नवी दिल्ली : राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने जोरदार तयारी सुरु केली आहे. पण केंद्रीय निवडणूक आयोग मात्र लोकसभेसोबतच विधानसभा निवडणुकांच्याही तयारीला लागल्याचे दिसत आहे. याचे कारण म्हणजे निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनंतर राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार त्या त्या जिल्ह्यातील निवडणूक शाखांमधील कर्मचाऱ्यांना निवडणुकीव्यतिरिक्त अन्य कोणतीच कामे देऊ नयेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे निवडणूक विभागातील सर्वच कर्मचारी-अधिकारी सध्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कामाला लागले असल्याचे चित्र आहे.
लोकसभा व विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या कामकाजाची जबाबदारी जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने तिथल्या उपजिल्हा निवडणूक अधिकारी आणि त्यांच्या अंतर्गत असलेल्या कर्मचारी वर्गावरच असते. भारतीय निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पूर्वतयारीसाठी ठरवलेल्या योजनेनुसार सर्व कामे वेळेत व्हावीत यासाठी निवडणूक शाखेतील कर्मचारी, अधिकाऱ्यांवर जबाबदारी राहणार आहे. त्यामुळे त्या त्या जिल्ह्यातील निवडणूक शाखांमधील कर्मचाऱ्यांना निवडणुकीव्यतिरिक्त अन्य कोणतीच कामे देऊ नयेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
निवडणूक आयोगाची ही तयारी पाहता २०२४ मध्ये लोकसभेसोबतच विधानसभा निवडणुका होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. राजकीय वर्तुळातही याची चर्चा रंगत आहे.