Wednesday, March 19, 2025
Homeसाप्ताहिकरिलॅक्सअजूनही चव तशीच आहे...

अजूनही चव तशीच आहे…

  • मनातले कवडसे: रूपाली हिर्लेकर

आठवणींना गंध असतो तशीच आठवणींना चवही असते का हो? नक्कीच असावी! कारण एखाद्या पदार्थाची चव आपल्या मनात इतकी घट्ट रुजलेली असते की, कित्येक वर्षांनंतरही आपल्या आठवणीतून ती निघून जात नाही – नाहीशी होत नाही. त्या चवीचा संबंध आपल्या मनातील इतर अनेक गोष्टी वा व्यक्तींशीही जोडलेला असू शकतो. कदाचित म्हणूनच तो स्वाद-ती चव आपल्या कायम स्मरणात राहते. मग ती आईने सणासुदीला बनवलेली पुरणपोळी असेल किंवा आजारी असताना तिने बनवलेला मऊ भात असेल. दोन्हींची चव आई या व्यक्तीशी निगडित असते.

माझी आई अत्यंत सुगरण असल्याने बाबा क्वचितच बाहेर खात. तशीही काही वर्षांपूर्वी आजच्या एवढी हॉटेल संस्कृती रूजलेली नव्हती. काही कामानिमित्त बाबांना मुंबईला जावं लागे, तेव्हादेखील आई त्यांना किमान दोन दिवस पुरेल एवढा डबा त्यांना सोबत द्यायची. पण कधी कधी त्यांचा मुक्काम त्याहून वाढला, तर मात्र नाईलाजाने त्यांना बाहेर खावं लागे.

खाण्या-पिण्याच्या बाबतीत बाबा अत्यंत चोखंदळ होते. कारण, आईच्या हातची चव बाहेर कशी मिळणार? पण तरी त्यातल्या त्यात दादरमधलं एक छोटसं हॉटेल त्यांना पसंत होतं. तिथे ते नेहमी जात आणि घरी आल्यावर तिथल्या पदार्थांची तारीफ करत. मात्र शेवटी, ‘तरी तुझ्या आईच्या हाताची चव त्याला नाही हं…’ हे वाक्य आवर्जून आईला उद्देशून बोलत. आम्ही मुंबईपासून दूर गावी राहत असल्यामुळे हॉटेल संस्कृती आम्हाला फारशी परिचित नव्हती. पण बाबा ज्या हॉटेलची एवढी तारीफ करत त्या हॉटेलबद्दल आईला व आम्हा मुलांनाही कमालीची उत्सुकता वाटायची. मग बाबांच्या पाठीमागे ‘आम्हालाही त्या हॉटेलमध्ये न्या’ असा आम्ही हेका लावत असू. सुट्टीमध्ये बाबा कधीतरी आम्हाला आवर्जून तिथे नेत.

टेबल खुर्चीवर बसून मोठ्या ऐटीत वेटरला ऑर्डर द्यायची. तो अत्यंत आदबीने ऑर्डर नोंदवून घेई. थोड्याच वेळात तत्परतेने ते पदार्थ आणून आपल्यासमोर तो ते पटापट आकर्षकरीत्या मांडून ठेवी. हे सगळं पाहताना फार अप्रूप वाटायचं. मला आठवतं, आम्ही पहिल्यांदा जेव्हा त्या हॉटेलमध्ये गेलो आणि वेटरने आमची ऑर्डर असलेले पदार्थ आमच्या समोर मांडून ठेवले आणि आम्ही ते खायला सुरुवात करणार तेवढ्यात आईने आठवण केली, ‘ए पोरांनो, वदनी कवळ घेता कोण म्हणणार?’ मग आम्ही घरच्या शिस्तीप्रमाणे त्या हॉटेलमध्ये डोळे मिटून ‘वदनी कवळ घेता…’ श्लोक म्हणायला सुरुवात केली. तिथल्या लोकांना याचं फार कौतुक वाटलं. मुलांवर तुम्ही खूप चांगले संस्कार केले आहेत, असे बाबांना कौतुकाने ते सांगू लागले.

तिथे गेल्यानंतर आमची ऑर्डरही ठरलेली असे. बाबा इडली वडा, आई वडा सांबार, भावाचा उपमा आणि माझा मसाला डोसा हे पदार्थ पक्के असायचे. आम्ही मोठ्या चवीने सावकाश या पदार्थांचा आस्वाद घ्यायचो. खाऊन झाल्यानंतर बाबा आमच्यासाठी मँगोला मागवत. ‘दो मे चार’ असं काहीतरी ते वेटरला सांगत. बाबांची भाषा त्याला कशी काय अचूक समजते? याचं आम्हाला नवल वाटे. वेटर चार ग्लास घेऊन येई व मँगोलाच्या दोन बाटल्या त्या चार ग्लासमध्ये बरोबर ओतून समान विभागणी करी. मँगोला पिऊन झाल्यानंतर बाबा त्याला, ‘बिल लाव’ अशी ऑर्डर द्यायचे. मग वेटर थोड्याच वेळात एका छोट्याशा प्लेटमध्ये बडीशेप घेऊन त्याखाली टेबलवर बिल ठेवून जायचा. मी व भाऊ सारी बडीशेप फस्त करायचो. वेटरला टीप द्यायची असते, हे मला आधी माहीत नव्हतं. एकदा बाबांनी त्या बिलाच्या प्लेटमध्ये ठेवलेले सुट्टे पैसे मी उचलले आणि बाहेर आल्यावर ते बाबांकडे दिले आणि म्हणाले, ‘बाबा हे पैसे तर तुम्ही हॉटेलमध्येच विसरला होता…’

तेव्हा बाबा म्हणाले, ‘बेटा, ते मी मुद्दामच ठेवले होते-वेटरला टीप म्हणून!’
मी विचारलं, ‘टीप म्हणजे काय हो बाबा?’ त्यावर ते म्हणाले, ‘अगं, तो वेटर आपल्याला इतकं प्रेमाने सगळं आणून देतो, वाढतो, आपली काळजी घेतो म्हणून त्याला हे बक्षीस असतं. कळलं?’
‘तर मग बाबा, आईला तर तुम्ही रोजच टीप द्यायला हवी!’ असं मी बोलताच बाबा हसू लागले आणि आईने, ‘मी काय वेटर आहे का गं?’ असं म्हणून माझ्या डोक्यावर टपली मारली.

मुंबईला आल्यानंतर त्या हॉटेलमध्ये जाण्यासाठी आम्ही अत्यंत उत्सुक असायचो. तिथल्या पदार्थांची चव, तिथलं वातावरण, तिथल्या वेटरचा आदबशीरपणा हे सारं मला खूप आवडायचं. त्यानंतर पुढे मुंबईला मला स्वतःला कामानिमित्त अनेकदा जाण्याची वेळ आली, पण माझ्या कामाचं ठिकाण त्या हॉटेलपासून दूर वेगळ्या भागात असल्याने तिथे जाण्याचा योग कधी आला नाही. पण परवा अचानक मला नेमकं त्याच भागात काम निघालं आणि समोर हॉटेलची पाटी दिसताच माझं मन कित्येक वर्ष पाठीमागे गेलं. नकळतपणे माझे पाय हॉटेलच्या दिशेने खेचले गेले.

हॉटेलच्या रंगरूपात काळानुसार थोडाफार बदल झालेला असला तरी पूर्वीचा तो माहोल मला तसाच वाटला. मी आमच्या नेहमीच्या टेबलवर बसले आणि माझी आवडती डिश – मसाला डोसा ऑर्डर केली. थोड्याच वेळात वेटरने माझ्या पुढ्यात गरमागरम मसाला डोसा आणून ठेवला. मी पहिला घास घेतला मात्र… ‘अहाहा!! तोच वास, तीच चव!’ माझं मन भूतकाळात हरवून गेलं. बाबांच्या आठवणीने डोळे पाणावले. ‘सांबर तिखा हो गया क्या बहेनजी?’ वेटरच्या प्रश्नाने मी भानावर आले आणि, ‘नहीं नहीं बिलकुल नही. बहुत अच्छा है – एकदम पहिले जैसा!’ अशी दाद देत मी पुन्हा डोसा खाऊ लागले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -