अहमदाबाद : आयपीएलच्या सोळाव्या हंगामात विजेतेपद पटकावण्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात रविवारी महामुकाबला रंगणार आहे. गुरू धोनीविरुद्ध हार्दिकची पुन्हा अग्निपरीक्षा असेल. या अग्निपरीक्षेस पार केल्यास सलग दुसऱ्यांदा ट्रॉफीवर कब्जा करण्याचे गुजरातचे स्वप्न साकार होणार आहे. चेन्नईने हा सामना जिंकल्यास मुंबई इंडियन्सच्या सर्वाधिक ५ ट्रॉफीज जिंकण्याच्या विक्रमाशी त्यांची बरोबरी होईल.
चेन्नईच्या विजेतेपद पटकावण्याच्या मार्गात गुजरात टायटन्सच्या शुभमन गिलचा अडथळा आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात धोनीच्या टीमसमोर शुभमन गिलच्या बॅटला रोखण्याचे आव्हान असेल. यंदाच्या हंगामात तीन शतके आणि ८५१ धावा करणाऱ्या गिलच्या बॅटला लगाम घालणे हे सीएसकेसमोरचे सर्वात मोठे आव्हान असेल.
चेन्नईच्या ताफ्यातील दीपक चहर, रवींद्र जडेजा, मोईन अली, तुषार देशपांडे, मथिशा पाथिराना या गोलंदाजांसमोर गुजरातची परीक्षा असेल. चेन्नईसाठी डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे फॉर्मात आहेत. युवा फलंदाज शिवम दुबेने ३८६ धावा केल्या आहेत. रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी हे अनुभवी फलंदाज त्यांच्या ताफ्यात आहेत. या सर्वांवर संघाच्या फलंदाजीची भिस्त असेल.