Friday, July 5, 2024
Homeक्रीडाIPL 2024गिलच्या शतकामुळे मुंबईचे स्वप्न भंगले

गिलच्या शतकामुळे मुंबईचे स्वप्न भंगले

६२ धावांनी दणदणीत विजय मिळवत गुजरात अंतिम फेरीत

अहमदाबाद (वृत्तसंस्था) : शुभमन गिलचा शतकी झंझावात आणि मोहित शर्माची भेदक गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर सरस कामगिरी करत गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सच्या स्वप्नांचा चकाचूर केला. शुक्रवारी झालेल्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात गुजरातने मुंबईला ६२ धावांनी पराभवाचे पाणी पाजले. विजयासह गुजरातने यंदाच्या हंगामात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम सामन्यात त्यांची गाठ चेन्नईशी पडणार आहे.

प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या मुंबई इंडियन्सचे फलंदाज मोठ्या लक्ष्याच्या दबावापुढे झुकले. नेहल वधेरा, रोहित शर्मा या सलामीवीरांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी एकवेळ मुंबईला विजयाची आस दाखवली होती. परंतु फटकेबाजी करण्याच्या नादात ते आपली विकेट गमावून बसले. तिलकने १४ चेंडूंत ४३ धावा कुटल्या. या खेळीत त्याने ५ चौकार आणि ३ षटकारांची माळ लावली. नंतर सूर्यकुमार यादवची बॅट तळपली. त्याने ३८ चेंडूंत ६१ धावांची संघातर्फे सर्वात मोठी खेळी खेळली. सूर्यकुमार मैदानात होता तोपर्यंत मुंबईच्या विजयाच्या आशा जिवंत होत्या. स्कूप शॉर्ट मारण्याच्या प्रयत्नात सूर्या मोहित शर्माच्या जाळ्यात अडकला. मोहितने स्टम्पमध्ये चेंडू टाकत सूर्याला त्रिफळाचित केले. अपेक्षा असलेले ग्रीन आणि टीम डेविड यांनाही मोठी खेळी खेळण्यात अपयश आले. ग्रीनने ३० धावा जमवल्या. टीम डेविड तर २ धावा करून माघारी परतला. मुंबईचे अन्य फलंदाज धावा जमवण्यात अपयशी ठरले. इंडियन्सचा डाव १८.२ षटकांत १७१ धावांवर सर्वबाद झाला. गुजरातच्या मोहित शर्माने विकेटचे पंचक जमवत मुंबईला विजयापासून दूर ठेवले.

प्रथम फलंदाजीला आलेल्या गुजरात टायटन्सच्या शुभमन गिलने आपल्या फॉर्मला साजेशी अशी खेळी मुंबई इंडियन्सविरुद्ध केली. त्याने ६० चेंडूंत ७ चौकार आणि १० षटकार लगावत १२९ धावांची वादळी खेळी खेळली. गिलने यंदाच्या हंगामातील तिसरे शतक झळकावले. गिलच्या शतकामुळे गुजरातने निर्धारित २० षटकांत ३ फलंदाज गमावून २३३ धावा केल्या. गिलला साई सुदर्शनने ४३ धावांची साथ दिली. सुदर्शन अर्धशतक झळकावणार असे वाटत होते, पण तो रिटायर्ड आऊट झाला. हार्दिक पंड्याने लिटल कॅमियो खेळी खेळली.

त्याने १३ चेंडूंत नाबाद २८ धावा जोडल्या. पंड्याने आपल्या खेळीत २ चौकार आणि २ षटकार फटकवले. गिलचे तुफान धडकलेले असतानाही मुंबईच्या जेसन बेहरेंडॉर्फला मात्र मोठे फटके वाचवण्यात यश आले. अन्य फलंदाज मार खात असताना जेसनने मात्र ४ षटकांत केवळ २८ धावा दिल्या. लखनऊविरुद्धच्या सामन्याचा हिरो आकाश मढवाल, ख्रिस जॉर्डन कमालीचे महागडे ठरले. या दोघांनी प्रत्येकी ५० हून अधिक धावा दिल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -