मुंबई : पूर्व आणि पश्चिम यांना जोडणारा विद्याविहार रेल्वे स्थानकावरून जाणारा उड्डाणपूल महापालिकेच्या वतीने बांधण्यात येत आहे. या उड्डाणपुलासाठी तब्बल १,१०० मेट्रिक टन वजन असणारा सुमारे १०० मीटर लांबीचा पहिला गर्डर यशस्वीपणे स्थापन करण्यात आला आहे. महापालिकेच्या अभियांत्रिकी चमूने हे आव्हानात्मक लक्ष्य पूर्ण केले.
एन विभाग हद्दीत, घाटकोपर परिसरात पूर्वेकडील रामकृष्ण चेंबूरकर आणि पश्चिमेकडील लालबहादूर शास्त्री मार्ग यांना जोडण्यासाठी विद्याविहार रेल्वे स्थानक रुळांच्या वरून जाणारा उड्डाणपूल महापालिकेच्या पूल विभागाच्या वतीने बांधण्यात येत आहे. या उड्डाणपुलाच्या निर्मितीमध्ये रेल्वे रुळांवरून जाणारा सुमारे १०० मीटर अंतराचा मुख्य पूल समाविष्ट आहे. हा पूल बांधताना दोन्ही बाजूच्या वाहतुकीसाठी प्रत्येकी एक असे दोन स्टील गर्डर स्थापन करावे लागणार आहेत. या गर्डरचे वैशिष्ट्य म्हणजे ते भारतातील रेल्वेवरील आतापर्यंतचे सर्वाधिक असे प्रत्येकी ९९.३४ मीटर लांब व ९.५० मीटर रुंद गर्डर आहेत. त्यांचे वजन प्रत्येकी सुमारे अकराशे मेट्रिक टन आहे. या दोन खुल्या स्टील गर्डरची रेल्वे मार्गावर टप्प्याटप्प्याने उभारणी करण्यात येत आहे.
त्यानुसार, या दोनपैकी पहिला गर्डर काल शनिवार (दिनांक २७ मे २०२३) मध्यरात्रीनंतर १.२० वाजता ते आज (दिनांक २८ मे २०२३) पहाटे ४.२० (म्हणजे तीन तासांच्या कालावधीत) यशस्वीपणे स्थापन करण्यात आला आहे. गर्डर स्थापन करण्याचा शुभारंभ स्थानिक खासदार मनोज कोटक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले यांच्यासह भालचंद्र शिरसाट, प्रवीण छेडा प्रमुख अभियंता (रस्ते) एम. एम. पटेल, प्रमुख अभियंता (पूल) संजय कौंडण्यपुरे आणि मध्य रेल्वेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पहिला गर्डर बसवण्यासाठी मध्य रेल्वेने मेगाब्लॉक मंजूर केला होता. त्या वेळेत गर्डर स्थापन करण्याचे काम विंच पुलिंग पद्धतीने पूर्ण करण्यात आले. प्रारंभी सदर गर्डर पूर्व बाजूकडून पश्चिम दिशेला सरकवत, रेल्वे रुळांच्यावर मधोमध आणण्यात आला. आता येत्या दोन-तीन दिवसात उत्तरेकडे सरकवून तो स्थित करण्यात येईल. तसेच, दुसरा गर्डर स्थापन करण्याचे काम देखील लवकरच हाती घेण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे या गर्डरला मधोमध आधार न ठेवता अर्थात विनाखांब एकसंघपणे त्याची उभारणी केली जात आहे. एकूणच हा अभियांत्रिकी क्षेत्रातला अविष्कार आहे. महापालिकेच्या अभियंत्यांनी आजवर वेगवेगळे आव्हानात्मक प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण करून दाखवले आहेत. सदर गर्डरची यशस्वी स्थापना ही देखील महापालिकेच्या अभियांत्रिकी यशस्वी कामगिरीतील नवीन टप्पा ठरला आहे.
पहिल्या गर्डरनंतर दुसरा गर्डर स्थापनेचे काम लवकरच मार्गी लावण्यात येईल. त्यानंतर दुसर्या टप्प्यामध्ये पुलाच्या पूर्व व पश्चिम बाजूंकडील १७.५० मीटर रुंदीच्या पोहोच रस्त्यांचे (approach roads) काम करण्यात येईल. प्रकल्पाचे संपूर्ण काम डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे महानगरपालिका प्रशासनाचे नियोजन आहे.