ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे शहरात भटक्या कुत्र्यांची समस्या तीव्र स्वरूप धारण करत आहे. काही दिवसांपूर्वी कळवा येथील मनीषा नगर येथे रात्री उशिरा एका जेष्ठ नागरिकावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. त्यानंतर ते प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत गेले होते. ठाणे शहरातील सर्वच प्रभागात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे. या भटक्या कुत्र्यांचा आळा घालण्यासाठी १४ पिंजऱ्यांची व्यवस्था
करण्यात येणार आहे.
त्यासाठी सुमारे ४२ लाखांचा निधी खर्च करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. अनेक ठिकाणी दुचाकी स्वारांवर रस्तोरस्ती कुत्र्यांच्या टोळ्या हल्ले करत आहेत. तसेच रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर हल्ले करत असल्याच्या घटनाही वाढल्या आहेत.
भटक्या कुत्र्यांची समस्या दूर करण्यासाठी ठाणे महापालिकेने भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाबरोबरच आता केंद्रीय प्राणी आयोगाच्या निर्देशानुसार भटक्या कुत्र्यांसाठी चक्क स्टेनलेस स्टीलचे पिंजरे उभारण्याचे ठरवले आहे. ठाणे शहरात भटक्या कुत्र्यांनी संख्या ७५ हजारांच्या आसपास पोहोचली असून यात सुमारे ५ हजारच्या आसपास पाळीव श्वान आहेत.
ठाणे महापालिकेच्या वागळे इस्टट विभागात निर्बिजीकरण केंद्र उभारले असून या केंद्रात आधी असलेल्या लोखंडी पिंजऱ्याऐवजी आता चक्क स्टेनलेस स्टीलचे पिंजरे उभारण्यात येणार आहेत. एका पिंजऱ्यात दोन श्वान याप्रमाणे ४२ लाख खर्चून १४ स्टेनलेस स्टीलचे पिंजरे उभारण्यात येणार आहेत. लोखंड गंजते त्यामुळे श्वानांना जखमा होतात म्हणून केंद्रीय प्राणी आयोगाने सुचवल्यानुसार लोखंडाचा बेस असलेले ४ बाय ५ फुटाचे डबल साईझचे स्टीलचे पिंजरे उभारले जात आहेत.