-
नंदकुमार पाटील, कर्टन प्लीज
मराठी नाटकाला दोन शतकांचा इतिहास आहे. संगीत नाटकापासून जो हा उज्ज्वल आणि समृद्ध करणारा प्रवास सुरू झाला तो आजपर्यंत टिकून आहे. याचा अर्थ संगीत रंगभूमीचे कार्य वेगाने सुरू आहे, असे म्हणता येणार नाही. कारण प्रेक्षकांची अभिरुची पूर्णपणे बदललेली आहे. त्यामुळे संगीत रंगभूमीवर अपार प्रेम करत असलेल्या निर्मात्यांना सुद्धा प्रेक्षकांची अभिरुची ही जपावी लागते आहे. मधल्या काळामध्ये ‘अवघा रंग एकची झाला’ या संगीत नाटकाने तुफान लोकप्रियता मिळवली होती. अमेरिकेतल्या मराठी प्रेक्षकांनासुद्धा हा मोह काही आवरता आला नाही. त्यांनीसुद्धा या निमंत्रित नाटकाचा अमेरिकेत आनंद घेतला होता. पूर्वीचे आणि आताचे भुरळ घालणारे संगीत यांचा मिलाफ या नाटकात घातला होता. पत्रकार, नाटककार ज्ञानेश महाराव यांनी ‘संगीत संत तुकाराम’ या नाटकाचे प्रयोग करून जुन्या-नव्या प्रेक्षकांना आनंद देत असतात. पत्रकार, नाटककार, गीतकार विद्याधर गोखले यांनी मनोरंजनाचे विविध क्षेत्र हाताळताना संगीत नाटकासाठी केलेले कार्य हे महत्त्वाचे वाटते. आजही त्यांच्या स्मृती जागृत आहेत. त्याचा परिणाम म्हणजे सध्या त्यांची जन्मशताब्दी सुरू आहे. त्यांचे कुटुंबीय आणि स्नेही मंडळी एकत्र येऊन यानिमित्ताने संगीत कार्यक्रम वर्षभर करीत आहेत. पण आजच्या स्थितीत संगीत नाटकाची निर्मिती करून प्रेक्षक येतील का? अशा विवंचनेत निर्माते आहेत. विषय, सादरीकरण तेवढीच प्रभावित तांत्रिक बाजू नाटकाची बदलली आहे. त्यामुळे समाधान व्यक्त करावे, असा प्रेक्षकवर्ग नाटकाच्या दिशेने येताना दिसतो आहे. हे जरी खरे असले तरी काही हजारांच्या प्रयोगाची झेप आजचे नाटक घेईल का? असा प्रश्न कुठल्याही निर्मात्याला पडतो. पूर्वी तीनशे किंवा पाचशे प्रयोग होणे म्हणजे मराठी रंगभूमीवर सोहळ्याचे आयोजन केले जात होते. यातून कुठल्या नाटकाने एका हजारांच्या प्रयोगाची मजल मारली, तर वलयांकित कलाकारांच्या उपस्थितीत हा महासोहळा होत होता. आताही विक्रमाची हमी कोणी देईल का? असे वाटत नाही. कारण प्रेक्षकांबरोबर नाटक काम करणाऱ्या कलाकारांची विचारसरणी पूर्णपणे बदललेली आहे.
छोटा पडदा, मोठा पडदा हे प्रेक्षकांचे मनोरंजनाचे आता आवडते माध्यम झाले असले तरी ज्यावेळी प्रेक्षकांसाठी हे माध्यम उपलब्ध झाले. तेव्हा नाट्यवर्तुळात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. रूपेरी पडद्यावर बरेच व्यापक काही पाहायला मिळते म्हणताना प्रेक्षक त्याच्याकडे जास्त आकर्षित होतील, असे वाटले होते. पण तसे काही घडले नाही. नाटक ही जिवंत कला आहे. चौकटीतली असली तरी आनंद आणि मोहन टाकणारी आहे. त्यामुळे चित्रपटाचा नाटकावर फारसा तसा परिणाम झाला नाही. तसा काहीसा अंदाज छोट्या पडद्याच्या बाबतीतही लावला जात होता. घरबसल्या मनोरंजन होते म्हणताना नाट्यगृह ओस पडतील, असे वाटले होते. पण नाटकाने याही माध्यमावर मात केलेली आहे. उलट प्रेक्षक छोट्या पडद्याच्या आहारी मोठ्या संख्येने गेले होते. त्यावेळी याच नाटकाचे एकाच दिवशी तीन प्रयोग होत असल्याची संख्या त्यावेळी जास्त होती. हा करिष्मा फक्त शनिवारी, रविवारी होता असे नाही, तर अन्य दिवशीही तीन प्रयोग हाऊसफुल्ल करणाऱ्या नाटकांची संख्या त्यावेळी मोठी होती. मोबाइल हातात आला आणि वाहिन्यांची संख्या वाढली आणि प्रयोगावर त्याचा परिणाम होताना दिसायला लागला. तसे नाटकाच्या प्रयोगाची संख्या ही कमी व्हायला लागली. ती इतकी झाली की दिवसाला एक प्रयोग होत होते. पुढेही संख्या कमी झाली फक्त शनिवार, रविवार या दोन दिवशीच प्रयोग होताना दिसतात. यातून एका दुसरे नाटक गाजले, तर त्याच्या प्रयोगात सातत्य दिसते याला कलाकाराची निष्ठा आणि मालिका, चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या निर्मात्यांचे नाट्यप्रेम सांगता येईल. त्यांच्या सहकार्यामुळे सुट्टीच्या दिवशी का होईना नाटकाचे प्रयोग होताना दिसतात. नाटकाचा जो आशादायी प्रवास दिसतो त्यात प्रशांत दामले, भरत जाधव, मंगेश कदम या कलाकारांची नावे आवर्जून घ्यावे लागतील. कलावंत म्हणण्यापेक्षा सच्चे रंगधर्मी आहेत, असेच म्हणणे योग्य ठरेल. त्याला कारण म्हणजे यांनी प्रथम नाटकाला प्राधान्य दिले. नंतर अन्य माध्यमाला वेळ दिला आहे.
नाटक जुने, असो नाहीतर नवीन असो ते जर का उत्तम असेल, तर प्रेक्षक अशा नाटकाला आवर्जून गर्दी करतात. मध्यंतरी अभिनेते सुनील बर्वे यांनी मर्यादित प्रयोगात काही जुनी नाटके रंगमंचावर आणली होती. त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला होता. तो इतका होता की कितीतरी निर्मात्यांनी त्याच नाटकाचे काही प्रयोग पुढे करण्याचे धाडस दाखवले होते. बऱ्याच जुन्या नाटकांच्या प्रयोगाची संख्या लक्षात घेतली, तर आतापर्यंत त्यांची पाच हजारांहून अधिक प्रयोग झाल्याची नोंद आहे; परंतु एकदा प्रयोग सुरू केला आणि पुढे त्याचे हजार प्रयोग झाले आहेत त्यात यंदा कदाचित, मोरूची मावशी, वात्रट मेले, साही रे सही अशा कितीतरी नाटकांची नावे घेता येतील. ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ या नाटकाचे आतापर्यंत पाच हजारांच्या वर प्रयोग झालेले आहेत. अभिनेते, दिग्दर्शक निर्माते उपेंद्र दाते यांनी पुढाकार घेऊन हा सोहळा मुंबई आयोजित केला होता. ‘वस्त्रहरण’ या नाटकानेसुद्धा पाच हजारांच्या वर प्रयोग झाले आहेत. हे नाटक कायम स्मरणात राहणार आहे. त्याला कारण म्हणजे ते मालवणी नाटक होते. म्हणजे भाषेच्या मर्यादा आल्या. या नाटकाचे लंडनमध्ये प्रयोग झाले होते. अभिनेते मच्छिंद्र कांबळी आणि लेखक गंगाराम गव्हाणकर यांच्यासाठी हे नाटक नाव मिळून देणारे ठरले. नाटक ठरावीक संख्या लक्षात घेऊन या नाटकात वलायांकित कलाकारांनी भूमिका केल्या होत्या. आता त्याचे प्रयोग सुरू नाहीत; परंतु पुन्हा हे नाटक सुरू झाले, तर ते प्रेक्षकांना पुन्हा बघायला आवडेल. पूर्वी हजार प्रयोग होण्यासाठी काही वर्ष द्यावे लागत होते. आता ते गणित राहिलेले नाही. कलाकार नाटकाला पूर्ण वेळ देतीलच असे नाही, त्यामुळे कितीतरी नाटकांचे प्रयोग मध्येच थांबलेले आहेत. काही निर्मात्यांनी दुसऱ्या अभिनेत्याला घेऊन नाटकाचे प्रयोग केलेले आहेत. भविष्यात नाटकाच्या प्रयोग संख्येचे गणित काय असेल, हे आता सांगता येणे कठीण आहे; परंतु प्रयोगात सातत्य आहे. नव्या नाटकाची निर्मिती होत आहे, परदेशातही मराठी नाटके होत आहेत. हीच मुळात आनंद देणारी गोष्ट आहे.