-
स्वयंसिद्धा: प्रियानी पाटील
फेसबुकवर अनेक चेहरे तरळले. सण उत्सवामुळे भेटी होऊ लागल्या. पण जो तो आपापले क्रेडिट सांभाळून स्थिरस्थावर झालेला दिसला. पण प्रश्न उरला तो मागल्या बाकावरील मंडळींचा.
शाळेत क्लासमध्ये थेट मागच्या बाकावर बसणाऱ्यांची एक वेगळी ओळख होती. मजा-मस्ती, ना कसला ताणतणाव, ना शिक्षकांच्या नजरा झेला, ना त्यांच्या कोणत्याही आकस्मिक प्रश्नांना सामोरे जा. असं सगळं मजेत चाललं असतानाच परीक्षा आली की, मात्र मोठ्या संकटाला सामोरे गेल्यासारखे पुढच्या बाकावरले विद्यार्थी भासले तरी मागच्या बाकावरल्या विद्यार्थ्यांना काहीच कसले टेन्शन नसायचे. परीक्षेदरम्यान हे कोरे पेपर टाकून सगळ्यांच्या आधीच वर्गातून बाहेर गेलेले असायचे.
बरे त्यानंतर तरी कोणते टेन्शन, तर तेही नसायचे. क्लासना दांडी. शाळेतील वेळेचे भान नाही. प्रार्थना तर ठाऊकच नसायची. ती कोणती आहे, कशी म्हणतात, साऱ्या बाबतीत कोरडे असायचे. मॉनिटरने बनविलेल्या तक्रारींच्या पहिल्या यादीत यांची नावे प्रथम क्रमांकावर असायची. यांची पंगत मधल्या सुट्टीत पहिल्या पंक्तीत येऊन डबा खायला बसायची तेवढीच. मात्र पुन्हा वर्ग सुरू झाले की, हे जागच्या जागी. शाळेच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी व्हायचे म्हटले की, ही पंगत चिडीचूप. स्नेहसंमेलन असो किंवा असो वक्तृत्व स्पर्धा किंवा कोणताही कार्यक्रम ही मंडळी कधीच सहभागी होताना दिसायची नाही. त्यांची त्यांची गँग असायची. येता-जाता ती ठरलेली असायची. त्यांच्या ग्रुपमध्ये काय गोंधळ तो त्यांचा त्यांनाच ठाऊक असायचा. पण कधीही पुढे पुढे न करणारी ही गँग स्पोर्ट्सच्या वेळी अशी काही मैदानं मारायची की, सारे गपगार होऊन जायचे.
एरव्ही शाळेत कधीही लवकर न येणारी ही मंडळी त्या दिवसांमध्ये दोन दोन तास अगोदर येऊन मैदानावर खेळाची प्रॅक्टिस करताना दिसायची. जीव तोडून खेळायची. शाळेच्या चार भिंतीतल्या स्पर्धेची बक्षिसे यांच्याकडे नसली तरी मैदानावरील सारी बक्षिसे यांनी जिंकलेली असायची. ‘सावी’ अनेकदा आमच्या घरासमोरून रेंगाळायची जेव्हा स्पोर्ट्स सुरू असायचे. तिच्यासह ती आम्हालाही गँगमध्ये घेऊ इच्छित असायची. पण तिचा प्रयत्न फारसा सफल व्हायचा नाही. ‘अगं, भाऊ दहावीला आहे. त्याचे क्लास सुरू असतात, तो लवकर जातो. त्याने पाहिलं ना शाळेच्या वेळेआधी मैदानावर तर काही धडगत नाही.’ म्हणून वेळ निभावली जायची. मग ती बिनधास्तपणे शाळेत पुढे सरसावलेली असायची.
मागल्या बाकावर बसणाऱ्यांची वेगळी ओळख असली तरी त्यांच्यासोबत मैत्री होती. अगदी घट्ट, पण अभ्यास म्हटला की, मंडळी दूर पळायची. इथे चित्त थाऱ्यावर नसायचे. मग पुढे परीक्षा झाल्या, एक एक वर्ग पुढे करत शाळा, कॉलेज सुरू असतानाच एकेकाच्या थेट विवाहाच्या बातम्याच कानावर आदळू लागल्या. सगळे जिकडे तिकडे स्थायिक झाले. मग प्रत्येकाचा मार्गच निराळा. मैत्रीच्या प्रवाहातील सारी मंडळी आपापल्या कार्यक्षेत्रात विसावली. मग कुणाचा कुणाला पत्ताही नव्हता. पण नंतर मोबाइलमुळे सारेच चित्र पालटले. दरम्यान काहींना नोकऱ्या मिळाल्या, काही वणवण करत राहिले. काहींनी संसार थाटले, तर काही विवाहाच्या प्रतीक्षेत. फेसबुकवर अनेक चेहरे तरळले. सण, उत्सवामुळे भेटी होऊ लागल्या. पण जो-तो आपापले क्रेडिट सांभाळून स्थिरस्थावर झालेला दिसला. पण प्रश्न उरला तो मागल्या बाकावरील मंडळींचा.
ही मंडळी पाहिली, तेव्हा दिलखुलासपणे बोलताना दिसली. त्यांना ना तेव्हा काही टेन्शन होते, ना आता. शाळा अर्ध्यावर सोडून का धन्यता मानली यांनी? हा प्रश्न उरला तरी त्यांना नोकरीची भ्रांत अशी उरलीच नाही. त्यामुळे वेळच वेळ त्यांच्यापाशी उरलेला. जो तो संसारात छानपैकी रमून मोबाइलच्या व्यापात रमलेला. जसेजसे प्रत्येकाला एकमेकांचे मोबाइल नंबर मिळत गेले तसे तसे मेसेज सुरू झाले. गुड मॉर्निंग, सणवार, काही टिप्सच्या माध्यमातून मोबाइलवर यांचा राबता सुरू झाला. पण वेळ कुठे असतो, रोज रोज सगळ्यांना मेसेज पाठवायला. म्हणून मग टाळाटाळ. मागली बेंच वाईट नव्हतीच मुळी. पण अभ्यासात आजवर मागे राहण्यासाठी टाळाटाळ केलेल्या या मंडळींना रोज रोज न चुकता मेसेज पाठवायला वेळ मिळतोच कसा? हा प्रश्न वारंवार पडत राहिला. नंतर आले ते शाळेतील सर्वांनी एकत्र येऊन भेटण्याचे क्षण. ठिकठिकाणी अनेक कार्यक्रम होताना दिसून आले. मग कुणी कुणी आपल्या शाळेचे ग्रुप तयार केले. सगळ्यात हुशार विद्यार्थ्यांनी या ग्रुपचे प्रतिनिधित्व करावं, ही अपेक्षा साहजिकच असताना अचानक या ग्रुपच्या अॅडमिनचे नाव पाहिलं, तर थेट मागल्या बाकावरच लक्ष जावं तसा भास झालेला. कुठून आला हा बिनधास्तपणा, एरव्ही शाळेचं प्रतिनिधित्व करायला मागे मागे असणाऱ्या या मंडळींमध्ये अचानक एवढा बिनधास्तपणा आला कुठून? शाळेच्या ग्रुपचा मोबाइलवर व्हॉट्सअॅप ग्रुप बनवून अॅडमिन होण्याचा हा बिनधास्तपणा खरंच मनाला स्पर्शून गेला काहीसा आणि या धाडसाचं कौतुकही वाटलं. आता रोज निरनिराळे गुड मॉर्निंगचे मेसेज, कुणाचा वाढदिवस, काही कौतुक सोहळे म्हटले की, ग्रुप अॅडमिन जिंदाबाद! अशी परिस्थिती दिसू लागली आहे. दरम्यान आता वेळ कामाच्या व्यापामुळे शाळेत रोज पहिल्या बाकावर असणारे मेसेज आणि विविध कौतुक सोहळ्यात काहीसे मागच्या बाकावर असतात आणि मागल्या बाकावरले जणू शाळेचंच प्रतिनिधित्व करत थेट ग्रुप अॅडमिन बनून आता एकदम पहिल्या रांगेत बसल्यासारखे झळकतात एवढंच!