-
क्राइम: अॅड. रिया करंजकर
आयुष्यभर नोकरी केल्यानंतर एक दिवस असा येतो की, वय झाल्यावर व्यक्तीला रिटायर व्हावं लागतं. नोकरीमध्ये असताना केलेल्या सेवेचा मोबदला म्हणून कंपनी आपल्या कामगार लोकांना प्रॉव्हिडंट फंड व ग्रॅच्युइटी देते. तसंच काही लोकांना पेन्शनही सुरू होते.
अनिता वयोमनाप्रमाणे एका प्रायव्हेट कंपनीमधून रिटायर झाली. तिला तिच्या कामाचा मोबदला पेन्शन आणि ग्रॅच्युइटीमधून मिळाला. ज्या घरात एखादी व्यक्ती रिटायर होते, त्या व्यक्तीच्या आजूबाजूला कधी तिला न विचारणारे लोक जमा होतात आणि वेगवेगळी कारणं सांगून आपल्याला हिच्याकडून पैसा कसा मिळेल, हे प्रयत्न करत असतात. तसंच अनिताच्या बाबतीतही होऊ लागलं. अनिताने विचार केला की, आपल्याला आपला पैसा कुठेतरी गुंतवला पाहिजे की, ज्यामुळे म्हातारपणात तो मला उपयोगी येईल. म्हणून तिच्या भावाने आणि त्या भावाच्या मित्राने तिला एका व्यक्तीकडे पैसे गुंतवणूक कर, असं सांगितलं. ती व्यक्ती शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवतात व आपल्याला डबल करून देते, असं सांगितलं. पण या गोष्टीवर अनिताचा विश्वास बसेना. कारण, अशी कुठली स्कीम आजपर्यंत ऐकली नव्हती. म्हणून तिने यूट्यूब मदत घेऊन अशा काही स्कीम आहेत का, याबद्दल सर्च केलं. त्यावेळी तिला शेअर मार्केटबद्दल थोडीशी कल्पना आली आणि आपला भाऊ आहेच. त्याच्यामुळे टेन्शन घेण्याचे कारण नाही, असं तिला वाटलं. अनिताने आपला भाऊ आणि त्याच्या मित्राला मी पैसे गुंतव, असं सांगितलं. पण तिच्या भावाने ज्या माणसाकडे गुंतवणूक करायचे आहेत, त्याची भेट घालून दिली आणि त्याने अनिताला ती स्कीम समजावून सांगितली. आठ महिन्यांमध्ये तुमचे पैसे डबल कसे होऊ शकतात, हे तिला सांगितलं. आठ महिन्यांत पैसे डबल होतात. ही स्कीम वाईट नाही, असं अनिता आणि तिच्या भावाला वाटलं. म्हणून आणि त्याने दोन लाख रुपये गुंतवले आणि करारनामा, करारपत्र बनवून घेतलं आणि हा सर्व व्यवहार अनितामार्फत तिचा भाऊ बघत होता. कारण, अनिता आता वयस्कर झाल्यामुळे तिला धावपळ वगैरे जमत नसल्यामुळे तिचे सगळे व्यवहार भाऊच बघत होता. ज्याच्याकडे पैसे गुंतवले होते, त्याने त्या पैशांमध्ये शेअर्स विकत घेतलेले आहे, असं अनिता आणि तिच्या भावाला सांगितलं. परत त्याच व्यक्तीने तुम्ही अजून एक लाख भरा म्हणजे तुम्हाला अजून डबल मिळतील म्हणजे तीन लाख तुमचे आणि तीन लाख तुम्हाला मिळतील म्हणजे एकूण सहा लाख तुमचे मिळतील, असं त्यांना सांगितलं. दोन लाख गुंतवले आहेत, तर एक लाख गुंतवायला काही हरकत नाही. असं अनिताला वाटलं आणि तिने अजून एक लाख रुपये गुंतवले. आता आपले डबल पैसे कधी मिळतील, याची वाट ती आणि तिचा भाऊ बघू लागले. आठ महिने उलटून गेले तरी त्यांना पैसे मिळाले नाहीत.
त्यावेळी त्यांनी चौकशी केली तेव्हा त्यांना कळलं की, ज्या व्यक्तींकडे आपण पैसे गुंतवलेले आहेत. त्या दोघा भावांना फसवणुकीच्या गुन्ह्याअंतर्गत अटक केलेली आहे. त्यावेळी अनिता आणि तिच्या भावाला समजलं की, इतर लोकांप्रमाणे आपलीही फसवणूक झालेली आहे. म्हणून अनिता आणि तिच्या भावाने मध्यस्थी असलेल्या मित्राला गाठून ते दोघेजण जामिनावर बाहेर आल्यावर त्यांच्याकडे पैसे वसूल करायचं ठरवलं. ते लोक जामिनावर बाहेर आले. अनिताला तीन लाखांचा चेक त्याने दिला. म्हणजे अनिताने जे पैसे दिले होते, त्याच पैशाचा चेक अनिताला मिळाला. अनिताने विचार केला की, आपण भरलेली रक्कम आपल्याला मिळते, तेवढेच आपल्यासाठी समाधान. फसवणूक तर झालेली आहे ते बरं, असा विचार तिने केला. तोच चेक तिने बँकेमध्ये भरला असता बाऊन्स झाला. आता अनिता आणि तिच्या भावाने त्या दोघा भावांविरुद्ध चेक बाऊन्स अंतर्गत कोर्टामध्ये केस दाखल केलेली आहे. डबल पैसे मिळण्याच्या नादात आता अनिता आणि तिच्या भावाला कोर्टाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत.
(सत्य घटनेवर आधारित)