Friday, May 9, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

मुंबईतील सोसायट्या, घरमालकांना पालिकेचा दणका

मुंबईतील सोसायट्या, घरमालकांना पालिकेचा दणका

मुंबई : मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य यंत्रणेचा भाग असलेल्या कीटकनाशक विभागाकडून पावसाळापूर्व तयारीसाठी उपाययोजना या जानेवारीपासून केल्या जातात. पावसाळी आजारांना रोखण्यासाठी पावसाळापूर्व कामांमध्ये डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्याचे काम महापालिकेचा कीटकनाशक विभाग करत असतो. मात्र या उपाययोजना करण्यासाठी सोसायट्या, घरमालक सहकार्य करत नाहीत. त्यामुळे डासांची उत्पत्तीस्थाने वारंवार आढळतात. महापालिकेने जानेवारी ते मे या कालावधीत अशा १२० सोसायटी, घरमालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. या सोसायट्या आणि घरमालकांना मॅजिस्ट्रेट न्यायालयाने दंडही ठोठावला आहे. त्यांच्याकडून ३ लाख ८२ हजार रुपये दंड वसूल केला आहे. त्यामुळे डास उत्पत्तीस्थाने नष्ट करा किंवा त्यासाठी उपाययोजना करा अन्यथा गुन्हा दाखल केला जाईल, असा इशाराच महापालिकेने दिला आहे.


जानेवारी ते मे या कालावधीत मलेरिया आजाराला प्रतिबंध करण्यासाठी मुंबईतील १८ हजार १९९ ठिकाणी यामध्ये खासगी इमारती, शासकीय इमारती इत्यादी ठिकाणी तपासणी मोहीम हाती घेण्यात आली. यामध्ये १ हजार ९२७ ठिकाणी डासांच्या उत्पत्तीस्थानांपैकी १ हजार ८६० ठिकाणी प्रत्यक्ष मलेरिया पसरवणारी डासांची उत्पत्ती स्थाने आढळली. तसेच १ लाख ३० हजार ८९० विविध कंटेनर तपासणी केल्यानंतर १ लाख २४ हजार ५२ कंटेनरमधील डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्यात आली आहेत. विविध यंत्रणांचा समावेश असलेल्या डास निर्मूलन समितीची त्याआधी बैठकही होऊन त्यानुसार नियोजन केले जाते. या कामाला पावसाळ्याआधी किटकनाशक विभागाकडून गती देण्यात येत आहे. डासांची पैदास होऊ नये, यासाठी इमारतींवरील टाक्या डास प्रतिबंधक करणे, यासह अडगळीचे साहित्य निष्कासित करणे इत्यादी उपाययोजना केल्या जातात. यासाठी महापालिकेच्या किटकनाशक विभागाकडून मोहीम चालवली जाते.डेंग्यूची उत्पत्तीस्थाने ही चाळ, झोपड्यांमध्ये आढळून येतात. गेल्या पाच महिन्यांत ६४ हजार ९४७ ठिकाणांमध्ये ४० लाख ३३ हजार १०८ घरांची तपासणी करण्यात आली.


कारवाईचा बडगा


जानेवारी ते मेपर्यंत उत्पत्तीस्थाने नष्ट करण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या ३ हजार ७३८ सोसायटी, घरमालकांना नोटीस बजावून उत्पत्तीस्थाने नष्ट करण्याचे आदेश दिले. यामध्ये बहुतांश नोटीस मलेरिया डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट न करण्याबाबतच आहेत. ३ हजार ७३८ पैकी १२० सोसायटी, घरमालकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून मॅजिस्ट्रेट न्यायालयामार्फत दंड ठोठावण्यात आला आहे.


डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्याविरोधात दंड ठोठावण्यात येतो. हा दंड दोन हजार रुपये ते १० हजार रुपयांपर्यंत असतो. आतापर्यंत ३ लाख ८२ हजार रुपयांहून अधिक दंड ठोठावण्यात आला आहे.

Comments
Add Comment