीपक खाडे (नॅचरोपाथ) जनजागृतीचे कार्यक्रम शाळा, कॉलेज, आदिवासी पाडे, गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये २०१७ पासून घेत आहेत.


कुटुंबाकडून, समाजाकडून मासिक पाळीमध्ये कळत-नकळतपणे जी वागणूक दिली जाते, त्याचे दुष्परिणाम प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आपल्या मुली आणि महिलांच्या मनावर होत असतात आणि झालेले सुद्धा आहेत. मासिक पाळी विषय हसत खेळत घेऊन महिलांच्या मनातील प्रश्नांवर उत्तरे शोधण्यासाठी त्यांना प्रवृत्त करण्याचे काम करत आहेत. तसेच मासिक पाळीच्या दिवसात घ्यावयाची काळजी तसेच बाजारात उपलब्ध प्लास्टिक सॅनिटरी नॅपकिनमुळे महिलांना होणाऱ्या विविध आजारांपासून दूर राहण्यासाठी जैविक सॅनिटरी नॅपकिन वापरण्याबाबत माहिती दिली जाते. त्याचबरोबर स्वच्छतेबरोबर मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घेण्याबाबत माहिती दिली जाते. शैक्षणिक / करिअर कौन्सिलर म्हणून कार्यरत असलेले दीपक खाडे यांचे मासिक पाळीवरील जनजागृतीचे कार्य फक्त २८ मे जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनाच्या निमित्तानेच नव्हे, तर नियमितपणे अविरत सुरू आहे.

Comments
Add Comment