-
गोलमाल: महेश पांचाळ
गेल्या महिन्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची वेबसाइट हॅक झाल्याची बातमी कानावर पडली असेल. त्यात किती तथ्य हा पोलीस तपासाचा भाग होता. वेबसाइट कशी हॅक झाली, आता विद्यार्थ्यांचे कसे होणार? असे नानातऱ्हेचे प्रश्न निर्माण उपस्थित केले गेले. मात्र या प्रकरणाची उकल करण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले. आश्चर्य म्हणजे एका १९ वर्षीय विद्यार्थ्याने हॅकर्सच्या नादी लागून हे सर्व कांड केल्याचे उघड झाले.
आता प्रकरण काय ते पाहू. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक ३० एप्रिल २०२३ रोजी घेण्यात येणाऱ्या विविध अराजपत्रित गट ब आणि गट क संवर्गातील पदासाठी पूर्वपरीक्षांच्या परीक्षार्थींचे प्रवेशपत्र प्राप्त करण्यासाठी आयोगाच्या वेबसाइटवर बाह्य लिंक टाकण्यात आली होती. सदर बाह्य लिंकमध्ये बेकायदेशीर शिरकाव करून त्यामध्ये बदल करून त्यामधील माहिती अवैधरीत्या प्राप्त करण्यात आली आणि त्याद्वारे आयोगाच्या संकेतस्थळावरील ९४ हजार १९५ उमेदवारांचे प्रवेश पत्र बेकायदेशीररीत्या डाऊनलोड करण्यात आले. त्या लिंकवरील सदरची माहिती MPSC2023A या टेलिग्राम चॅनेलवर बेकायदेशीररीत्या प्रसारित झाल्यानंतर परीक्षार्थींमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. टेलीग्राम चॅनेलवर ही माहिती कशी आली? याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात अनेक उमेदवारांनी विचारणा केली जात होती. मात्र या चॅनेलवर माहिती आयोगाकडून अधिकृतरीत्या कोणीही शेअर केली नसल्याची खात्री सहसचिव सुनील अवताडे (वय ५४ वर्षे) यांनी केली. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने सी.बी.डी. बेलापूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला. सदरचा सायबर गुन्हा क्लिष्ट व आव्हानात्मक असल्याने सायबर पोलीस ठाण्याचे वपोनि विजय वाघमारे यांच्याकडे तपासकामी वर्ग करण्यात आला होता.
याप्रकरणी सायबर पोलीस ठाणे, नवी मुंबई यांनी सखोल तांत्रिक तपास करून अज्ञात इसमाने गुन्हा करताना वापरलेल्या आय. पी. ॲड्रेसचा शोध घेतला. तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित आरोपी रोहित कांबळे याच्यापर्यंत पोलीस पोहोचले. पुण्यातील चिखली परिसरातील पाटीलनगरात राहणाऱ्या रोहितच्या घराची सायबर पोलिसांनी झडती घेतली. त्याच्याकडील एक डेस्कटॉप, एक लॅपटॉप, तीन मोबाइल फोन व एक इंटरनेट राऊटर जप्त केले. रोहित हा सायबर अॅण्ड डिजिटल सायन्स या विषयातून बीएससीचा अभ्यासक्रम शिकत होता. हॅकिंगसह अन्य संगणकविषयक अनेक कोर्स त्याने केल्याची कबुली दिल्याने रोहितने हे कांड केले असावे, असा पोलीस पथकाची पक्की खात्री झाली. वीस दिवसांच्या तपासानंतर सायबर पोलीस ठाण्याचे वपोनि विजय वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने रोहितला २४ मे २०२३ नवी मुंबईत आणून अटक केली. सध्या तो पोलीस कोठडीत आहे. स्पर्धा परीक्षा देऊन आपले भवितव्य घडवू पाहणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे या प्रकरणाकडे लक्ष लागले होते. एमपीएससीच्या प्रश्नपत्रिका फुटल्या. हॉलतिकीट लिंक झाले, अशा स्वरूपाच्या बातम्या माध्यमातून देण्यात आल्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यामुळे या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन त्याचे धागेदोरे शोधून काढण्याचे काम नवी मुंबई पोलिसांना करावे लागणार होते. त्यासाठी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिसांची एक टीम तयार केली होती. पोलीस ठाण्याचे वपोनि विजय वाघमारे, सपोनि सागर गवसणे, पोउनि आकाश पाटील, सपोउनि मोहन पाटील, पोहवा सारंग, पोहवा कारखेले, पोना मंगेश गायकवाड, पोशि माने, पोशि अनिकेत पाटील, पोशि बुरूंगले, मपोशि गडगे यांच्या टीमने कौशल्यपूर्ण तपास करताना तीन पथके तयार केली होती. या पथकापैकी एका पथकाने पुण्यात जाऊन रोहितच्या घरावर छापा मारला आणि त्याला ताब्यात घेतले.
या गुन्ह्याचा यशस्वी तपास केल्याने महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांच्या मनात निर्माण झालेले काहूर काही अंशी शांत करण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण आरोपी रोहितचा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशी काही संबंध नसल्याची बाब स्पष्ट झाल्याने आयोगाच्या विश्वासार्हतेबाबत आता शंका घेण्यात अर्थ नाही. नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन तपासात क्लिष्ट असलेल्या गुन्ह्याचा तपास करून आरोपी रोहित कांबळेला अटक केल्याबददल आपल्या पथकाचे अभिनंदन केले. ज्या टेलिग्राफ चॅनेलवर उमेदवारांची हॉलतिकिटे प्रसारित करण्यात आली होती. त्या ठिकाणी प्रश्नपत्रिका उपलब्ध होतील, अशी टिप्स देण्यात आली होती. त्यामुळे एमपीएससीच्या परीक्षार्थींना टेलिग्राफच्या माध्यमातून आकर्षित करण्याचा प्रयत्न हॅकर्सकडून करण्यात आला असावा, अशी प्राथमिक माहिती पुढे आल्याचे भारंबे यांनी सांगितले. रोहित कांबळेला हे काम करण्यासाठी सुपारी दिली असावी. तो कोणत्या हँकर्स ग्रुपच्या संपर्कात होता, याची माहिती पोलीस घेत आहेत; परंतु दुदैव वाटते ते रोहितचे. सायबर शाखेचा अभ्यास करताना, रोहित कधी वाममार्गाला गेला, ते त्यालाही कळले नाही. पॉकेटमनी मिळतो म्हणून क्षुल्लक पैशांच्या प्रलोभनापोटी, सायबर विषयक ज्ञान घेऊन भविष्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळविण्याऐवजी त्याच्या हातात बेड्या पडल्या आहेत.
तात्पर्य : कोणत्याही विषयाचे ज्ञान प्राप्त करून त्यात प्रावीण्य मिळविण्याऐवजी या अर्धवट ज्ञानाचा गैरवापर केला, तर डोक्यात खूप हुशारी असली तरी माथ्यावर गुन्हेगारीचा शिक्का बसतो. तो कसा पुसणार?