Tuesday, April 29, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

आडनाव बदलायला सांगणा-यांना गौतमी पाटीलने दिले चोख प्रत्युत्तर

आडनाव बदलायला सांगणा-यांना गौतमी पाटीलने दिले चोख प्रत्युत्तर

पुणे : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना होणारी गर्दी, हाणामारी, लाठीचार्ज यामुळे ती व तिचे कार्यक्रम कायमच वादाच्या भोवर्‍यात अडकतात. त्यातच गौतमी पाटीलचे मूळ आडनाव चाबुकस्वार असल्याचे समोर आले. त्यामुळे आता तिच्या आडनावावरुन वाद होत आहेत. या वादामुळे मराठा सेवा संघात दोन गट पडले आहेत. तर सुषमा अंधारे मात्र पदर खोचून गौतमीच्या पाठीशी आहेत.

गौतमीने 'पाटील' आडनाव लावू नये यासाठी मराठा सेवा संघातील एक गट आक्रमक झाला तर दुस-या गटाने मात्र गौतमीला पाठिंबा दिला. मराठा समन्वयक राजेंद्र जराड पाटील यांनी 'गौतमीचे आडनाव चाबुकस्वार आहे. ती पाटील आडनाव लावून पाटलांची बदनामी करते आहे. त्यामुळे तिने आडनाव लावू नये, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही', असा इशारा दिला.

या इशा-याला तितकंच चोख प्रत्युत्तर गौतमी पाटीलने दिलं आहे. ती म्हणते, 'माझ्या कार्यक्रमात मी कोणाचीही बदनामी करत नाही. माझा कार्यक्रम सांस्कृतिक आहे. मला कोण, काय नाव ठेवते त्याने काहीही फरक पडत नाही. पण ज्याला प्रश्न असेल, त्याने आधी माझा कार्यक्रम पूर्ण पाहावा. त्यानंतर काय सुरू आहे ते बोलावे', असे आव्हान तिने दिले आहे.

मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सुरेंद्र पाटील यांनी गौतमीमुळे पाटील आडनावाची बदनामी होत आहे, हे पटत नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. माधुरी दीक्षितच्या 'दीक्षित' आडनावावर कोणीच आक्षेप घेतला नाही, त्यामुळे गौतमीच्या आडनावावरही आक्षेप नसावा असे ते म्हणाले. गौतमीच्या नृत्यांवर आक्षप असेल तर मराठा समाजाच्या मुलींनी तिचे कार्यक्रम पाहू नयेत, त्यांचे आयोजन करु नये. मात्र अशा प्रकारे धमकी देणे चुकीचे व दुर्दैवी असल्याचे सुरेंद्र पाटील म्हणाले.

तर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनेदेखील गौतमीला पाठिंबा दर्शवला आहे. 'आडनावात वर्णश्रेष्ठतावाद आहे' अशी एक पोस्टच सुषमा अंधारेंनी फेसबुकवर शेअर केली आहे. माधुरी दीक्षित, ममता कुलकर्णी, माधुरी पवार यांना आडनाव बदलण्याचे सल्ले कोणीही दिले नाहीत, मग गौतमी पाटीललाच का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Comments
Add Comment