सलीम-जावेद या यशस्वी लेखक जोडीतील एकट्या सलीम खान यांची पटकथा आणि संवाद असलेला ‘नाम’ हा चित्रपट आला १९८६ साली! सिनेमा गाजला, त्याने बॉक्स ऑफिसवरही एक रेकॉर्ड निर्माण केले. अनेक शहरातील सिनेमागृहात तो वर्षभर मुक्काम ठोकून होता. ‘नाम’ने इतकी कमाई केली की ८०च्या संपूर्ण दशकात सर्वात जास्त कमाई करणाऱ्या सिनेमात त्याचा क्रमांक ८वा लागतो. त्याकाळी अमेरिका, इंग्लंडमध्ये जाणे सोपे नव्हते. पण नशीब काढायला म्हणून अनेक भारतीय दुबईत जात. असाच नोकरीसाठी दुबईत गेलेला एक युवक म्हणजे विकी कपूर (संजय दत्त) त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारा त्याचा भाऊ रवी कपूर (कुमार गौरव) आणि त्यांची आई जानकी कपूर (नूतन) यांच्या प्रमुख भूमिका असलेली कथा नाट्यमय आणि रंजक होती. श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहताना नेमका स्मगलर लोकांच्या तावडीत सापडलेल्या विकीच्या दुर्दैवी जीवनावरचा हा चित्रपट! त्यात अमृता सिंग, पूनम धिल्लन आणि परेश रावळही होते. दिग्दर्शक महेश भट, संजय दत्त आणि परेश रावळ यांच्या कारकिर्दीत याचा फार मोठा वाटा आहे.
दुबईत तेथल्या भारतीयांसाठी मनोरंजनाचा कार्यक्रम असतो. कार्यक्रमातील आनंद बक्षीजींनी लिहिलेल्या त्या हळव्या गीताचा सिनेमाच्या यशात मोठा वाटा होता. कारण त्या गाण्याने जगभर वेगवेगळ्या देशात राहणाऱ्या भारतीयांच्या हृदयालाच हात घातला. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या संगीत दिग्दर्शनात पंकज उधास यांनी गायलेल्या त्या गाण्याचा समावेश बी.बी.सी. रेडिओने शतकातील सर्वात लोकप्रिय ठरलेल्या १०० गाण्यात केला. गाण्याचे शब्द होते –
चिट्ठी आई है, वतनसे चिट्ठी आयी है.
बड़े दिनोंके बाद, हम बेवतनोंको याद,
वतनकी मिट्टी आयी है, चिट्ठी आयी है…
आज तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे भौगोलिक अंतराची अक्राळविक्राळता संपली आहे. क्षणाक्षणाला लोक एकमेकांच्या संपर्कात असतात. त्याकाळी मात्र भौगोलिक अंतर खूप दु:खद वाटायचे. शिवाय परदेशातील नोकऱ्यांत सुट्ट्याही मिळत नसत. माणूस परदेशात गेला की त्याची भेट वर्षानुवर्षे होत नसे.
अजून एक गोष्ट म्हणजे अनेक सामाजिक बदल हळूहळू घडत गेल्याने त्यांची निर्घृणता आपल्या लक्षात येत नाही. पूर्वी मानवी संबंधात किती भावनिकता होती, ओलेपणा होता. आता सगळे आटून किती शुष्क झाले आहे हे विचार केले तरच लक्षात येते. भेट किंवा फोनवरचा संवादही सहज शक्य नसल्याने त्याकाळी पत्राचे खूप महत्त्व होते. पत्रावरचे स्वत:चे नाव, लिहिणाऱ्या प्रियजनाचे अक्षर पाहूनसुद्धा आनंद वाटणे सुरू व्हायचे.
ऊपर मेरा नाम लिखा हैं, अंदर ये पैगाम लिखा हैं,
ओ परदेसको जानेवाले, लौटके फिर ना आनेवाले,
सात समंदर पार गया तू, हमको जिंदा मार गया तू,
खूनके रिश्ते तोड़ गया तू, आँखमें आँसू छोड़ गया तू
कम खाते हैं, कम सोते हैं, बहुत ज्यादा हम रोते हैं.
चिट्ठी आयी है…
घरातली व्यक्ती किंवा जवळच्या मित्राशिवाय माणसाला सगळे गाव ओसाड वाटायचे. कोणताही सणवार आनंद द्यायचा नाही. उलट जीवलगांच्या आठवणीने प्रत्येक सण उदास करायचा. तेव्हा माणसांचा आनंद माणसात होता. वस्तू किंवा पैशात नव्हता! त्यामुळे क्षणात वातावरण करुण करून टाकणारे बक्षीजींचे शब्द येतात –
सूनी हो गईं शहरकी गलियाँ, कांटे बन गयी बागकी कलियाँ,
कहते हैं सावनके झूले, भूल गया तू हम नहीं भूले,
तेरे बिन जब आयी दीवाली, दीप नहीं दिल जले हैं खाली,
तेरे बिन जब आयी होली, पिचकारीसे छूटी गोली.
पीपल सुना, पनघट सुना, घर शमशानका बना नमूना,
फसल कटी आयी बैसाखी, तेरा आना रह गया बाकी..
बक्षीजींनी एकेक तपशील इतका सुंदर दिला की, भारतातील कोणत्याही भागातल्या माणसाला तो भावनिक करून टाकायचा. मग पत्र वाचताना जुन्या सिनेमात दाखवत तसा पत्रातून लिहिणाऱ्याचा चेहरा दिसू लागायचा –
पहले जब तू खत लिखता था,
कागजमें चेहरा दिखता था.
बंद हुआ ये मेल भी अब तो,
खतम हुआ ये खेल भी अब तो..
आनंद बक्षीजींनी गाण्यात कहर केला होता. जिच्या लग्नासाठी पैसे जमवायला भाऊ परदेशात गेला आहे तोच नेमका लग्नाला येऊ शकणार नाही हे माहीत असूनही बहिणीचे डोळे वाटेकडे लागलेले असत. त्याकाळी रेल्वेगाड्या कमी होत्या, पैसे नसायचे पण अशा प्रसंगी माणूस काहीही करून पोहोचत असे. कारण घरचे त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेले असत. कोणताही प्रसंग आजसारखा केवळ सोपस्कार नव्हता तो समरसून साजरा करायचा सांघिक आनंद असायचा.
डोली में जब बैठी बहना रस्ता देख रहे थे नैना
मैं तो बाप हूँ मेरा क्या है, तेरी माँका हाल बुरा है,
तेरी बीवी करती है सेवा, सूरतसे लगती हैं बेवा.
आईच्या मागे लपून वडील आपली व्यथा मांडताहेत. ‘माझी काही तक्रार नाही बाबा, पण तुझी आई आजारी आहे म्हणून तरी ये’ असे ते म्हणतात. ‘तुझी पत्नीच आईची सेवा करतेय. तुझ्या विरहाने ती एखाद्या विधवेसारखी खिन्न भासतेय.’ असे सांगून परदेशात गेलेल्या मुलाला परत बोलावण्याचा पित्याचा प्रयत्न आहे. त्याला मुलाला दूर नेणाऱ्या परदेशाविषयी राग आहे. त्याची शेवटची विनंती तर कुणाच्याही डोळ्यांत पाणी आणते. तो म्हणतो, “तू खूप पैसे कमावलेस पण शेवटी माणसाला लागते काय? ती भाकरी तर आपल्याही घरी पुरेशी आहे रे, परत ये. आता माझे वय झाले आहे. जीवनाचा भरोसा नाही.’
तूने पैसा बहुत कमाया, इस पैसेने देश छुड़ाया,
देश पराया छोड़के आजा, पंछी पिंजरा तोड़के आजा.
आजा उमर बहुत है छोटी, अपने घरमें भी हैं रोटी!
या गीताने भारतीयांना, विशेषत: परदेशात राहणाऱ्या भारतीयांना, इतके रडवले की, ते गाणे जागतिक पातळीवरचे एक लोकप्रिय गीत ठरले. अनेकदा तर आपल्या गावाची, स्वकीयांची आठवण काढून रडण्यासाठी लोक हे गाणे ऐकत. आज सगळेच बदलले आहे. दूर देशी सोडा, माणूस कायमचे गेले तरी डोळ्यांत अश्रूचा थेंब येत नाही! समाचाराला आलेले लोक गेल्यावर टीव्ही चालू होतो. मालिकेतल्या दु:खाने लोक उसासे टाकतात. चहा-पाणी सुरू असते. कित्येकदा तर हास्यकल्लोळही ऐकू येतो. पण नुसत्या पत्राने डोळ्यांत पाणी आणणारी अशी गाणी ऐकून त्या भावनांनी रसरसलेल्या समृद्ध ओल्याचिंब काळात कधीतरी जाऊन यायलाच हवे ना?
नैना प्रकल्पाची गतीने अंमलबजावणी करावी मुंबई : भविष्यातील आव्हाने लक्षात घेता पर्यावरण पूरक आणि समृद्ध…
नवी दिल्ली : काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याने देश हादरून गेला असतानाच, केंद्र सरकारने…
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीगच्या ४२व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा सामना राजस्थान रॉयल्सशी होत आहे.…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, मोदी सरकारने पाकिस्तान संबंधित राजकीय, आर्थिक आणि राजनैतिक आघाड्यांवर काही…
१८४ प्रवाशांना घेऊन राज्य सरकारची दोन विशेष विमाने पोहोचली २३२ प्रवाशांसाठी उद्या आणखी एक विशेष…
पहलगाम हल्ल्यानंतर 'फौजी' ची अभिनेत्री इमानवी इस्माईलला विरोध Prabhas Actress Imanvi Esmail: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण…