Thursday, March 20, 2025
Homeमहामुंबईविस्टाडोम डब्यांना प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद

विस्टाडोम डब्यांना प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद

गेल्या सहा महिन्यांत रेल्वेची ९ कोटींची कमाई

मुंबई (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेवरील विस्टाडोम डब्यांना प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. मुंबई-गोवा मार्गावरील दऱ्या, नद्या आणि धबधब्यांची चित्तथरारक दृश्ये असोत किंवा मुंबई-पुणे मार्गावरील पश्चिम घाटाची नयनरम्य दृश्ये असोत, काचेचे टॉप आणि रुंद खिडक्या असलेले हे डबे प्रवाशांमध्ये लोकप्रिय ठरत आहेत.

नोव्हेंबर २२ ते एप्रिल २३ या सहा महिन्यांसाठी मध्य रेल्वेने चालवलेल्या ९ मार्गांवरील विस्टाडोम कोचने ६६ हजार ३०७ प्रवाशांनी प्रवास केला. यातून रेल्वेने रु. ८. ४१ कोटींचा महसूल मिळवला. मुंबई – मडगाव – मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेसला १०० टक्क्यांपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला असून या गाडीने ८ हजार २५६ प्रवाशांनी प्रवास केला. यातून रेल्वेने १.७१ कोटीचा महसूल मिळविला आहे. पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेसला १०० टक्के प्रतिसाद मिळाला असून यातून रेल्वेने ६.९६ कोटींचे उत्पन्न मिळवले आहे.

मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेसला ९८.८ टक्के प्रतिसाद मिळाला असून १५ हजार ५६४ प्रवाशांकडून १.१८ कोटींचा महसूल मिळाला आहे.

२०१८ मध्ये मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये विस्टाडोम कोच पहिल्यांदा मध्य रेल्वेत दाखल करण्यात आला. प्रवाशांच्या प्रचंड मागणीमुळे मुंबई-मडगाव मार्गावरील दुसरा विस्टाडोम कोच १५ सप्टेंबर २२ पासून तेजस एक्स्प्रेसला जोडण्यात आला. या डब्यांच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे हे डबे मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेसमध्ये २६ जून २०२१ पासून सुरू करण्यात आले आणि प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन मुंबई-पुणे मार्गावरील आणखी दोन विस्टाडोम डबे डेक्कन क्वीनला दि. १६ ऑगस्ट २०२१ पासून आणि प्रगती एक्स्प्रेसमध्ये २५ जुलै २०२२ पासून जोडण्यात आले. तसेच पुणे – सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेसमध्ये देखील एक विस्टाडोम कोच १० ऑगस्ट २२ पासून जोडण्यात आला आहे.

विस्टाडोम डब्यांमध्ये काचेच्या छताशिवाय रुंद खिडक्या, एलईडी दिवे, फिरता येण्याजोग्या सीट आणि पुशबॅक खुर्च्या, इलेक्ट्रिकली ऑपरेटेड ऑटोमॅटिक स्लाइडिंग कंपार्टमेंट डोअर्स, दिव्यांगांसाठी रुंद बाजूचे सरकते दरवाजे, सिरेमिक टाइल फ्लोअरिंग असलेली टॉयलेट इत्यादी अनेक वैशिष्ट्यांसह आकर्षक व्ह्यूइंग गॅलरी आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -