-
विशेष: लता गुठे
कवितेला व्रत मानणारे केशवसुत हे गेल्या शंभर वर्षांमध्ये एकमेव असे कवी आहेत. त्यांच्या कवितेचे स्मारक झाले. त्यांची ‘शिपाई’ तसेच ‘तुतारी’सारखी कविता आहे. ते शिल्पकारासाठी एक आव्हानच आहे.
कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी निर्माण केलेले, कवी मनाला आकर्षित करणारे आणि मराठी समस्त कवींना अभिमान वाटावा असे केशवसुत स्मारक…
प्राप्तकाल हा विशाल भूधर
सुंदर लेणी तयात खोदा…!
केशवसुतांच्या या सुभाषिताप्रमाणेच नुकतीच कवितेच्या राजधानीला म्हणजे मालगुंडला भेट दिली. या आधीही अनेकदा मी केशवसुत स्मारकामध्ये जाऊन आले आहे, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अनेक सभा, कार्यक्रम तिथे होत असतात. माझं सर्वात आवडतं ठिकाण म्हणूनच ते मला तिकडे खेचून घेऊन जातं. याचं कारण असंही असेल की, माझ्या कवी मनाला ते साद घालतं, त्यामुळे माझं ते आकर्षण आहे.
केशवसुत स्मारक हे गणपतीपुळ्यापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेलं मालगुंड हे गाव. रेल्वेने गेलं की, रत्नागिरीला उतरायचं आणि तेथून रिक्षा करायची. रत्नागिरी शहरातून बाहेर पडले की, गर्द हिरवाईच्या नागमोडी अरुंद रस्त्याने वनराई पाहत पाहत पुढे पुढे मार्ग क्रमांक करायचं. पुढे गेलं की, डाव्या बाजूने विस्तीर्ण असा समुद्रकिनारा हे शाळेत किनाऱ्याला येणाऱ्या पांढऱ्या शुभ्र चमकणाऱ्या लाटा आणि आरे वारे समुद्रकिनाऱ्याचा तो परिसर आणि स्वच्छ हवा. समुद्रावरून झेपावत येणारे वारे अंगाला असे काही बिलगतात की, असे वाटते आपण इथे आल्याचा त्यांनाही आनंद झाला आणि ते आपल्याला मिठीत घेताहेत. डोळ्यांच्या कॅमेऱ्याने ते सौंदर्य टिपत मनात भरून घेताना हा एक-दीड तासांचा प्रवास कधी संपतो ते समजतही नाही. गणपतीपुळे येथे आलं की, गजाननाचे दर्शन घेऊन मालगुंडच्या दिशेने मार्गक्रमण करायचं. छोटासा पूल ओलांडला की, लगेच पाच-दहा मिनिटांमध्ये केशवसुत स्मारकांमध्ये आपण पोहोचतो. उतरल्याबरोबर नजरेत भरते ती सुंदर कमान आणि केशवसुतांचं जुनं कौलारू बैठं घर. त्यासमोर असलेलं मोठं अंगण, तुळशीचं वृंदावन आणि त्या बाजूला उभे असलेले नामनदिवे आणि अंगणाच्या चहुबाजूने विविध प्रकारची हिरवीगार झाडी. केशवसुतांचं घर पाहताना एक वेगळाच आनंद मिळतो. कारण, ज्या घरांमध्ये केशवसुतांचं बालपण गेलं. तो परिसर नयन मनोहर परिसर कायम केशवसुतांच्या कवितेत अधोरेखित झाला. कित्येक वर्षे आधीपासून त्या कविता मनाला रुंजी घालत होत्या. वाड्यातून बाहेर पडले आणि डाव्या बाजूला उभं असणारं तुतारीचं शिल्प त्यावर नजर खिळते. तिथे मनसोक्त फोटो काढून त्या शिल्पाला आपल्याबरोबर कॅमेऱ्यात कैद करून नंतर केशवसुतांच्या सुप्रसिद्ध कविता वाचनाचा आनंद घ्यायचा. इथे सिमेंटचे उभे कट्टे करून त्यावर काळ्या रंगाचे फळे तयार करून त्यावर पांढऱ्या रंगाने लिहिलेल्या कविता. त्या वाचताना जो आनंद मिळतो तो आवर्णनीय असा असतो…
समोर पाहिलं की, हिरव्यागार वेलींनी अच्छादलेल्या मोहक कमानी आणि त्यालगत असलेलं कमळाचं छोटसं पाण्याचं कुंड आणि समोरच्या भिंतीवर ठसठशीत अक्षरात लिहिलेले केशवसुतांच्या कवितेतील एक सुभाषित…
प्राप्तकाल हा विशाल भूधर
सुंदर लेणी तयात खोदा…!
जे आमच्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या लोगोवर कायम आम्ही वाचत असतो. कोकण मराठी साहित्य परिषदेची सभा गणपतीपुळ्यापासून अगदी तीन किलोमीटर अंतरावर असलेलं मालगुंड गाव. पर्यटकांचं आकर्षण म्हणजे तेथील ‘केशवसुत स्मारक.’ ज्याची निर्मिती पद्मश्री मधु मंगेश कर्णिक कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक यांनी अतोनात कष्ट करून ‘केशवसुत स्मारकाची’ उभारणी केली आणि आज ती कवितेची राजधानी झाली. मधुभाईंच्या मनात असलेला कवी केशवसुत यांच्याविषयी आदर आणि आणि त्यांच्या कवितांवर असलेले नितांत प्रेम प्रकर्षाने जाणवते.
अनेक कवितांमध्ये केशवसुतांनी हे सांगितलेले आहे की, कवी आणि कविता यांच्यामध्ये एक अभिन्नता आहे. ही अभिन्नता तशीच राहू द्यावी. या अभिनतवाचक नातं हे मधुभाई आणि केशवसुत यांच्यामधलं असावं. यामुळेच मधुभाईंच्या मनामध्ये केशवसुतांच्या कवितेचं स्मारक व्हावं ही कल्पना आली आणि त्यांनी ती प्रत्यक्षात साकारली. जेव्हा कवी केशवसुत यांच्या तुतारीचे अप्रतिम अशा शिल्पीचे उद्घाटन झाले, तेव्हा मीही तिथे उपस्थित होते. मला तेव्हा एक प्रश्न पडला की, कवी केशवसुत यांच्याच कवितेचे स्मारक का व्हावे? या प्रश्नाचे उत्तर मला मिळाले ते एम. ए.ला असताना केशवसुत यांचा अभ्यास करताना. कवी केशवसुत यांना ‘आधुनिक मराठी कवितेचे जनक’ असे संबोधले जाते. वर्षानुवर्षे एक विशिष्ट पद्धतीने रचलेली कविता स्वच्छंद आणि मुक्त रूपात आणणारे केशवसुत हे पहिले होते. म्हणून त्यांना आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हटले जाते.
कवी केशवसुत कवितेकडे किती गांभीर्याने पाहतात, हे आजच्या कवीने अधोरेखित करायला हवे, ते एका कविमित्राला पत्राद्वारे लिहितात “बाबा रे, कविता ही आकाशातून कोसळणारी वीज आहे आणि ती धरण्याचा प्रयत्न करणारे शेकडा नव्याण्णव टक्के लोक होरपळून-जळून जातात. म्हणून तुला इशारा देऊन ठेवतो. होरपळून-जळून गेलेले कवी लक्षात घे. त्यांच्या काव्यामध्ये त्या जळण्याच्या जखमा आहेत आणि तरीसुद्धा ते महान काव्य आहे. वीज त्यांनी पकडली आहे, ती पकडल्यावर यातना होणार, वेदना होणार, जखमा होणार. माणूस जळणार, सर्व काही होणार.” हे कवी केशवसुत यांनी त्यांच्या अनुभवातून लिहिले आहे हे उघडच. कविता हे एक व्रत आहे. कवितेला व्रत मानणारे केशवसुत हे गेल्या शंभर वर्षांमध्ये एकमेव असे कवी आहेत. त्यांच्या कवितेचे स्मारक झाले. ‘शिपाई’सारखी कविता आहे, ‘तुतारी’सारखी कविता आहे. ते शिल्पकाराला आव्हान आहे.
ही ‘मराठी काव्याची राजधानी पाहायला कविताप्रेमी पर्यटक आवर्जून जातात. म्हणून मालगुंड हे गाव प्रसिद्धीस आलं आहे.’ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर भारतातील सर्व वाङ्मयप्रेमी लोक तिथं यायला पाहिजेत, अशा प्रकारचं स्मारकाचं स्वरूप आहे. याबरोबरच याच ठिकाणी आजवर मराठी साहित्यामध्ये मैलाचे दगड ठरलेले कवी त्यांचे फोटो आणि त्यांच्या कविता वाचायला मिळतात, हे दालन पाहताना त्यात ज्येष्ठ श्रेष्ठ कवींच्या स्मृतीस अभिवादन करून बाहेर पडले आणि तिथे असलेल्या ग्रंथालयाचे अवलोकन केले. तिथे काही साहित्यप्रेमी पुस्तक चाळताना वाचताना दिसले. त्या पलीकडे असलेले नारळी पोफळीच्या बागेतील खुले सभागृह. आणि बाजूला राहण्याची व्यवस्था असलेल्या आधुनिक रुम्स. असे हे भव्य दिव्य अलौकिक ठिकाण कोकणाच्या सौंदर्यात अधिक भर घालते आणि पर्यटकांसाठी ती पर्वणीच ठरते.