दापोली : माझ्या नेतृत्वावर सर्व संचालक मंडळ, बँकेचे भागधारक सभासद आणि हिंतचिंतक यांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच आज दापोली अर्बन बँकेमध्ये अध्यक्ष म्हणून २५ वर्ष कामकाज पाहणार असून असेच प्रेम माझ्यासोबत राहावे. बँक ही आपल्या सर्वांची आहे. यापुढे अधिकाधिक प्रगती कशी होईल व त्याचा फायदा सर्व सभासदांना कसा मिळेल यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत, असे अभिवचन दापोली अर्बन बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जयवंत जालगावकर यांनी दिले.
दापोली अर्बन बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर नुकतीच बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक देखील बिनविरोध पार पडली. यावेळी बँकेमध्ये सलग ३६ वर्षे संचालक असलेले जयवंत जालगावकर यांनी २५ व्या वेळी बँकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी हाती घेतली, तर उपाध्यक्षपदी जालगावचे विनोद आवळे यांची निवड झाली. यावेळी सहाय्यक निबंधक रोहिदास बांगर, तृप्ती उपाध्ये, वेदा मयेकर यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. यावेळी जालगावकर यांनी बँकेच्या वाटचालीचा आढावा घेताना सांगितले की, चिपळूण अर्बन बँकेने दापोलीतील शाखा बंद करण्याचे ठरविल्यानंतर दापोली अर्बन बँकेची स्थापना त्यावेळच्या मान्यवरांनी केली. त्यावेळी बँक चालवताना मणियार शेठ, सैतवडेकर, विविध वस्तू भांडार, मालू शेठ आणि उंबर्लेतील सुपारी व्यापारी मधुसुदन करमरकर यांनी वेळोवेळी मदत केली. त्यामुळे आज बँक नावारूपाला येऊ शकली आहे.
आज अनेकजण म्हणतात की, जालगावकरांचे योगदान काय तर बँकेच्या स्थापनेवेळी माझा भाऊ हा सभासद होता व त्यावेळी काही लाखांमध्ये बँकेत जालगावकर कुटुंबीयांची ठेव होती व तिथपासून आजपर्यंत आमची बँकेसोबत नाळ जुळली आहे. बँकेमध्ये कामकाज करताना आपण कधीही राजकारण केले नाही व यापुढे करणार नाही. असे सांगतानाच सर्व हितचिंतकांनी जी जबाबदारी आम्हा सर्व संचालक मंडळावर दिली आहे. ती आम्ही निश्चितच पार पाडू. आज जुन्या संचालकांच्या जोडीला नवे संचालक विराजमान झाले असून हे सर्वजण आपले बहुमूल्य योगदान निश्चितच देतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व संचालक मंडळाचे अभिनंदन चिपळूण अर्बनचे अध्यक्ष निहार गुडेकर, उपाध्यक्ष निलेश भुरण, संचालक मोहन मिरगल, दिपा देवळेकर, दापोली ग्रामीणचे अध्यक्ष सचिन मालू, संचालक वसंत शिंदे, रूचिता नलावडे, जगदीश वामकर, संजय महाडीक, माजी आमदार डॉ. चंद्रकांत मोकल यांच्यासह दापोली अर्बन बँकेचे कर्मचारी
वृंदाने केले.