कोकणचा श्री गजानन या दैवताशी विशेष घनिष्ट संबंध आहे. म्हणूनच श्री गणेशाला इथल्या प्रत्येक गावात व घरात विशेष स्थान प्राप्त झाले आहे. सिंधुदुर्ग – तारामुंबरी गावातील ३२० वर्षांच्या परंपरेनुसार साजऱ्या केल्या जाणाऱ्या ‘खवळे’ कुटुंबीयांच्या घरगुती गणपतीचे ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये स्थान प्राप्त केलेल्या या अनोख्या गणपती उत्सवाविषयी.
कोकणात सर्वांत मोठा उत्सव म्हणून गणेशोत्सवाला महत्त्व दिले जाते. त्यामुळे सण-उत्सवांची परंपरा, तेथे पूर्वापार चालत आलेली संस्कृती त्याच भक्तिभावाने व श्रद्धेने जोपासली जाते. संपूर्ण कोकणचा प्रांत हा विविधतेने नटलेला असून त्याला समृद्ध कला, साहित्य व संस्कृतीचे अधिष्ठान लाभले आहे. चौदा विद्या व चौसष्ट कलांचा अधिपती समजला जाणारा गणपती कोकणातील घरोघरी मूर्तीच्या स्वरूपात आणून पूजला जातो. अपवाद फक्त मालवण बांदिवडे येथील कोईल गाव! तेथे घरात मूर्ती निषिद्ध असल्याने फक्त देवळातील मूर्तीची पूजा होते. महाराष्ट्रीय माणूस उत्सवप्रिय आहे आणि महाराष्ट्रभूमी अनेकविध सणांचं माहेरघर.
सणांची राणी दिवाळी असो किंवा लोकप्रिय गणेशोत्सव, सारेच सण इथे उदंड उत्साहात साजरे होतात. सर्व आबाल-वृद्ध उत्साहाने या सण-समारंभात सहभागी होतात. कोकणात सुद्धा गणेशोत्सव भरपूर उत्साहाने साजरा होतो. इथला गणेशोत्सव साधा आणि फारसा डामडौल नसलेला असतो. कोकणातील गणेशोत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य हे की, इथे मुंबई-पुण्यासारखे सार्वजनिक गणपती कमीच असतात. प्रचंड आकाराच्या मूर्ती, डोळे दीपवणारा दिव्यांचा चकचकाट, कानठाळ्या बसवणारे लाऊडस्पीकर असे काही इथे अभावानेच आढळते. बाह्य भपक्यापेक्षा श्रद्धा-भावनेला आणि कौटुंबिक वातावरणाला इथे अधिक महत्त्व दिलेले दिसते. कोकणातले गणपतीबाप्पा घरोघरी विराजमान असतात. बाप्पांच्या आगमनासाठी घराघरांमध्ये स्वच्छता आणि रंगरंगोटी केली जाते. आकर्षक मखर आणि सुंदर सजावट बाप्पांच्या दैवी सौंदर्यात भर घालतात. मोठ्या थाटामाटात, झांज-ताश्यांच्या आणि “गणपती बाप्पा मोरया”च्या गजरात वाजत-गाजत गणेशाचे आगमन होते. मुले-माणसे आनंदाने जल्लोष करतात, फटाके वाजवतात.
स्त्रिया मंगलमूर्तीचे पूजन करतात. गणेशाची मूर्ती चौरंगावर प्रतिष्ठापित केल्यावर सर्वजण आरती म्हणतात. प्रसाद म्हणून केळी अथवा गूळ-खोबरे वाटले जाते. उकडीचे मोदक हा कोकणातील गणपती उत्सवातला खास मेनू. तांदळाच्या पिठाच्या गोल लाट्या लाटून त्यामध्ये गुळ-खोबऱ्याचे चून अथवा सारण भरून उकडून केलेले हे मोदक घरोघरी दिसून येतात. एकवीस मोदकांचा नैवेद्य गणेशमूर्तीला अर्पण केला जातो. काही घरांमध्ये गव्हाच्या पीठाचे तळून बनवलेले मोदकही दिसतात. बाजारात खव्याचे मोदक, काजू मोदक, आंबा मोदक, ई. अनेक प्रकारचे मोदकही उपलब्ध असतात. मोदाकांसोबत लाडू, करंज्यासुद्धा बनवल्या जातात. काही घरात दीड दिवस, तर काही घरांमध्ये तीन, पाच, सात ते अगदी अनंत चतुर्दशीपर्यंत पूर्ण अकरा दिवस गणपती असतो. शहरातील चाकरमानी लोक कोकणातील आपापल्या गावी येऊन घरामध्ये कुटुंबासमवेत गणपती उत्सव साजरा करण्याचा आनंद लुटतात. लोक एकमेकांच्या घरी जाऊन गणपती बाप्पांसमोर एकत्रितपणे आरत्या म्हणतात. अशा विविधतेने नटलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुका येथून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या ऐतिहासिक ‘गाबीत मुमरी’ अर्थात ‘तारामुंबरी’ गावातील खवळे या कुटुंबामध्ये गेली तीनशे पंधरा वर्षे गणपती उत्सव साजरा केला जात आहे. सदर गणपतीची कहाणीही तितकीच रंजक आहे.
खवळे घराण्यातील शिवतांडेल नामक सरदार विजयदुर्ग किल्ल्यावरील सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या आरमारात होता. त्यांच्या ताब्यात अनेक गुराब जातीची गलबते होती. ती मुंबरीच्या खाडीत नांगरलेली असत. तरणाबांड शिवतांडेलच्या लग्नाला सात वर्षे झाली तरी त्याची वंशवृद्धी होत नव्हती. त्यामुळे तो काहीसा चिंताग्रस्त असायचा. अचानक एके दिवशी झोपेत त्याला मालडी (मालवण) या मूळ गावातील नारायण मंदिरातील गणेशाने दृष्टांत देऊन आपली स्थापना करण्याची आज्ञा दिली. त्याप्रमाणे १७०१ मध्ये त्या गणपतीची रितसर स्थापना करण्यात आली. त्याचे फळ म्हणून त्याला पुत्ररत्न झाल्याने बालकाचे नाव गणोजी ठेवले. पुढे, १७५६ मध्ये विजयदुर्ग किल्ल्यावर लढाईत शिवतांडेल यांना अटक झाली व नंतर त्यांचे निधन झाले. त्यांची समाधी तारामुंबरीत खवळे यांच्या शेतात आहे. तेथे दर सोमवारी दिवा व अगरबत्ती लावली जाते. आज त्यांची दहावी पिढी तितक्याच आनंदाने दरवर्षी गणेशोत्सव साजरा करतात आणि त्याला जागतिक पातळीवर नेण्याचे प्रयत्न करताना दिसतात.
त्या महागणपतीचे वैशिष्ट्यही नावीन्यपूर्ण! जगात कोठेही न आढळणारे असे काहीसे दिसून येते. तो गणपती अन्य कारागिरांकडून न बनवता स्वत: खवळे कुटुंबातील व्यक्तीच बनवतात. सध्या ते काम भाऊ खवळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे बंधू चंद्रकांत व सूर्यकांत, कोणताही साचा न वापरता बनवतात. तशी प्रथाच पूर्वांपार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चालत आली आहे. सुमारे दीड टन माती त्यांच्याच शेतजमिनीतून आणली जाते. नारळी पौर्णिमेला सुवर्ण नारळ सागराला अर्पण केल्यानंतर मूर्ती घडवण्यास प्रारंभ होतो, तर शेजारच्या विठ्ठल-रखुमाई मंदिरात हरिनाम सप्ताहाला सुरुवात होते. मूर्ती बैठी व पावणेसहा फूट उंचीची असते. दरवर्षी कोणताही बदल न करता एकच आकार, तेच रूप व रंग आणि उंची असते. गणेशचतुर्थीला गणपतीबाप्पाच्या संपूर्ण अंगाला सफेद चुना लावून फक्त डोळे रंगवले जातात. त्याच स्वरूपात त्याची प्रतिष्ठापना करून विधिवत पूजा होते, तर दुसऱ्या दिवशी उंदीर पूजेला लावतात. त्यावेळी नैवेद्य म्हणून खीर दाखवल्यावर ती शेतातही समाधीस्थळाजवळ ठेवली जाते. तिसऱ्या दिवशी पुन्हा रंगकामाला सुरुवात होते, तर पाचव्या दिवशी संपूर्ण रंगकाम पूर्ण होते. संपूर्ण अंगाला लाल रंग, चंदेरी रंगाचा अंगरखा, पितांबर, सोनेरी मुकुट, त्यावर पाच फण्यांचा नाग, मागे गोल कागदी पंखा व हातावर शेला अशी विलोभनीय मूर्ती साकारली जाते. नंतर सातव्या, अकराव्या, पंधराव्या, सतराव्या व एकविसाव्या दिवसांपर्यंत सतत रंगकाम सुरूच असते. विसर्जनाच्या दिवशी दुपारी पिवळे ठिपके दिले जातात. त्यामुळे मूर्तीचा चेहरा काहीसा उग्र रूप धारण केल्याप्रमाणे दिसतो. अशा प्रकारे एकवीस दिवसांत विविध रूपे साकारणारा असा तो एकमेव गणपती असावा.
पहिले पाच दिवस दोन वेळा व नंतर दिवसातून तीन वेळा आरती केली जाते. दररोज रात्री भजनाचा कार्यक्रम होतो. पाचव्या दिवसापासून रोज तिन्ही सांजेला गणपतीची दृष्ट काढली जाते! हे एक विशेषच म्हणावे लागेल. अलीकडे भाविकांची गर्दी वाढू लागल्याने तो उत्सव एकवीस दिवस अधिकाधिक जल्लोषात साजरा करण्यात येतो. दर्शनासाठी भाविकांप्रमाणेच राजकारणी व सेलिब्रिटींची उपस्थितीही लक्षणीय होत आहे. त्या दिवसांत सर्वांचे आदरातिथ्य करण्यात खवळे बंधू कमालीचे व्यस्त असतात. त्या उत्सवाची ‘लिम्का बुक’मध्ये ९ वर्षांपूर्वीच नोंद झाली असून ‘गिनीज बुक’मध्ये नोंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पूर्वी प्रसारमाध्यमांची वानवा असल्याने व त्या घराण्याला प्रसिद्धीचा हव्यास नसल्याने सदर गणपतीला प्रसिद्धीचे वलय लाभले नव्हते; परंतु अलीकडे मात्र त्याची ख्याती वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांच्या माध्यमांतून सर्वदूर पोहोचल्याचे आढळते. त्या गणपतीची महती सांगणारा ‘विघ्नहर्ता महागणपती’ हा मराठी चित्रपट पूर्ण झाला असून लवकरच तो प्रदर्शित होणार आहे. विसर्जनाच्या आदल्या दिवशीची रात्र लळीत अर्थात जागर म्हणून साजरी केली जाते. त्यावेळी संध्याकाळी खवळे घराण्यातील पूर्वजांच्या पगड्यांची विधिवत पूजा केली जाते. त्यास ‘जैनपूजा’ म्हणतात. त्यावेळी विशिष्ट आरती म्हणत, भजन, नृत्ये, नाट्यछटा व फुगड्यांचा कार्यक्रम सादर केला जातो. मध्यरात्री तमाशाचे आयोजन केले जाते. त्यात पुरुषाला साडी नेसवतात. पहाटे अंगात वारी (अवसर) येतात, तेव्हा नवस फेडणे व नवे नवस बोलणे, पुरुषांच्या फुगड्यांचा कार्यक्रम होऊन महागणपतीची आरती करून दृष्ट काढली जाते.
विसर्जनाच्या दिवशी सकाळी खवळे कुटुंबीयांच्या पूर्वजनांना ‘पिंडदान’ केले जाते. गणेशोत्सवात पिंडदान होणारा तो एकमेव गणपती असावा. त्यावेळी भाविकांना दुपारी महाप्रसाद दिला जातो. गणपतीचे विसर्जन मंगळवार व शनिवार या दिवशी वर्ज्य असते. विसर्जन सोहळाही भव्यदिव्य स्वरूपात असतो. गणपतीची मूर्ती गाडीवर रथात बसवली जाते. ढोल, ताशे, लेझीम या वाद्यांसह भगवे झेंडे, तलवारी नाचवत, फटाक्यांच्या आतषबाजीत मोरयाचा गजर करत, गुलाल रंगाची उधळण करत गणेशमूर्ती समुद्रकाठी विसर्जन करण्यासाठी आणतात. तेथे दांडपट्टा, बनाटी, तलवार व लाठी असे शिवकालीन मर्दानी प्रकार खेळले जातात. विसर्जन सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील शेकडो भाविक, खवळे बांधव, त्यांचे सर्व पाहुणे व गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित असतात. पुरुष मंडळी फेर धरून नाचू लागली की, निरोपाची वेळ येते. पाण्यात प्रथम उंदीरमामाला नेण्यात येते. नंतर सागाची फळी पाटाखाली घालून महागणपती खांद्यावरून पाण्यात नेला जातो आणि विधिवत विसर्जन केले जाते.
भगवान परशुरामाने समुद्र हटवून निर्माण केलेल्या, अभिजात निसर्गसौंदर्य व जैवविविधता लाभलेल्या देवभूमीचा अर्थात कोकणचा श्री गजानन या दैवताशी विशेष जवळचा संबंध आहे. तसाच संबंध महाराष्ट्राला लाभलेल्या सातशेवीस किलोमीटरच्या सागरी किनारपट्टीत वसलेल्या अनेक मंदिरांशी आहे. त्यात प्रामुख्याने महडचा वरदविनायक, पालीचा बल्लाळेश्वर, दिवेआगरचा सुवर्ण गणेश, हेदवीचा श्री लक्ष्मी गणेश, गणपतीपुळ्याचा श्री स्वयंभू गणेश, मेढ्याचा जयगणेश व रेडीचा द्विभुज श्री महागणपती इत्यादी अशा प्रकारे कोकणात गणेशदेवतेला प्रत्येक गावात व घरात विशेष स्थान प्राप्त झाले आहे. श्रीगणेशाचा उत्सव हा शुचिर्भूत होऊन करावा, असा प्रघात आहे; परंतु गणपतीसमोर पिंडदान केले जाते हे ऐकून आश्चर्य वाटेल. पण ही वस्तुस्थिती आहे. कोकणातील देवगड तालुक्यातील तारामुंबरी गावातील खवळे महागणपतीसमोर पितृपक्षात पिंडदान करून त्याची पूजा केली जाते.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…